दि.बा. पाटील नावाच्या नामकरणासाठी ११०० वाहनांची भव्य रॅली
25-Jun-2025
Total Views | 11
नवी मुंबई, लोकनेते दि.बा. पाटील यांच्या १२व्या स्मृतिदिनानिमित्त, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला त्यांचे नाव देण्याच्या मागणीस बळकटी देण्यासाठी मंगळवारी एक भव्य वाहन रॅलीचे आयोजन करण्यात आले. “दि.बा. पाटील नामकरण समर्थनार्थ भव्य कार, बाईक आणि रिक्षा रॅली” या उपक्रमाचे आयोजन लोकनेते दि.बा. पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ नामकरण सर्वपक्षीय कृती समितीच्या वतीने करण्यात आले.
वाशी सिडको एक्झिबिशन सेंटरपासून सकाळी ११.३० वाजता सुरू झालेल्या या रॅलीमध्ये सुमारे ८०० कार, ३०० बाईक व रिक्षा अशा एकूण ११०० हून अधिक वाहने सहभागी झाली. ही रॅली पाम बीच रोड, रेतीबंदर विमानतळ गेट, बाह्यवळण मार्ग व चिंचपाडा-करंजाडे येथील कालभैरव मंदिर मार्गे सुमारे २० किलोमीटर अंतर पार करत शांततेत संपन्न झाली.
रॅलीत पालघर, ठाणे, मुंबई, उपनगर, रायगड व नवी मुंबई या सागरी पट्ट्यातील गावागावांतून स्थानिक भूमिपुत्र, कार्यकर्ते, समाजबांधव आणि दि.बा. पाटील यांचे समर्थक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
सदर विमानतळाचे “लोकनेते दि.बा. पाटील” असे नामकरण व्हावे, यासाठी राज्य सरकारने सर्व प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण केल्या असून, नामनिर्देशन प्रस्ताव केंद्र सरकारकडे सादर केला आहे. मात्र केंद्र स्तरावर सदर प्रस्ताव अद्याप प्रलंबित असल्यामुळे, विमानतळ सुरू होण्याआधी अधिसूचना जारी व्हावी, अशी अपेक्षा रॅलीच्या पार्श्वभूमीवर उपस्थितांकडून व्यक्त झाली.
ही रॅली कृती समितीचे अध्यक्ष दशरथ दादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली पार पडली. या वेळी भिवंडीचे खासदार बाळ्या मामा सुरेश म्हात्रे, युवा नेते वैभव नाईक, माजी आमदार बाळाराम पाटील, राजेंद्र पाटील, आगरी कोळी यूथ फाऊंडेशनचे निलेश पाटील, सिडको प्रकल्पग्रस्त कृती समितीचे मनोहर पाटील, नवी मुंबई २९ गाव समितीचे दीपक पाटील, २७ गाव संघर्ष समितीचे नंदराज मुंगाजी, संजय घरत यांच्यासह सर्व सहकारी, पाचही जिल्ह्यांतील विविध संघटनांचे प्रतिनिधी, आजी-माजी नगरसेवक आणि हजारो दि.बा. समर्थक सहभागी झाले होते.
कार्यक्रमाच्या शेवटी दिव्यदीप फाऊंडेशन, आगरी कोळी यूथ फाऊंडेशन, २७ गाव सर्वपक्षीय समिती, पत्रकार, पोलीस प्रशासन आणि सहभागी सर्व गावांतील कार्यकर्ते, संघटनांचे विशेष आभार मानण्यात आले.या रॅलीच्या माध्यमातून नामकरणाच्या मागणीचे गांभीर्य अधोरेखित झाले असून, स्थानिकांच्या भावनेला केंद्र सरकारने दाद द्यावी, अशी भूमिका उपस्थितांमध्ये दिसून आली.
"या पार्श्वभूमीवर आम्ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देत स्पष्ट मागणी केली आहे की, लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला देण्याचा प्रस्ताव राज्य सरकारकडून जलद गतीने केंद्राकडे पाठवावा. लाखो भूमिपुत्रांच्या अस्मितेशी निगडित असलेल्या या मागणीला केंद्र सरकारने तत्काळ मान्यता द्यावी, ही जनतेची तीव्र भावना आहे."
– दशरथ दादा पाटील अध्यक्ष लोकनेते दि बा पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ सर्वपक्षीय कृती समिती