भारतीय समाज उत्सवप्रिय आहे. विविध सण-उत्सव एकत्र येऊन साजरे करणे, ही आपल्या देशाची विशेषता आहे. अगदी सत्य युगापासून चालत आलेले उत्सव आजही आपल्या देशात तेवढ्याच उत्साहाने, आणि श्रद्धेने साजरे केले जातात. पूर्वीच्या काळी या सर्व सण-उत्सवांची रचना, लोकांनी एकत्र येऊन, आनंद साजरा करून, समाजाची संस्कृती एका पिढी पासून दुसऱ्या पिढीपर्यंत पोहोचविण्यासाठी केली होती. त्यामुळे यामागे संस्कृती संरक्षण, संवर्धन आणि पर्यायाने समाजाचे दृढीकरण करणे हाच उद्देश्य होता. आजची गोष्ट करायची झाल्यास अनेक ठिकाणी विशेषत: शहरी भागात म्हटले जाते की, आपल्या परंपरांचा ऱ्हास होत चालला आहे, आता पूर्वीसारखे काही राहिले नाही, किंवा वर्षभर पाण्याचे अपव्यव करताना मात्र केवळ होळीच्याच वेळेला पाणी वाचावा, होळी बंद झाली पाहिजे वैगरे बाबी कानी पडतात. परंतु आजही आपली संस्कृती टिकवून ठेवून, तेवढ्याच जोमाने, तेवढ्याच उत्साहाने होळी सारखा संस्कृती संवर्धक सण साजरा केला जातो. यावर अनेकांना विशेषत: शहरी भागातील लोकांना आश्चर्य वाटेल. परंतु अतिशय प्राचीन परंपरेने नटलेली, विविधतेत एकतेचा संदेश देणारी, आणि निसर्ग पूजेचा संदेश न केवळ देणारी मात्र तसे आचरण करणारी होळी आपल्या महाराष्ट्रात वनवासींचा जिल्हा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नंदुरबार जिल्ह्यातील काठी या गावी मोठ्या आनंदाने आणि उत्साहाने साजरी केली जाते, त्याबद्दल थोडी माहिती करून घेऊयात...
काठीची राजवाडी होळी
महाराष्ट्राच्या उत्तरेला असणारा नंदुरबार जिल्हा तसा आपल्या सर्वांनाच परिचित आहेच, जवळपास ७० टक्के वनवासी जनजाती असलेल्या या भागात होळीचे विशेष महत्व आहे. वनवासी समाजात याबाबत अनेकानेक प्रथा परंपरा आहेत. नंदुरबार शहरापासून जवळपास ८० किमी अंतरावर असणाऱ्या अक्राणी तालुक्यात काठी नामक वनवासी समाजाचे मोठे संस्थान आहे. यात भिल्ल,पवारा,माऊची,कोकणी, नोयारी, धानकी, इत्यादी विविध जनजातींचा समावेश आहे. तसेच हा संस्थानाशी जुळलेले लोक केवळ महाराष्ट्रात राहत नाही, तर गुजरातच्या तापी, नर्मदा , भरूच या जिल्ह्यांत देखील वास्तव्य करतात. त्याचप्रमाणे मध्यप्रदेशातील सातपुड्याच्या भागात देखील या जमातींचे वास्तव्य आहे.
वनवासी समाजाचे कुलदैवत असलेले राजा पांठा आणि गांडा ठाकूर यांनी होलिकोत्सवाची परंपरा महाभारताच्या कालखंडात वनवासी समाजात रुजवली आहे, असा समुदायातील आख्यायिकांमध्ये उल्लेख आढळतो. राजा पांठा आणि गांडा ठाकूर म्हणजे भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुनाचे रूपे आहेत, अशी श्रद्धा वनवासींमध्ये आहे. त्यानंतरचा उल्लेख आढळतो तो म्हणजे काठी संस्थानचे बाराव्या शतकातील राजे उमेदसिंह यांच्या कारकीर्दीपासून १२४६ पासून काठी संस्थानाची होळी साजरी केली जाण्याची. १२४६ पासून तर आजतागायत होळी साजरी करण्याच्या या परंपरेत खंड पडलेला नाही.
