वृक्षपूजा- वटवृक्ष

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    07-Oct-2018   
Total Views |



 

ऋग्वेदात याच्या नावाचा जरी उल्लेख नसला तरी त्याचं वर्णन आढळतं. प्राचीन काळापासून आर्यांना हा वृक्ष परिचित असल्याचं प्राचीन वाङ्मयावरून कळतं. रामायण, महाभारत, चरकसंहिता, बृहत्संहिता, कौटिल्यीय अर्थशास्त्र, रघुवंश इत्यादी अनेक संस्कृत ग्रंथांतून याचा उल्लेख आलेला आहे.
 

 

वटवृक्षाला संस्कृत भाषेत ‘न्यग्रोध’ म्हणतात. ‘न्यग्रोध’ म्हणजे वरून खाली वाढणारा. वडाच्या झाडाच्या आडव्या फांद्यांपासून पारंब्या फुटून त्या जमिनीत शिरतात व झाडाचा विस्तार होतो म्हणून त्याला हे नाव दिलं गेलं आहे. ऋग्वेदात याच्या नावाचा जरी उल्लेख नसला तरी त्याचं वर्णन आढळतं. प्राचीन काळापासून आर्यांना हा वृक्ष परिचित असल्याचं प्राचीन वाङ्मयावरून कळतं. रामायण, महाभारत, चरकसंहिता, बृहत्संहिता, कौटिल्यीय अर्थशास्त्र, रघुवंश इत्यादी अनेक संस्कृत ग्रंथांतून याचा उल्लेख आलेला आहे. सीतादेवीने प्रयागच्या प्रसिद्ध वटवृक्षाची प्रार्थना केल्याचा उल्लेख रामायणात आहे. बौद्धधर्मीयही या वृक्षाला पवित्र मानतात. त्यांच्या सात बोधिवृक्षांपैकी हा एक आहे. अथर्ववेदात व त्यानंतरच्या वाङ्मयात याचे बरेच उल्लेख आहेत. शतपथ ब्राह्मणात याच्या उत्पत्तीची एक कथा दिली आहे - कुरूक्षेत्रात देवांनी यज्ञ केला आणि त्यावेळी सोमचमसाचे मुख त्यांनी खालच्या बाजूला करून ठेवले. त्या सोमचमसाचाच मग वटवृक्ष बनला. वडाचं झाड हा एक यज्ञीय वृक्ष आहे. यज्ञपात्रे याच्याच लाकडाची बनवतात. सृष्टी निर्माण होण्यापूर्वी प्रलयकालीन जलात श्रीविष्णू बालरूपाने वटपत्रावर शयन करतो, असं सांगितलं आहे. ब्रह्मदेव वडाच्या झाडावर राहतो, अशीही समजूत आहे. त्याचप्रमाणे यक्ष, खविस आणि वेताळ हेही वटवृक्षांवर राहतात, असंही काही ठिकाणी मानलं जातं. सौभाग्य आणि संतती यांच्या प्राप्तीसाठी वडाला पार बांधून त्याची मुंज करावी व त्याचे लग्न लावावे, असे विधान आहे. प्रयाग येथील अक्षय वडाखाली राम, सीता आणि लक्ष्मण यांनी आसरा घेतला होता, असं एका दंतकथेत म्हटलं आहे. या अक्षय वडापासून निघालेल्या दुसर्‍या वटवृक्षाची अलाहाबाद किल्ल्याजवळच्या एका भुयारातील मंदिरात अजून लोक पूजा करतात. बडोद्यातील लालवदिया जमातीचे लोक फक्त वडाचीच पूजा करतात. वटवृक्ष हे प्रेमिकांना सुरक्षित व सोयीस्कर संकेतस्थान असल्याचा उल्लेख गाथासप्तशतीत आहे.
 

कृष्णवड नावाचा एक वडाचा प्रकार आहे, ज्याची पानं किंचित वाकलेली असल्याने द्रोणासारखी दिसतात. एकदा गोपाळकृष्ण गाईंना घेऊन रानात गेला असता, काही गोपी लोणी घेऊन तिथे गेल्या व त्यांनी ते लोणी कृष्णाला दिले. कृष्णाने ते लोणी सर्व गोपगोपींना वाटले. त्यासाठी त्याने जवळच असलेल्या एका वडाची पानं तोडून ती जराशी मुडपून घेतली. तेव्हापासून त्या वडाची पानं द्रोणासारखी बनली आणि त्याच्या बीजापासून उत्पन्न झालेल्या वडाला तशीच पानं येऊ लागली, अशी आख्यायिका सांगतात. म्हणून अशा वृक्षाला ‘कृष्णवड’ म्हणतात.

