कल्याण : डोंबिवलीसह कल्याण आणि टिटवाळा या कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रातल्या शहरांना जोडण्यासाठी आणि गतीमान प्रवास सहज व्हावा यासाठी उभारला जाणारा महत्वाकांक्षी कल्याण रिंग रोड प्रकल्पाला गती देण्यासाठी त्याच्या टप्पा - २ मध्ये आरेखनात बदल करण्याचा निर्णय मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने घेतला आहे. टप्पा - २ या शीळ रस्ता ते मोठागाव पर्यंतच्या टप्प्यात अनेक ठिकाणी भूसंपादन करावे लागणार असल्याने त्यात मोठा वेळ जाण्याची शक्यता होती. त्यामुळे आरेखनात बदल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
मुंबई महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून आणि कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांच्या संकल्पनेतून कल्याण रिंग रोड प्रकल्प उभारला जात आहे. यातील एकूण आठ टप्प्यांपैकी चार टप्प्यांचे (दुर्गाडी ब्रिज ते एसएच ३५-४० रोड जंक्शन) काम पूर्ण झाले. उर्वरित टप्पेही जलदगतीने पूर्ण करण्यासाठी एमएमआरडीए आणि कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या वतीने वेगाने हालचाली सुरू आहेत. असे असतानाचा आता या प्रकल्पातील टप्पा २ (शीळ रोड ते मोठागाव ब्रीज) या मार्गाच्या आरेखनात बदल करण्यात येणार आहे. या नियोजित मार्गाच्या उभारणीसाठी मोठ्या प्रमाणात भूसंपादन करावे लागत असल्याने अनेक अडचणी येत आहे. यातील विलंब टाळण्यासाठी या टप्प्याची खाडी शेजारी असलेल्या मोकळ्या जागेतून उभारणी करण्यात येणार आहे. त्यासाठी मोठ्या निधीचीही गरज लागणार नाही. तसेच या प्रक्रियेत वेळही वाचणार आहे. याबाबत नुकत्याच पार पडलेल्या एमएमआरडीएच्या बैठकीत खासदार डॉ. शिंदे यांनी सूचना दिल्या आहेत. एमएमआरडीएचे महानगर आयुक्त संजय मुखर्जी यांनीही या प्रस्तावाला दुजोरा दिला आहे.
कल्याण लोकसभा मतदारसंघातील वाहतुकीला नवा आयाम देणारा कल्याण रिंग रोड प्रकल्प मार्गी लागत आहे. डोंबिवली आणि टिटवाळा या दोन्ही शहरांतील अंतर कमी करण्यासाठी हा मार्ग महत्वाचा ठरणार आहे. या प्रकल्पाची आठ टप्प्यांमध्ये उभारणी करण्यात येत आहे. यातील टप्पा - ४ (दुर्गाडी ब्रिज ते गांधारे ब्रिज), टप्पा - ५ (गांधारी ब्रिज ते मांडा जंक्शन), टप्पा - ६ (मांडा जंक्शन ते टिटवाळा जंक्शन), टप्पा - ७ (टिटवाळा जंक्शन ते एसएच ३५-४० रोड जंक्शन) या टप्प्यांचे काम ९५ टक्के पूर्ण झाले असून यातील बहुतांश रस्ता सध्या वापरला जातो आहे. टप्पा - ३ (मोठा गाव ते गोविंदवाडी रोड) या रस्त्याचे काम प्रगतीपथावर असून येत्या काही महिन्यात याचे काम पूर्णत्वास जाणार आहे. तर यातील टप्पा - १ (हेदुटणे ते शिळ रोड) या मार्गाच्या उभारणीसाठी लागणाऱ्या जागेचे भूसंपादन सुरु आहे. तर टप्पा - २ (शीळ रोड ते मोठागाव ब्रीज) या नियोजित मार्गात भूसंपादनात अनेक अडथळे असल्याने या मार्गाच्या उभारणीस विलंब होत असल्याचे निदर्शनास आले आहे. याच पार्श्वभूमीवर टप्पा दोनचे आरेखन नव्याने करण्यात येणार आहे.
काटई ते टिटवाळा अंतर होणार कमी
या मार्गामुळे काटई - टिटवाळा हे एक तासाचे अंतर अवघ्या १५ ते २० मिनिटांवर येणार आहे. तर अवजड वाहनांची वाहतूक देखील या मार्गावरून होणार असून शहरातील वाहतूक व्यवस्थेवर भार येणार नाही. यामुळे शहरांतर्गत वाहतुकीला गती मिळेल. तर या प्रकल्पाच्या पूर्णत्वानंतर शहरी आणि ग्रामीण भागातील वाहतूक सेवा अधिक सोयीची आणि गतिमान होणार आहे.
दरम्यान पुढील टप्प्यांमधील अतिक्रमणे हटवून रस्त्याला गती देण्याचीही सूचना डॉ. शिंदे यांनी यावेळी केल्या आहेत.