naa
ओपन सोर्स तंत्रज्ञान, आपल्यापैकी अनेकांनी याबाबत ऐकले असेल. काहींनी यात काम केले असेल, तर काही जण अजूनही या संकल्पनेपासून अनभिज्ञ असतील. मात्र याचे अस्तित्व आज माहितीतंत्रज्ञानाच्या जगतात खूप मोठी भूमिका निभावत आहे, हे मात्र नक्की. बदलणाऱ्या काळाबरोबर तंत्रज्ञान देखील बदलत जाते. त्यामुळे त्यात नेहमीच नव-नवीन संकल्पनांना वाव मिळत असतो. उदाहरणार्थ, साधारणत: एक दशकापूर्वी मोबाईल टेक्नॉलॉजीबाबत फारशी चर्चा आढळून येत नसत, सॉफ्टवेअर उद्योगांमध्ये वेब, आणि स्टँड अलोन अॅप्लिकेशनला मोठे महत्व होते. मात्र आता बाजारपेठेत मोबाईल अॅप्लिकेशनला प्रचंड मागणी वाढली आहे. याचे कारण म्हणजेच बदलते तंत्रज्ञान जगत ....
तंत्रज्ञान जगतात संशोधनाला मोठ्या प्रमाणात वाव आहे, एका उज्वल भविष्यासाठी त्याची आवश्यकता तशी कधीही न संपणारी आहे. त्यामुळे कितीही मोठ-मोठे शोध लागले तरी देखील ते अंतिम संशोधन ठरत नाही. आणि त्यामुळेच आपल्याला काळासोबत बदलणारे तंत्रज्ञान अनुभवायला मिळत असते. सॉफ्टवेअर उद्योग जगतात मोठ्या प्रमाणत वापरली जाणारी संकल्पना म्हणजेच ओपन सोर्स तंत्रज्ञान होय.
काय आहे ओपन सोर्स तंत्रज्ञान ?
एखादे सॉफ्टवेअर जेव्हा विकसित होत असते तेव्हा त्यासाठी कोडींग केली जात असते. अनेक वेळेला कोडींग सामान्य युझर्सना ती पाहता येत नाही, त्याचबरोबर त्या कोडींगचे कॉपीराइटस् असतात. जे साधारणत: कुणी इतरानी कोड वापरू नये, म्हणून तयार केली जात असतात. मात्र सॉफ्टवेअर जगतात ओपन सोर्स तंत्रज्ञानात तयार करण्यात आलेली सॉफ्टवेअर्स ही सर्वांसाठी खुली असतात. त्यातील कोडींगमध्ये नवीन भर टाकणे, अथवा त्याआधारावर एखादे सॉफ्टवेअर विकसित करणे ते स्वत:चे नवीन तंत्रज्ञान त्यातून निर्माण करणे इथपर्यंतची खुली सूट असते. असे तंत्रज्ञान ओपन सोर्स तंत्रज्ञान म्हणून ओळखले जातात.
आपल्या सर्वात जवळचे आणि दैनंदिन वापरातले उदाहरण म्हणजेच अॅन्ड्रॉईड. हे देखील ओपन सोर्स तंत्रज्ञानातून विकसित झालेले सॉफ्टवेअर आहे. त्याचबरोबर आपण रोज कम्प्युटरसाठी वापरतो ती ऑपरेटिंग सिस्टीम (या बद्दल आगामी लेखात विश्लेषण मांडेल) ती म्हणजे विंडोज होय. विंडोज ऑपरेटिंग सिस्टीम ही ओपन सोर्स तंत्रज्ञानात मोडत नाही. त्यामुळेच याचे लायसन्स, आणि इतर बाबी प्रत्येकाला विकत घ्याव्या लागत असतात. मात्र ओपन सोर्स तंत्रज्ञान हे सर्वांसाठी खुले असल्यामुळे यासाठी वेगळे पैसे मोजावे लागत नाहीत.
ओपन सोर्स आणि सॉफ्टवेअरमधील संशोधन
ओपन सोर्स तंत्रज्ञानात संशोधनाला नेहमीच मोठ्या प्रमाणात वाव राहिला आहे, अनेक संकल्पना सॉफ्टवेअर जगतात ओपन सोर्स तंत्रज्ञानात काम करणाऱ्या डेव्हलपर्सनी स्थापित केल्या आहेत. त्यामुळे डेव्हलपर्ससाठी ओपन सोर्स हा नेहमी कुतुहुलाचा आणि जिव्हाळ्याचा मुद्दा बनून राहिला आहे. अनेकजण यात उत्सफूर्तपणे काम करत असतात.
यांच्या या संशोधनात्मक कार्यामुळेच जगाला लिनक्स सारखी उत्तम आणि प्रबळ ऑपरेटिंग सिस्टीम लाभू शकली आहे. या ऑपरेटिंग सिस्टीमच्या जोरावरच रेड हॅट, उबंटू, अॅन्ड्रॉईड सारख्या इतर ऑपरेटिंग सिस्टीम विकसित झाल्या आहेत. आज अॅन्ड्रॉईडने जगात लक्षणीय बदल घडवलेला आहे, याचे आपण सर्वच साक्षीदार आहोत. याचे श्रेय ओपन सोर्स तंत्रज्ञानात काम करणाऱ्या डेव्हलपर्सना जाते.
