माहिती तंत्रज्ञानाच्या प्रभावी उपयोगामुळे जग अतिशय वेगवान होत चालले आहे, आणि जवळ देखील येत आहे. प्रत्येक गोष्ट एका क्लिकवर उपलब्ध करून देणारे आजचे युग आहे. यात सर्वात मोठा वाटा आहे तो इंटरनेटचा. या सर्व बाबी केवळ इंटरनेटमुळेच शक्य होऊ शकल्या आहेत.
जसे आपण खाद्यपदार्थ, कपडे, किराणा, पुस्तके ऑनलाईन मागवू शकतो, त्यासाठी प्रत्यक्ष दुकानात जाण्याची आवश्यकता नाही, त्याचप्रमाणे हल्ली बँकिंग प्रणाली देखील विकसित झाली आहे. प्राचीन काळातील व्यवहार हे वस्तूंच्या स्वरुपात केले जात. त्यानंतर मानवाने चलन नामक पद्धती विकसित केली. व्यवहार सोने चांदीच्या नाण्यांच्या आधारावर केले जाऊ लागले. नंतरच्या काळात चलन तांबे-पितळ्याचे बनू लागले, गेल्या पन्नास वर्षांपासून आपल्या देशात कागदी आणि स्टेनलेस स्टीलचे चलन वापरात आले. अशा प्रकारे हळूहळू चलनाच्या पद्धतीमध्ये बदल होत गेले. तसे सध्याचे युग कॅशलेस व्यवहाराने चालणारे युग आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ८ नोव्हेंबर २०१६ रोजी ५०० आणि १००० च्या नोटा चलनातून बाद करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आणि त्यानंतर कॅशलेस व्यवहाराला मोठ्या प्रमाणात चानला मिळाली होती. स्वत: पंतप्रधान इंटरनेट बँकिंगला प्रोत्साहन देत होते, याचे महत्वाचे कारण म्हणजेच या प्रणालीतील पारदर्शकता. इंटरनेट बँकिंग ही पारदर्शक प्रणाली आहे. त्याबद्दल आपल्यापैकी अनेकांना बरीचशी माहिती आहे, मात्र याचा विविध कामासाठी प्रभावी उपयोग कसा करता येईल...? या बद्दल जाणून घेऊयात.
जलद, सोयीस्कर आणि फायदेशीर
इंटरनेट बँकिंग प्रणाली ही अतिशय जलद आणि सोयीस्कर आहे. पैश्याची देवाण घेवाण असो, अथवा पैश्याचा भरणा असो यासाठी प्रत्येक वेळेला बँकेत जाण्याची आवश्यकता भासत नाही. मात्र अनेक जण केवळ पैश्यांची देवाण घेवाण करण्यासाठीच इंटरनेट बँकिंगचा वापर करत असतात, त्या व्यतिरिक्त त्याचा प्रभावी वापर आपण जाणून घेतला पाहिजे.
एटीएम कार्ड, चेकबुक मागवा घरी
इंटरनेट बँकिंग सुरु केल्यानंतर तुम्हाला एटीएम कार्ड अथवा चेकबुकसाठी अर्ज करण्याकरिता बँकेच्या लांबलचक रांगेत उभे राहण्याची आवश्यकता भासत नाही. प्रत्येक बँकेच्या इंटरनेट बँकिंग पोर्टलवर एटीएम कार्ड आणि चेकबुकसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचा पर्याय उपलब्ध असतो. त्यावर क्लिक करून उपलब्ध पर्यायांपैकी एटीएम कार्डची आणि चेकबुकची निवड करून आपला पत्ता त्यावर टाकून घर पोहोच मागवता येते.
ठेवा ऑनलाईन ठेवी
इंटरनेट बँकिंगच्या माध्यमातून पैश्याच्या ठेवी ठेवण्यासाठी बँकेचे चक्कर मारावे लागत नाहीत. आपल्या ऑनलाईन बँकिंगमध्ये ठेवी ठेवण्याची सुविधा सुद्धा उपलब्ध करून देण्यात आली आहे. मात्र त्याचा उपयोग खूप कमी लोक करताना दिसतात. ऑनलाईन प्रणालीने ठेवी ठेवणे देखील तुलनेने अधिक सोपे आहे.