 

सुवासिनी स्त्रियांनी सौभाग्यवृद्धीसाठी ज्येष्ठ पौर्णिमेला करायचे ‘वटसावित्री’ हे व्रत सर्वपरिचित आहे. ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशीपासून पौर्णिमेपर्यंत हे त्रिरात्रव्रत करावं, असं सांगितलेलं आहे. सावित्रीसह ब्रह्मदेव ही या व्रताची मुख्य देवता असून सत्यवान सावित्री, नारद व यमधर्म या उपांग देवता आहेत. सावित्रीचा पती सत्यवान वडाच्या झाडाखाली गतप्राण झाला आणि पुन्हा तिथेच सजीव झाला, या संकेताला अनुसरून या दिवशी स्त्रिया वडाचीच पूजा करतात. त्यासाठी वटवृक्षापाशी जाऊन त्याच्या मुळाशी पाणी घालून त्याला प्रदक्षिणा घालून सुताचे वेष्टन करतात. नंतर त्याची पूजा करतात व प्रार्थना करतात. पुराणकथेनुसार सावित्री ही सर्वश्रेष्ठ पतिव्रता म्हणून आदर्श मानलेली आहे. अत्यंत तेजस्वी सौंदर्य असणार्‍या सावित्रीने त्रिरात्र वटसावित्री व्रत केल्याने तिला तिचा निधन पावलेला पती (सत्यवान), सासर्‍याचे डोळे आणि गेलेले राज्य परत मिळाले, अशी आख्यायिका आहे. तेव्हापासून वटसावित्री व्रत भारतभर प्रसिद्ध आहे. “वटमूले स्थितो ब्रह्मा वटमध्ये जनार्दन:। वटाग्रे तु शिवो देव: सावित्री वटसंश्रिता ॥अशी प्रार्थना वटसावित्रीच्या दिवशी करतात. बंगालमध्ये वटसावित्री व्रत करताना बंगाली सुवासिनी आपल्या पतीची पूजा करतात. याव्यतिरिक्त त्या यमाचीही पूजा करून वडाची डहाळी यमाला अर्पण करतात. वटवृक्षाच्या विविधांगांमध्ये सावित्री, ब्रह्मदेव, विष्णू, शिव यांचे वास्तव्य असते, असे मानले गेले आहे. उत्तर भारतात ज्येष्ठ मासातील अमावास्येच्या दिवशी वटसावित्रीचं व्रताविधान केलं जातं. तिथे व्रताचा आरंभ ज्येष्ठ कृष्ण त्रयोदशीपासून होतो.

 

‘वटयक्षिणी’ ही एक देवता मानली गेली आहे. ही देवता म्हणजे वटवृक्षावर राहणारी यक्षिणी आहे, अशी कल्पना केली गेली आहे. वटयक्षिणीची पूजा करताना निर्मनुष्य अरण्यातील वडाच्या झाडाखाली बसून रोज रात्री यक्षिणी मंत्राचा सहस्र जप करतात. भारतात काही पुरातन वटवृक्ष त्यांच्या धार्मिक महत्त्वांमुळे आजही आपलं अस्तित्व टिकवून आहेत आणि ते पर्यटकांचं आकर्षण ठरले आहेत. उदाहरणार्थ, गयेचा अक्षयवट व प्रयागचा श्यामवट फार पूर्वीपासून प्रसिद्ध आहेत. भडोचपासून जवळ असलेल्या नर्मदा नदीमधील एका बेटावर कबीरवड हा पुरातन वृक्ष आहे. कोलकातामधील भारतीय वनस्पती उद्यानातील सुमारे अडीचशे वर्षं जुना वटवृक्ष हा मोठं पर्यटनबिंदू बनला आहे. मध्य प्रदेशातल्या छिंदवाडा जिल्ह्यात बडचिचोली येथे एक वटवृक्ष अडीच एकर भूमीवर पसरला आहे. बिहारमधील कमतौल येथील वडही प्रसिद्ध आहे. कोलकाताच्या शिवफूट बोटॅनिकल गार्डनमधील पसरलेला वड प्रचंड असून त्यांच्या छायेत चार-पाच हजार लोक बसू शकतात. शिवफूट वनस्पती उद्यानातल्या वटवृक्षाचे वय ३५० वर्षे आहे. मद्रास येथील अड्यारच्या थिऑसॉफिकल सोसायटी येथे आणि सातारा शहराजवळ असेच वडाचे प्राचीन वृक्ष आहेत. तसेच पातूरजवळ असलेल्या अंबाशी येथील गावात असलेला वटवृक्षही सुमारे दीड एकर परिसरात पसरलेला आहे. भारतात कुठेही गेलं तरी प्रत्येक मंदिराच्या आवारात एकतरी वडाचं झाड असतंच. धार्मिक भावनेमुळे का होईना, पण आज जिकडेतिकडे भरपूर वटवृक्ष टिकवले गेले आहेत.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

@@AUTHORINFO_V1@@