होळीची वैशिष्ट्ये
प्राचीन काळापासून सुरु असलेली होळीची परंपरा सातपुड्यातील वनवासी समाजाने आजही टिकवून ठेवली आहे. आजही हा पारंपरिक उत्सव मोठ्या जल्लोषात साजरा केला जातो. या होळीची अनेकानेक वैशिष्टे आहेत, होळीची एक समृद्ध परंपरा आपल्याला येथे दिसून येते. १५ ते २० दिवस चालणारा हा उत्सव मनाला भुरळ घातल्याशिवाय राहत नाही. होळीच्या अगदी १० ते ११ दिवसा आधीपासून या सणाची लगबग सुरू होते . 'खोंड्या' लावण्यापासून होलीका उत्सव सुरु होतो. 'खोंड्या' म्हणजे 'सावरा' नामक झाडाची फांदी गावातील मुख्य ठिकाणी किंवा होळी चौकात लावली जाते व त्याची दररोज उपासना केली जाते. गावातील लहान - थोर मंडळी दररोज संध्याकाळी 'खोंड्या'ला फेऱ्या घालत बोलीभाषेतील लोकगीते 'लोले' गात प्रार्थना करतात. 'खोंड्या' भोवती शेणाच्या गोवऱ्या अर्पण करतात. या गोवऱ्या होळीच्या दिवशी पेटविल्या जातात. लोकगीते व लोकनृत्य यांचा एक वेगळाच आविष्कार या कालावधीत पहायला मिळतो. वनवासी मंडळी एकमेकांच्या घरी जातात, 'लोले' गातात. 'लोले' म्हणजे स्थानिक आदिवासी बोलीभाषेतील सामूहिक लोकगीते.
होळीच्या आधी सात दिवस कुटुंबातील सदस्य आरोग्य चांगले राहावे या अनुषंगाने ब्रम्हचार्याचे पालन करतात. आजच्या उपभोगी वातावरणात देखील आत्मसंयमाचा हा गुण येथील वनवासींनी मोठ्या श्रद्धेने जोपासला आहे. काठीच्या होळीत बांबूच्या दांड्याची उंची देखील वैशिष्ट्यपूर्ण आहे. ७० फुट उंचीचा बांबू आधी आणला जातो, तो जमिनीत गाडण्यासाठी टिकाव किंवा फावड्याचा वापर न करता नवस फेडणारे श्रद्धाळू जमीन हाताने कोरतात. त्याच ठिकाणी दांडा गाडून, रात्रभर जागरण करून फाल्गुन पौर्णिमेच्या दिवशी पहाटे पाच वाजता होळी प्रज्वलित केली जाते. होळीचा दांडा पूर्वेला झुकल्यास व खाली पडल्यास ते वर्ष सुख-समृद्धीचे जाते, अशी येथे मान्यता आहे. होळीच्या दांड्याला जांभूळ, आंब्याची पाने, खोबऱ्याची वाटी, हार-कंकण, खजूर, डाळ्यांचा नैवेद्य चढविला जातो. होळी पेटताच क्षणी सर्वजण होळीच्या आजूबाजूला फेर धरून रामढोलाच्या तालावर गोल- गोल फिरून नाचतात. होळीच्या दिवशी काठी येथील राजा उमेदसिंह यांच्या सरकारची राजगादीची व शस्त्रास्त्रांची पूजाअर्चा करून गादीची माती कपाळाला लावण्याची देखील परंपरा आहे.
