जन्म व पार्श्वभूमी
आजच्या उजबेकिस्तान या देशातील ट्रान्स आणि सर या नदींच्या मधला प्रदेश ‘मावराउन्नहर’ या भागातील ‘शहर-ए-सब्ज’ या शहरात ६ एप्रिल १३३६ साली तैमुरलंग याचा जन्म झाला. त्याचा जन्म ‘बरलस तुर्क’ या घराण्यात झाला होता. त्याच्या पित्याने इस्लाम स्वीकारला होता, आणि तैमुर देखील इस्लामचा कट्टर अनुयायी होता. तैमुरचे वडील हे तुरगाई बरलस तुर्कांचे नेता होते. तैमुरलंग या नावाचा अर्थ ‘तैमुर लंगडा’ असा होतो. तैमुर हा आपल्या उजव्या पायाने अपंग होता. वयाच्या विशीच्या काळात त्याचा पाय एका हल्ल्यात कापला गेला. तेव्हापासुन तो तैमुरलंग अर्थात तैमुर लंगडा या नावानेच ओळखला गेला.
साम्राज्य स्थापना व विस्तार
शहर-ए-सब्ज हा प्रदेश त्याकाळात मंगोल राज्यात गणला जात असे. मंगोल साम्राज्य हे चंगेज खानने विस्तारीत केलेले राज्य होते. लहानपणापासूनच चोरी, लूटमार, दरोडा अशा टोळींचा म्होरक्या राहिलेल्या तैमुरलंग याला मंगोल साम्राज्याचा अधिपती व्हायची मनिषा होती. तसेच सिकंदर, चंगेज खान प्रमाणेच त्यालाही संपूर्ण जगावर आपले राज्य स्थापण्याची महत्वाकांक्षा होती. १३६९ साली समरकंद येथील मंगोल शासकाचा पराभव करून तैमुरी राजवंशाची त्याने स्थापना केली. त्यानंतर संपूर्ण ताकदीनिशी आपल्या राज्य विस्ताराचा प्रारंभ केला. मंगोली राज्याची सैन्य व्यवस्था कायम ठेवीत त्याने चंगेज खानाप्रमाणेच क्रूरता व निष्ठुरतेच्या कुबड्या घेत अनेक प्रदेश काबीज केले.
१३८० ते १३८७ या कालावधीत मध्य तसेच पश्चिम आशियात आपला राज्यविस्तार वाढवीत खुरासान, सीस्तान, अफगानिस्तान, फारस, अजरबैजान आणि कुर्दीस्तान येथील प्रदेश काबीज केला. सन १३९३ मध्ये बगदाद ते मेसोपोटामिया येथे देखील त्याने विजय मिळविला. या संपूर्ण विजयानंतर भारताकडे मोर्चा वळविण्याचे त्याने ठरविले.
तैमूर लंगचे साम्राज्य
भारतावरील स्वारी व लूटमार
इस्लामचा प्रसार हेच भारतावर स्वारी करण्याचे मुख्य कारण होते. तसेच येथील संपत्तीची आणि संस्कृतीची लूट करण्याचाही हेतू होता. येथील प्राचीन संस्कृती, सोने, वैभव या सर्वांचा फायदा इस्लामला व्हावा म्हणुन भारतावर आक्रमणाची योजना त्याने आखली. त्यावेळी दिल्लीत तुघलकांचे साम्राज्य होते. सन १३९८ सालच्या सुरुवातीस आपला नातू पीर मोहम्मद यास मुलतान जिंकायला त्याने पाठविले. काही महिन्यांच्या संघर्षानंतर पीर मोहम्मदने मुलतान काबीज केले. एप्रिल १३९८ ला तैमुर लंग स्वत: समरकंदहून प्रचंड सैन्यानिशी भारतावर स्वारी करण्यास आला.
येथे सिंधू, झेलम, रावी नदीचा प्रदेश जिंकून मुलतान जवळील ‘तुलुम्बा’ नगर त्याने काबीज केले. तेथे लूटमार, हजारोंची हत्या तसेच घरांची जाळपोळ करून अनेकांना गुलाम बनवून पुढे भटनेर येथे पाठवून दिले. भटनेर येथे पुन्हा महिनाभर कत्तल, जाळपोळ, लूटमार तसेच धर्म परिवर्तनाचे सत्र सुरूच होते. त्यानंतर त्याने दिल्ली काबीज करण्याच्या दृष्टीने कूच केली. पानीपत येथे १७ डिसेंबर १३९८ रोजी ४०,००० पायदळ, १०,००० घोडदळ तसेच १२० हत्ती असलेल्या सेनेसह तुघलक बादशाहचा पराभव केला. दिल्लीची गादी काबीज करताना दिल्ली नगरीत सलग १५ दिवस लूटमार व अत्याचाराचे सत्र सुरु ठेवले होते. त्यानंतर हेच सत्र क्रमश: मेरठ, हरिद्वार, कांगडा तसेच जम्मू येथे गिरवून, तब्बल २ लाख लोकांची कत्तल करून सोबत अनेक महिला, बालक तसेच शिल्पकारांना घेऊन सिंधू नदीच्या मार्गाने मायदेशी परतला.
