ट्विटर खरेदीमध्ये नुकसान झाल्याचा गुंतवणुकदारांचा दावा
08-Mar-2025
Total Views |
वॉशिंग्टन डीसी : जागतिक सर्वाधिक श्रीमंतांपैकी एक आणि जगप्रसिध्द वाहन कंपनी टेस्लाचे मालक एलॉन मस्क यांच्यावर गुंतवणुकदारांकडून खटला दाखल करण्यात आला आहे. गुंतवणुकदारांच्या आरोपांनुसार मस्क यांनी ट्विटर खरेदी करतेवेळी अनेकदा चालढकल केल्यामुळे गुंतवणुकदारांचे मोठे नुकसान झाले आहे. मस्का यांच्या चालढकलीमुळे त्यांना ट्विटर खरेदीचा सौदा स्वस्तात करता आला आणि त्यामुळे गुंतवणुकदारांचे नुकसान झाले. हे सर्व प्रकरण २०२२ मध्ये मस्क यांनी ट्विटर खरेदी केली तेव्हाचे आहे. यातून आता नव्या वादास मस्क यांना तोंड द्यावे लागणार हे निश्चित.
एलॉन मस्क यांनी २०२२ मध्ये जगप्रसिध्द समाजमाध्यम कंपनी ट्विटर खरेदी केली होती. या खरेदीनंतर त्यांनी त्याचे नाव बदलून एक्स कॉर्प असे केले होते. हा व्यवहार पूर्ण होईपर्यंत खूप रेंगाळला होता. शेवटी मस्क यांनी हा व्यवहार पूर्ण करताना ४४ अब्ज अमेरिकी डॉलर्सना ट्विटर खरेदी केले. त्यावेळी असाही आरोप झाला होता की ट्विटरची मूळ किंमत ही २० अब्ज डॉलर्स इतकीच असताना त्यांनी ही कंपनी ४४ अब्ज डॉलर्सना का विकत घेतली होती.
अमेरिकी शेअर बाजार नियामक संस्था एसईसीने मस्क यांच्यावर जानेवारी मध्ये खटला दाखल केला. त्यांच्याकडून केल्या गेलेल्या आरोपांनुसार मस्क हे सर्वांच्या नकळत ट्विटर मधील हिस्सा कमी किंमतीत खरेदी करत आहेत. त्यांच्या या कारवायांमुळे ट्विटरमधील इतर गुंतवणुकदारांना कमी किंमतीत त्यांचे शेअर्स विकावे लागत असल्याने त्यांचे १५० अब्ज डॉलर्सचे नुकसान झाले आहे.
जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींमध्ये गणती होणाऱ्या मस्क यांच्यावर इतरही असेच खटले सुरु असल्याची माहिती मिळत आहे. सध्या मस्क हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रमुख सल्लागारांपैकी एक आहेत.