होळी भोवतीचे नृत्य करताना वनवासी बांधव
भोंगऱ्या बाजार
भोंगऱ्या बाजार ही येथील होळीची सर्वात मोठी विशेषता आहे. भोंगऱ्या बाजार म्हणजे यात्रा असते, यात सर्व वनवासी बंधू पारंपारिक वेशात एकत्र येतात. पुरुष डोक्यावर मोरपिसांचा मुकुट, डोळ्यावर चष्मा, कमरेला डोले (झाडांपासून बनविले गेलेली विशिष्ट प्रकारची वल्कले), हातात धनुष्यबाण, कुऱ्हाड, कोयता, तलवार, भाला इत्यादी शस्त्र, काहींच्या हातात वाद्यांसह मिरवणूकीत सहभागी होतात. तर महिला देखील डोक्यावर चक्र असलेली विशिष्ट सजावटीची टोपली, छोटे छोटे आरसे असलेली वनवासी पद्धतीची साडी, अंगावर चांदीची आभूषणे परिधान करून यात सहभागी होतात. यात घैर नामक रासलीला सारखे नृत्य देखील केले जाते. घैर हे शंकराच्या अर्चनेसाठी केले जाणारे नृत्य असण्याची मान्यता येथे आहे. यात पुरुष महिलांच्या वेशात येऊन नृत्य करतात. भगवान शंकरांना रासलीला करण्यापासून रोखले गेले होते, त्यानंतर त्यांना महिलेच्या वेशात येऊन रासलीला करण्याची अट टाकली गेली होती, त्याला भगवान शंकराचे गोपी रूप म्हटले जाते, म्हणूनच येथील पुरुष होळीच्या कालावधीत गोपीश्वर महादेवची अर्चना करण्यासाठी महिलेच्या वेशात घैर नृत्य करतात.
भोंगऱ्या बाजाराचे दृश्य
भोंगऱ्या बाजाराचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे येथे वनवासी समाजातील विवाह जोड्या एकमेकांना पसंत करतात. तरुण तरुणी आपला जीवनसाथी या भोंगऱ्या बाजारात शोधात असतात. एकमेकांना पसंत करून नंतर कुटुंबियांना त्याची माहिती दिली जाते, त्यांनतर त्यांचा विवाह संपन्न केला जातो. आपला जीवनसाथी निवडण्याची मोकळीक मुलगा आणि मुलगी यांना समान पद्धतीने दिली जाण्याची आधुनिकोत्तर विचारांची प्रथा वनवासी समाजात गेल्या अनेक वर्षांपासून आहे. तसेच वनवासी रिती प्रमाणे वधूपक्षाला हुंडा दिला जातो. इतर समाजात ज्यावेळेला स्त्रियांना चूल आणि मुल एवढीच वागणूक दिली जायची त्याआधी पासून स्त्रियांना विशेष सन्मान देण्याची प्रथा येथे अनेक वर्षांपासून रुजलेली आहे.
काठीच्या होळीला महाराष्ट्र, गुजरात, मध्यप्रदेश येथील सातपुडा परिसरातून जवळपास दीड लाखांहून अधिक नागरिक उपस्थित असतात. वनवासींचा हा आनंदोत्सव पाहण्यासाठी थेट मुंबई, दिल्ली प्रमाणेच भारतातील विविध शहरी भागांतून नागरिक येतात. चित्रपट निर्माते व दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर, अभिनेते सदाशिव अमरापूरकर यांनीही या ठिकाणी हजेरी लावली आहे. ढोलाच्या तालावर, निसर्गाची पूजा करण्याची आणि आपल्या समाजाचे संरक्षण, संवर्धन करण्याची, तसेच विविध वाईट चालीरीतींचा त्याग करून, निसर्गाचा ऱ्हास न करता संस्कृतीची जोपासना करण्याचा संदेश काठी येथील होळी संपूर्ण भारतीय समाजाला वर्षानुवर्षे देत आलेली आहे. आपण देखील काठीच्या होळीला भेट द्याल तेव्हा आपल्याला समाज आणि संस्कृती संवर्धनाची प्रेरणा मिळाल्या वाचून राहणार नाही याची मला खात्री आहे.
- हर्षल कंसारा