इंटरनेट हे देखील ओपन सोर्स तंत्रज्ञान आहे. इंटरनेटची सर्व मुलभूत कार्यपद्धती ही ओपन सोर्स तंत्रज्ञानात विकसित झाली आहे. लिनक्स ऑपरेटिंग सिस्टीमने अनेक वेब सर्व्हर विकसित केले आहेत. ते देखील ओपनसोर्स प्रकारात मोडतात. त्यामुळे वेबसाईट, वेब अॅप्लिकेशन तसेच क्लाऊड कम्प्युटिंग सारखे नवे तंत्रज्ञान याच्या आधारावरच कार्यरत आहेत.
त्यामुळे सॉफ्टवेअर जगतातील संशोधनात ओपन सोर्स तंत्रज्ञानाचा सिंहाचा वाटा आहे, असे म्हणणे वावगे ठरणार नाही.
लोकप्रिय ओपन सोर्स सॉफ्टवेअर्स
वर्डप्रेस : जगातील सर्वाधिक सुप्रसिद्ध ब्लॉगर अॅप्लिकेशन असलेले वर्डप्रेस हे ओपन सोर्स तंत्रज्ञानात विकसित झालेले आहे. जगात सर्वाधिक वेबसाईट वर्डप्रेसमध्ये विकसित झाल्या आहेत. यावरून आपण ओपन सोर्स तंत्रांज्ञानाची ताकत ओळखू शकतो.
मोझिला फायरफॉक्स : आपल्या दैनंदिन इंटरनेट वापरत वेब ब्राउझरचा उपयोग होत असतो. मोझिला फायरफॉक्स हे ओपन सोर्स तंत्रज्ञानात विकसित झालेले वेब ब्राउझर आहे. एकूण जगाच्या २४% पेक्षा अधिक इंटरनेट वापरणारे लोक मोझिला फायरफॉक्स वापरत असतात.
ओपन ऑफिस : मायक्रोसॉफ्ट ऑफिसला पर्याय म्हणून ओपन ऑफिसकडे सध्या बघितले जाते. मायक्रोसॉफ्ट ऑफिस हे क्लोझ सोर्स तंत्रज्ञान असल्यामुळे त्यासाठी पैसे मोजावे लागतात. त्यामुळे बाजारपेठेत तेवढेच फीचर्स असलेले ओपन सोर्स सॉफ्टवेअर म्हणजेच ओपन ऑफिस उपलब्ध आहे. यात वर्ड, पावर पॉइंट, एक्सेल अशी सर्व फीचर्स वापरता येतात.
VLC मिडीया प्लेयर : VLC मिडीया प्लेयर हा सर्वाधिक प्रसिद्ध मिडिया प्लेयरपैकी एक आहे. यात असलेल्या विविध फीचर्समुळे हे कम्प्युटर युझर्सचे सर्वाधिक पसंती असणारे मिडीया प्लेयर ठरले आहे. अद्याप ३०० दशलक्षपेक्षा अधिकवेळा हे डाऊनलोड झाले आहे. हे ओपन सोर्स तंत्रज्ञानात विकसित केले गेलेले सॉफ्टवेअर आहे.
GIMP (जिम्प) : अॅडॉब फोटोशॉपला पर्याय म्हणून ओपन सोर्स तंत्रज्ञानात विकसित केले गेलेले जिम्प जगप्रसिद्ध सॉफ्टवेअर आहे. यात सर्व प्रकारच्या इमेजेस तयार होऊ शकतात, त्याच बरोबर विविध फीचर्स देखील जिम्पमध्ये उपलब्ध आहेत.
उबंटू : उबंटू ही लिनक्समध्ये तयार झालेली ऑपरेटिंग सिस्टीम आहे. मायक्रोसॉफ्ट विंडोज या ऑपरेटिंग सिस्टीमला पर्याय म्हणून, किंबहुना त्याहून अधिक प्रबळ आणि फिचर्ड असलेली ऑपरेटिंग सिस्टीम म्हणून ओळखली जाते. अनेकवेळा सॉफ्टवेअर डेव्हलपर्स ऑपरेटिंग सिस्टीम म्हणून उबंटूला सर्वाधिक प्राधान्य देत असतात. यात अनेक अशा सुविधा उपलब्ध आहेत, ज्या कम्प्युटर प्रणालीसाठी उपयुक्त आहेत. व्हायरस हल्ल्यापासून बचाव करण्यासाठी सर्वाधिक प्रबळ ऑपरेटिंग सिस्टीम म्हणून उबंटू बद्दल चर्चा केली जाते.
याशिवाय देखील अनेक ओपन सोर्स सॉफ्टवेअर्स बाजारपेठेत उपलब्ध आहेत. काही प्रातिनिधिक स्वरूपातील सॉफ्टवेअर्सची ओळख मी करून दिली. ओपन सोर्स तंत्रज्ञानामुळे सॉफ्टवेअर क्षेत्रात मोठ्याप्रमाणात बदल घडून आला आहे. त्यामुळे ओपन सोर्सचा प्रभाव दिवसेंदिवस वाढत जात आहे. हे तंत्रज्ञान एखाद्या समूहा पुरते मर्यादित राहिले नसून जनआंदोलन बनत जात आहे.
- हर्षल कंसारा