नवी दिल्ली, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी आणीबाणीला ५० वर्षे पूर्ण झाल्याच्या औचित्याने आणीबाणीस भारताच्या लोकशाही इतिहासातील ‘काळा अध्याय’ आणि ‘संविधान हत्येचा दिवस’ असे संबोधले. आणीबाणीविरुद्ध लढणाऱ्यांना त्यांनी नमन केले आणि नागरिकांच्या लढ्यामुळेच काँग्रेसला आपली हुकूमशाही सोडावी लागल्याची आठवण करून दिली.
आणीबाणी लागू करण्यात आली त्या दिवसाला पन्नास वर्षे पूर्ण झाल्याचे औचित्य साधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाच्या इतिहासातील या सर्वात अंधःकारमय कालखंडात लोकशाहीच्या रक्षणासाठी उभे राहिलेल्या असंख्य भारतीयांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. राज्यघटनेच्या मूल्यांवर झालेल्या गंभीर हल्ल्याची आठवण करून देत पंतप्रधान म्हणाले की, ज्या दिवशी मूलभूत अधिकार स्थगित केले गेले, वृत्तपत्र स्वातंत्र्याची पायमल्ली करण्यात आली त्याचबरोबर असंख्य राजकीय नेते, सामाजिक कार्यकर्ते, विद्यार्थी आणि सामान्य नागरिकांना तुरुंगात टाकले गेले तो 25 जून हा संविधान हत्या दिवस म्हणून पाळला जातो.
आपल्या राज्यघटनेतील तत्त्वांना बळकटी देण्याच्या आणि विकसित भारताचे आपले स्वप्न साकार करण्यासाठी एकत्रितपणे काम करण्याच्या वचनबद्धतेचाही मोदींनी पुनरुच्चार केला. आणीबाणीच्या विरोधातील चळवळ हा एक शिकण्याजोगा अनुभव होता, या चळवळीने आपल्या लोकशाही चौकटीचे जतन करण्याची चेतना पुन्हा दृढ केली गेली, असेही ते पुढे म्हणाले. 1975 ते 1977 या लाजिरवाण्या कालखंडाबद्दल तरुणांमध्ये जाणीव निर्माण करण्यासाठी, ज्यांना ते आणीबाणीचे काळे दिवस आठवत असतील अशांनी किंवा ज्यांच्या कुटुंबीयांना त्या काळात त्रास सहन करावा लागला अशा सर्वांनी आपले अनुभव समाज माध्यमांवर सामायिक करण्याचे आवाहनही पंतप्रधान मोदींनी केले.
रा. स्व. संघाचा प्रचारक म्हणून खूप काही शिकलो – पंतप्रधान
ज्यावेळी आणीबाणी लादली गेली तेव्हा मी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा प्रचारक होतो. आणीबाणी विरोधातील चळवळ म्हणजे माझ्यासाठी शिकण्याचा अनुभव होता. त्यामुळे आपल्या लोकशाही चौकटीचे जतन करण्याची चेतना अधिक दृढ झाली. त्याच वेळी, मला राजकीय क्षेत्रातील लोकांकडून खूप काही शिकायला मिळाले, अशी विशेष आठवणही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी सांगितली आहे.
पंतप्रधानांच्या अनुभवांचे पुस्तकरुपाने प्रकाशन
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आणीबाणीच्या काळातील निवडक अनुभवांचे ब्लूक्राफ्ट डिजिटल फाउंडेशनतर्फे पुस्तकात रुपांतर करण्यात आले आहे. 'द इमरजेंसी डायरिज: इयर्स दैट फोर्ज्ड एक लीडर' असे या पुस्तकाचे नाव असून त्याचे पुस्तकाचे प्रकाशन केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांच्या हस्ते झाले. यावेळी केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव, दिल्लीचे उपराज्यपाल व्ही. के. सक्सेना आणि दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता उपस्थित होत्या.
केंद्रीय मंत्रिमंडळात निषेध ठराव मंजुर
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत आणीबाणीचा निषेध करणारा ठराव मंजुर करण्यात आल्याचे केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले. या घटनेची आठवण म्हणून केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत दोन मिनिटांचे मौन पाळण्यात आले तसेच आणीबाणीमध्ये ज्यांचे राज्यघटनेने दिलेले लोकशाही अधिकार हिरावून घेतले गेले आणि ज्यांच्यावर अनन्वित अत्याचार करण्यात आले अशा व्यक्तींना श्रद्धांजलीही वाहण्यात आली. केंद्रीय मंत्रिमंडळाने त्यांच्या असाधारण धैर्याला आणि आणीबाणीच्या अतिरेकाला खंबीरपणे प्रतिकार करण्यासाठी त्यांनी दाखवलेल्या धैर्याला अभिवादन केले.