पावसाळ्यात सुरळीत वीजपुरवठा व सुरक्षेला सर्वाधिक प्राधान्य द्या अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांचे निर्देश

    19-Jun-2025
Total Views | 8


नाशिक/कल्याण : सध्या मान्सून सक्रीय झाला असून पावसाळ्यात ग्राहकांना सुरळीत वीज पुरवठा देण्यासोबतच ग्राहक व कर्मचारी यांच्या विद्युत सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य द्यावे. त्यासाठी स्थानिक पातळीवर तात्काळ उपाययोजना कराव्यात. कोणत्याही कारणामुळे वीज पुरवठा खंडित झाल्यास पर्यायी स्वरूपात किंवा दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर करून खंडित विजेचा कालावधी कमीत कमी राहील याची दक्षता घ्यावी असे निर्देश महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी बुधवारी (दि. १८) दिले.

नाशिक विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात महावितरणच्या कोकण प्रादेशिक विभागातील नाशिक, जळगाव, भांडूप, कल्याण व रत्नागिरी परिमंडलातील विविध कामांचा श्री. लोकेश चंद्र यांनी आढावा घेतला. यावेळी सहव्यवस्थापकीय संचालक दिलीप जगदाळे, संचालक (प्रकल्प/संचालन) सचिन तालेवार, संचालक (मानव संसाधन) राजेंद्र पवार, कार्यकारी संचालक प्रसाद रेशमे यांची उपस्थिती होती.

या आढावा बैठकीमध्ये लोकेश चंद्र यांनी फीडर मिटरिंग, नेटवर्क प्लॅनिंग, अधिक वीजहानीच्या उच्चदाब वाहिन्या, प्रधानमंत्री सूर्यघर योजना, मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.०, मान्सूनपूर्व देखभाल व दुरुस्ती, नवीन वीजजोडण्या, सौरग्राम, विद्युत वाहनांचे चार्जिंग स्टेशन्स, टीओडी मीटर आदींचा त्यांनी सविस्तर आढावा घेतला.

कोकण प्रादेशिक विभागामध्ये नाशिक व जळगाव परिमंडळामध्ये वीज देयकांची सर्वाधिक थकबाकी आहे. त्यामुळे या दोन्ही परिमंडलासह इतर ठिकाणी देखील थकबाकीसह चालू वीजबिलांची १०० टक्के वसूली करणे क्रमप्राप्त आहे. महावितरणच्या आर्थिक स्थैर्यासाठी वीजबिल वसूलीशिवाय अन्य कोणताही पर्याय नाही. त्यामुळे वाढणारी थकबाकी ही चिंतेची बाब आहे. गेल्या दोन महिन्यांमध्ये अपेक्षित वसूली झालेली नाही. त्यामुळे थकबाकी वसूलीमध्ये कोणत्याही प्रकारची हयगय खपवून घेतली जाणार नाही असे श्री. लोकेश चंद्र यांनी स्पष्ट केले.

ते पुढे म्हणाले, प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेद्वारे सौरग्राम योजनेला मोठे पाठबळ मिळत आहे. सर्वच घरगुती ग्राहकांना प्रधानमंत्री सूर्यघर योजनेचा लाभ घेऊन स्वतःच्या गावाला सौरग्राम करता येणे सहजशक्य आहे. तसेच या योजनेतून पुढील २५ वर्ष मोफत वीज घरगुती ग्राहकांना उपलब्ध होणार आहे. प्रधानमंत्री सूर्यघर योजना व सौरग्रामचा लाभ मिळवून देण्यासाठी महावितरणचे स्थानिक अभियंता, अधिकारी व कर्मचाऱ्यांनी गावागावांमध्ये प्रबोधन करावे अशी सूचना श्री. लोकेश चंद्र यांनी दिली.

या आढावा बैठकीला कोकण प्रादेशिक विभागातील मुख्य अभियंते सुंदर लटपटे (नाशिक), इब्राहीम मुलाणी (जळगाव), चंद्रमणी मिश्रा (कल्याण), संजय पाटील (भांडूप) व अनिल डोये (रत्नागिरी) यांच्यासह सर्व अधिक्षक अभियंते, कार्यकारी अभियंते व अधिकारी उपस्थित होते.
'मुंबई तरुण भारत'चं व्हॉट्सअप चॅनल फॉलो करा!
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121