‘डाव्या विचारसरणीचे आंतरराष्ट्रीय उपद्व्याप’वर व्याख्यान
17-Jun-2025
Total Views | 8
मुंबई: ‘सुषमा स्वराज मंचा’च्या बोरिवलीतील व्यासपीठावर अटल स्मृती उद्यानात दि. 15 जून रोजी सकाळी ‘डाव्या विचारसरणीचे आंतरराष्ट्रीय उपद्व्याप’ या विषयावर अभिजीत जोग यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. दीपप्रज्वलनासाठी विशेष अतिथी म्हणून अभिनेते शरद पोंक्षेही उपस्थित होते, तर कार्यक्रमाला ब्रह्मविद्येचे विश्वस्त तथा उद्योजक रमेश करंदीकर हे अध्यक्ष म्हणून लाभले होते.
मुख्य व्याख्यानात लेखक-विचारवंत अभिजीत जोग यांनी श्रोत्यांना वास्तविकतेचे भान दिले. संपूर्ण जगभरात उपद्रवी डावी विचारसरणी कशाप्रकारे पसरवली जात आहे, याचा गेल्या अनेक दशकांपासूनचा इतिहासच सप्रमाण सादर केला. डाव्यांचा नवा शब्दकोश उलगडून नव्याने जन्माला आलेले शब्द (इस्लामोफोबिया, कॅन्सल कल्चर), विचारप्रणाली आणि त्यांचा अर्थ स्पष्ट केला. दशकानुदशके विशिष्ट विचारप्रणाली राबवून, जागतिक स्तरावर फेमिनिझमसारखे अनेक बागुलबुवा कसे निर्माण केले गेले, त्यांच्या विविध स्तरांवर उद्रेकबिंदू कसे प्रस्थापित केले? याची जाणीव करून दिली. पूर्वी केवळ आर्थिक तफावत असलेला गरीब-श्रीमंत भेद जगजाहीर होता.
त्याच्या जोडीला त्याच्याहून टिकाऊ असे वर्णद्वेष, धर्मद्वेष, जातिद्वेष, लिंगद्वेष निर्माण केले गेले. त्याचे ‘वोकीझम’ हे आजचे स्वरूप किती भयानक आणि भीतीदायक आहे, याची प्रखरता जोग यांनी विशद केली. काळाला पुरून उरलेल्या मानवी उत्क्रांतीतून जन्मलेल्या, बौद्धिक आणि सामाजिक उत्क्रांतीतून निर्माण झालेल्या संस्कृती, कुटुंबसंस्था, लग्नसंस्था, कशा तर्हेने पोखरून कुचकामी बनत आहेत याची दाहकताही त्यांनी पटवून दिली.