अ‍ॅक्शनलेस अकिरा

    02-Sep-2016
Total Views |


हिंदी चित्रपटांमध्ये स्त्री पात्रांना पहिले पासून शेवटपर्यंत एकहाती पडदा व्यापण्याची संधी खूप कमी वेळा मिळते. त्यातही मिळालेल्या संधीचे अनेक अभिनेत्रींनी सोनं केल्याचाही इतिहास आहे. यामध्ये ‘डर्टी पिक्चर’मधल्या विद्या बालन, ‘क्विन’मधल्या कंगना रनोत, ‘एनएच-10’मध्ये अनुष्का शर्मा आणि ‘मर्दानी’ साकारणार्‍या राणी मुखर्जीचं विशेष कौतुक करावसं वाटतं. अशीच संधी ‘अकिरा’च्या निमित्ताने सोनाक्षी सिन्हा कडेही चालून आली होती. पण तिला या संधीच सोनं करता आलं नाही, हेच सध्याचं चित्र आहे. प्रमोशन करताना ‘अकिरा’ हा फिमेल अ‍ॅक्शनपट असल्याचं म्हटलंय खरं पण कदाचित ‘अ‍ॅक्शन’ची पातळी दिग्दर्शकाने सोनाक्षीसाठी थोडीशी कमी केली असावी.

प्रेक्षकांना गुंतवून ठेवणे, त्यांना सातत्याने धक्के देत राहणे आणि अनपेक्षित शेवट करणे या वैशिष्ट्यांसह ज्यांनी गजनी व हॉलिडे सारखे सुपरहिट सिनेमे दिले त्याच ए. आर. मुरगुदास यांचा अकिरा हा एका तामिळ चित्रपटाचा रिमेक. जोधपूरमध्ये मुुलींवर होणार्‍या अत्याचाराविरूद्ध लहानपणीच मार्शल आर्टच्या सहाय्याने सशक्तपणे उभ्या राहणार्‍या अकिरा शर्माची ही कहाणी. पुढे याच अत्याचारविरोधी भूमिकेसह अकिरा भावाच्या बोलावण्यावरून शिक्षणासाठी आईसोबत मुंबईला येते. तिथे तिचे महाविद्यालयीन शिक्षण सुरू होते. दुसरीकडे मुंबईतील पोलीस व्यवस्थेतील चार पोलिस एका अपघातग्रस्त प्रवाश्याचा खून करतात आणि त्याच्या गाडीतील करोडो रूपयांवर डल्ला मारतात. हे प्रकरण अकिरापर्यंत कसे येऊन पोहचते, मग त्यात अकिरा कशा प्रकारे अडकते, ते भ्रष्ट पोलिस अकिराचं काय करतात आणि अखेर अकिरा व्यवस्थेविरूद्धच्या संघर्षात यशस्वी होते का.. या सार्‍याचा उलगडा मुरगुदास यांनी ‘अकिरा’तून केला आहे.

मुरगुदास यांच्या मागील चित्रपटांचा इतिहास पाहता अकिराकडूनही त्याच प्रकारच्या मनोरंजनाची प्रेक्षकांची अपेक्षा होती. मात्र अकिराने याबाबत साफ निराशा केली आहे. अ‍ॅक्शनपट म्हटलं की, चित्रपटाचा नायक संपूर्ण चित्रपटात मारझोड करत फिरताना दिसतो. ‘अकिरा’मध्ये मात्र सोनाक्षी केवळ दोनदाच आपल्याला फायटिंग करताना दिसते. क्लॅमॅक्सला देखील ती एकाच्या पायावर, एकाच्या पोटात तर एकाच्या मागे चाकूने वार करते व ते तिघही मरतात. बाकी सगळा वेळ मुंबईतील भ्रष्ट पोलिस, वेड्यांचे हास्पिटल, कॉलेज आणि त्यासंबंधाने घडणार्‍या घडामोडींमध्येच जातो. सुरूवातीपासून चित्रपट काही प्रमाणात प्रेक्षकांना खिळवून ठेवतो आणि त्यानंतरच्या घडामोडी आपल्याला बांधून ठेवतात. पण मध्यंतरानंतर मात्र दिग्दर्शकाची पकड काहीशी सैल झाल्याचे जाणवते. संथा कुमारच्या कथा लेखनातच काही त्रुटी असल्यामुळे ‘अकिरा’ जमून आला नाहीये. सुरुवातीचे जोधपूरमधील चित्रण उत्तम झालं आहे, त्यानंतर आजपर्यंत शेकडो चित्रपटातून दिसलेली मुुंबई पुन्हा पुन्हा वेगळ्या अँगलने दिसत राहते.

सोनाक्षीला यापेक्षाही अधिक चांगल्या प्रकारे अकिरा रंगवता आली असती. चित्रपटात मोजकेच अ‍ॅक्शन सीन असले तरी त्यात सोनाक्षीने वेगळी छाप सोडली आहे. अनुुराग कश्यप व्हिलनच्या भूमिकेत एकदम चपखल बसला आहे. स्वत: दिग्दर्शक असल्यामुळे त्याने अतिशय सहजरित्या या भूमिकेला वाव दिलाय. दिग्दर्शनासोबतच त्याने अभिनय क्षेत्राचाही गांभीर्याने विचार करायला हरकत नाही. याशिवाय कोंकणा सेनचे बर्‍याच काळानंतर झालेले दर्शन अत्यंत सुखावह आहे. मध्यंतरानंतर कोंकणाच अधिक भाव खाऊन गेली आहे. अतुल कुलकर्णी, नंदू माधव, लोकेश गुप्ते यांसारखे मराठी चेहरेही चित्रपटात आपले काम चोख पार पाडतात. संपूर्ण चित्रपटात एकच गाणं सुरूवातीला आहे. त्याही गाण्याची चाल विशाल-शेखरने कॉपी केली आहे. “का कळेना कधी हरवली पारखे’’ या बालकपालक मधील गाण्याची चाल अकिरामधील ‘केहकशा तू मेरी’या गाण्याला जशीच्या तशी दिली गेली आहे.

एकूणच काय तर गजनीमधला अमिर आणि हॉलिडेमधला अक्षय अकिरा मध्ये सोनाक्षीच्या रूपाने पाहायला मिळेल या आशेने गेलात तर नक्कीच निराशा होईल.
----

अग्रलेख
जरुर वाचा
कल्याणमध्ये चिमुकल्यांची शाळा मालवाहतूक टेम्पोमधूनच सुरू

कल्याणमध्ये चिमुकल्यांची शाळा मालवाहतूक टेम्पोमधूनच सुरू

ना दरवाजे, ना अटेंडंट, ना सुरक्षा विद्यार्थी लोंखडीपट्टयांना धरून करतात प्रवास अंबरनाथ मधील अपघाताच्या घटनेने संपूर्ण राज्याला हादरवून सोडले असतानाच कल्याणात एका खाजगी शाळेतील विद्यार्थ्यांना चक्क एका मालवाहतूक करणाऱ्या टेम्पोमधून शाळेत ने-आण केली जात आहे. विशेष म्हणजे मुलांच्या सुरक्षिततेसाठी एक ही अटेंडंट (सहाय्यक) सोबत नाही. विद्यार्थ्यांचा धोकादायक प्रवास सुरू असताना आरटीओच्या अधिकाऱ्याचे मात्र त्याकडे दुर्लक्ष होताना दिसत आहे. त्यामुळे अपघात झाल्यानंतरच जाग येणार का असा प्रश्न आता सर्वसामान्यांकडून ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121