विरार-डहाणू रेल्वे चौपदरीकरणातील बाधितांना दिलासा

सानुग्रह अनुदान देण्याचे मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे आदेश

    07-May-2025   
Total Views | 17
Virar Dahanu railway lines to get extended
मुंबई : विरार – डहाणू रोड रेल्वे चौपदरीकरण व रेल्वे कारशेड बांधण्यासाठी प्रकल्पामधील सर्व्हे न. २१६ आसनगाव येथील कुटुंबे बाधीत होत आहेत. सुमारे ३० हेक्टर जागा संपादन करावयाची असून यामध्ये जे बाधीत होतील त्यांना सानुग्रह अनुदान देण्यात यावे. याबाबत जिल्हा स्तरावर बैठक आयोजित करुन त्याचा अहवाल सादर करण्यात यावा, असे आदेश महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी बुधवार, दि. ७ मे रोजी दिले.
विरार-डहाणू येथील बाधित कुटुंबासोबतच इतर विषयांसंबंधात महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मंत्रालयातील दालनात आयोजित बैठकीवेळी महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी हे आदेश दिले. बैठकीला आमदार मनिषा चौधरी, ठाणे आणि पालघरचे जिल्हाधिकारी आदी उपस्थित होते.
बावनकुळे म्हणाले, रेल्वेसाठी जमीन अधिग्रहीत केली जात असताना त्याठिकाणाच्या लोकांचे पुनर्वसन झाले पाहिजे. जर त्यांची घरे तिथे असतील तर त्याचा सर्व्हे करुन त्याचा योग्य मोबदला त्यांना मिळाला पाहिजे. जवळपास त्यांचे पुनर्वसन करता येईल का याचाही विचार होणे आवश्यक आहे. बाधीत प्रत्येक कुटुंबाला किमान एक हजार स्क्वेअर फूट जागा उपलब्ध करुन दिली पाहिजे. यासाठी नागपूरच्या मिहान प्रकल्पामध्ये ज्या पद्धतीने धोरण ठरविण्यात आले. त्यानुसार कार्यवाही करण्यात यावी.
गणेश मंदिर ट्रस्टबाबत चर्चेनंतर निर्णय

बोरीवली येथील टीपीएस ३ भूखंडाला श्री गणेश मंदीर ट्रस्टचे नाव लावून जागा नियमित करण्यात यावी तसेच, १९७४ च्या टँक्स नियमावलीप्रमाणे कर आकारणी करण्यात यावी अशी मागणी देखील केली. याबाबत महसूलमंत्री बावनकुळे यांनी शासकीय जमिनीवर अतिक्रमण झाल्याचे दिसत असून नियमानुसार किती कर लागू होऊ शकतो याबाबत चर्चा करुन निर्णय घेतला जाईल, असे चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केले.
अधिवेशनापूर्वी एन. ए. टँक्सबाबत दुरुस्ती

मुंबई परिसरातील एन. ए. टँक्स रद्द करण्याचा निर्णय झाला आहे. मात्र, त्याचा अध्यादेश निघालेला नाही. त्याबाबतचा अध्यादेश काढण्याचीही मागणी चौधरी यांनी केली. यावेळी जुलैमध्ये होणाऱ्या अधिवेशनापूर्वी कायद्यामध्ये दुरुस्ती करुन याबाबत निर्णय घेण्याचे आश्वासन बावनकुळे यांनी दिले.
समुद्र किनाऱ्यावरील मच्छिमारांचा प्राधान्याने विचार

समुद्राच्या किनाऱ्यावर मच्छिमार समाजासाठी राखीव असलेली जागा गावठाणात समाविष्ट करण्याच्या प्रस्तावाबाबतही महसूलमंत्री बावनकुळे यांनी मच्छिमारांची सध्याची जागा ही सीआरझेडमध्ये येत असून समुद्राच्या कडेला गावठाण करणे शक्य नाही. यासाठी जवळपास जागा पाहून त्याठिकाणी म्हाडाच्या माध्यमातून त्यांचे पुनर्वसन करण्याचा प्रयत्न केला जाईल. तसेच जास्तीत जास्त मोबदला कसा देता येईल याबाबतही विचार करू, असे चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केले.

सुहास शेलार

'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' म्हणून कार्यरत. मुंबई विद्यापीठातून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. गेल्या आठ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत. महाराष्ट्राचे राजकारण आणि त्यासंबंधीच्या वृत्तांकनामध्ये विशेष रस. २०१४, २०१९ आणि २०२४ सालच्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांचे वार्तांकन. २०१८ साली राजस्थानमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या प्रत्यक्ष वार्तांकनाचा अनुभव.
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121