मुंबई : जनसामान्यांच्या समस्यांकडे तात्काळ लक्ष देत त्यांचे निवारण करण्याच्या उद्देशाने ‘म्हाडा’च्या मुंबई इमारत दुरूस्ती व पुनर्रचना मंडळातर्फे नुकतेच दुसर्या जनता दरबार दिनाचे आयोजन करण्यात आले. वांद्रे (पूर्व) येथील म्हाडा मुख्यालयातील भारतरत्न गुलजारीलाल नंदा सभागृहात झालेल्या या विशेष उपक्रमात, मुंबई इमारत दुरूस्ती व पुनर्रचना मंडळाचे मुख्य अधिकारी मिलिंद शंभरकर यांच्या अध्यक्षतेखाली एकूण २७ तक्रार अर्जांवर सुनावणी करण्यात आली.शंभरकर यांनी सर्व अर्जदारांच्या समस्यांचे त्वरित निराकरण करत अर्जदारांच्या मागण्या व प्रलंबित कामे तत्परतेने सोडविण्याचे निर्देश संबंधित विभागाच्या अधिकार्यांना दिले.
या जनता दरबार दिनात, पुनर्विकासासाठी गेलेल्या उपकरप्राप्त इमारतीतील मूळ भाडेकरू/रहिवासी यांची नावे वगळली जाणे, विकासकाकडून भाडे न मिळणे, पुनर्विकासासाठी ना हरकत प्रमाणपत्र प्रलंबित असणे, सदनिका हस्तांतरित करतेवेळी इतर वारसांचे ना-हरकत प्रमाणपत्र घेतलेले नसणे, वारस म्हणून नाव लावणे, म्हाडा सर्वेक्षणानंतर भाडेकरू/रहिवासी असल्याची प्रमाणित प्रत देणे आदी मुद्यांवरील तक्रारी प्राप्त झाल्या. शंभरकर यांनी सर्व अर्जदारांचे म्हणणे सहानुभूतीपूर्वक ऐकून घेऊन, संबंधित अधिकाऱ्यांना तात्काळ व योग्य कार्यवाही करण्याचे स्पष्ट निर्देश दिले.