भारताबद्दलचा दृष्टीकोन
तैमुरलंगने आपल्या आत्मचरित्र ‘तुजूक-ए-तैमुरी’ ची सुरुवात कुरणाच्या एका आयतांपासून केली आहे ज्यात नमूद केले आहे की “हे पैगंबरा काफीर आणि अविश्वासू लोकांशी युद्ध करणे व त्यावर आपली अधिसत्ता गाजविणे हे माझे आद्य कर्तव्य आहे.” यापुढे भारताबद्दल लिहिताना तो म्हणतो की, “भारतावर माझे आक्रमण केवळ तेथील हिंदूंसाठी एक धार्मिक युद्ध आहे, तेथे इस्लामची प्रतिस्थापना होऊन हिंदूंचे वैभव इस्लामला उपभोगता आले पाहिजे हा एकच माझा हेतू आहे.” भटनेरच्या स्वारीत तेथील राजपुतांनी काही वेळ आक्रमण थोपविल्यानंतर शेवटी स्वत: च पराभव मान्य करीत शरणांगती पत्करली. त्यांना क्षमादान देखील दिले गेले मात्र काही तासानंतर बेसावधपणे पुन्हा हल्ला करून पुढील एका तासात १०,००० राजपूत हिंदूंची निर्घुण हत्या केली गेली.
क्रूर तैमूर
तैमुरलंग स्वत:ला महाक्रूर चंगेज खान याचा वंशज म्हणवत असे. परंतु प्रत्यक्षात तो तुर्की घराण्यातील वंशज होता. स्वत:ला ‘युद्ध जनक’ म्हणवत. लोकांची निर्घुणतेने हत्या करणे त्याला पसंत होते. त्याच्या म्हणण्यानुसार धडापासुन शीर वेगळे करताना जे रक्त पडते ते जगातील सर्वात सुंदर दृश्य होते. नरमस्तकाचे अनेक ढिगारे पाहण्याची त्याला विशेष आवड होती. अश्या या क्रूर राक्षसाने १४ व्या शतकात इस्लामच्या नावाखाली सुमारे १ कोटी ७० लाख लोक मारली. ही संख्या त्या काळी एकूण जगातील लोकसंख्येच्या ५% एवढी होती. तैमुरलंगचा एकूण कार्यकाळ १३३६ – १४०५ एवढा होता. मुघल साम्राज्याचा संस्थापक बाबर हा देखील तैमुरलंग याचाच वंशज होता. त्यामुळे क्रूरता ही वंश परंपरेनेच मुघलांना मिळाली होती, असे म्हटल्यास अतिशयोक्ती ठरणार नाही.
जगाच्या इतिहासात जेव्हा-जेव्हा क्रूरतेचा विषय निघेल, तेव्हा -तेव्हा ‘तैमुरलंग’ हे नाव घेतल्या खेरीज ते काम पूर्ण होणार नाही. संपूर्ण जग कट्टरपंथीय इस्लामिकतेची कळ सोसतोय. इस्लामिक स्टेट नावाची संघटना मध्य आशियात आज काहुर माजवत असताना युरोप, रशिया, अमेरिकेसह भारत, बांग्लादेश, अफगाणिस्तान इत्यादी देश अशा प्रकारच्या दहशतवादाचे बळी पडलेले आहेत. परंतु हा दहशतवाद काही आधुनिक काळात जन्माला घातला गेलेला नाहीये, याची पाळं-मूळं हजारो वर्षांपासून जगाचा इतिहास रक्ताने माखलेली आहेत...
अशा एका नरराक्षसाचा इतिहास या लेखात देण्याचा प्रयत्न आहे.या लेखाचा सध्या घडत असलेल्या सैफ – करीना यांच्या मुलाच्या नावाच्या गोंधळाशी काहीही संबंध नाहीये. तसे आढळून आल्यास तो निव्वळ योगा-योग समजावा.
- हर्षल कंसारा