त्वरित कर्ज
कर्ज मिळविण्यासाठी बँकेत किती खेटा माराव्या लागतात, याची अनुभूती अनेकांनी घेतली आहेच, मात्र एका क्लिकवर कर्ज उपलब्ध होणार असेल तर !! प्रत्येक ग्राहक ही सुविधा वापरण्यासाठी नक्कीच उत्सुक असणार. इंटरनेट बँकिंगच्या माध्यमातून हे शक्य आहे. इंटरनेट बँकिंग वापरताना कर्जासाठी ऑनलाईन अर्ज करता येतो, त्याची संपूर्ण प्रक्रिया देखील जलद असते. संपूर्ण कागदपत्राची तपसणी करण्याची प्रक्रिया देखील लवकर केली जाते आणि पारंपारिक पद्धतीपेक्षा त्वरित कर्ज उपलब्ध होते.
बिलिंग
प्रत्येक महिन्याला फोन बिल, वीज बिल, विम्याचे हप्ते, इतर बिल देताना अनेक लोक कॅशलेस व्यवहार करत असतात, इंटरनेट बँकिंगचा वापर करून बिलिंग करत असतात. मात्र प्रत्येक बिल भरताना स्वतंत्रपणे भरली जातात, त्यासाठी प्रत्येकवेळी लॉग इन करावे लागते. मात्र इंटरनेट बँकिंगमध्ये आपले सारे बिल शेड्यूल्ड करता येतात. त्या पर्यायाचा वापर केल्यास प्रत्येक वेळी मन्युअलि बिलिंग करण्यापेक्षा, ऑटोमॅटीक बिलिंग होऊन जाते. त्याचा आपल्याला एसएमएस देखील येत असतो. हा पर्याय आपण सर्वांनी जरूर वापरून पाहावा.
ऑनलाईन शॉपिंग कार्ड
आजकाल इ-कॉमर्सच्या वाढत्या वापरामुळे ऑनलाईन शॉपिंग करण्याचा ट्रेण्ड मोठ्याप्रमाणात आला आहे. त्यासाठी विविध सूट देखील दिली जात असते. अशावेळी थेट डेबिट कार्ड अथवा इंटरनेट बँकिंगने पेमेंट न करता शॉपिंग कार्डने पेमेंट करण्याची नवीन पद्धत आली आहे. त्यात ग्राहकाला अनेक सुट असतात. अशा धर्तीवर प्रत्येक बँकेने इंटरनेट बँकिंगमध्ये शॉपिंग कार्ड उपलब्ध करून दिले आहे. त्याच्या माध्यमातून ग्राहक ऑनलाईन शॉपिंग करू शकतो, शिवाय वस्तूंवर मोठ्याप्रमाणात सूट मिळवू शकतो.
इंटरनेट बँकिंगच्या अशा अनेक बाबी आहेत, ज्या ग्राहकांद्वारे तुलनेने कमी वापरल्या जातात. पैशाची देवाण-घेवाण जशी सोपी होते, तसेच अनेक बँकिंग व्यवहार यामुळे सोपे होत असतात. तसेच या सर्वांचा लेखाजोखा देखील आपल्याला एका क्लिकवर उपलब्ध होत असतो. त्यामुळे जास्तीत जास्त इंटरनेट बँकिंगचा वापर हा आपल्या दैनंदिन व्यवहाराला सुरळीत करत असतो, शिवाय सध्या तंत्रज्ञान मोठ्या प्रमाणात विकसित झाल्यामुळे हे सर्व व्यवहार सुरक्षित देखील आहेत. त्यासाठी योग्य ती काळजी घेतली पाहिजे. टेक भारतच्या माध्यमातून यासाठीचे देखील लिखाण होत राहते, त्यामुळे आपण नेहमी टेक भारत वाचत राहा.....
- हर्षल कंसारा