उद्योग क्षेत्राचे भवितव्य आता कृत्रिम बुध्दीमत्ताच ठरवणार – कौस्तुभ धवसे

कृत्रिम बुध्दिमत्ता उद्योगाकडे विशेष लक्ष देण्याची गरज तज्ज्ञांकडून अधोरेखित

    12-Mar-2025
Total Views |
 
kaustubh
 
 
 
मुंबई : कुठल्याही उद्योगाला आता कृत्रिम बुध्दीमत्तेच्या वापरापासून वेगळे राहता येणार नाही असे प्रतिपादन करत महाराष्ट्र राज्याचे सहसचिव व मुख्यमंत्र्यांचे ओएसडी कौस्तुभ धवसे यांनी केले आहे. कृत्रिम बुध्दीमत्ता आणि भारतीय उद्योगाची पुनर्रचना याविषयावर परिसंवाद आयोजित करण्यात आला होता. या परिसंवादात कौस्तुभ बोलत होते. भारतातील विविध क्षेत्रातील उद्योगांना आपल्या व्यवसायवृध्दीचे व्यासपीठ उपलब्ध करुन देण्यासाठी प्रसिध्द असलेल्या ‘टाय २०२५’ याएक्सपोचे आयोजन मुंबईत करण्यात आले आहे. यातच उद्योजकांना मार्गदर्शन ठरु शकतील असे विविध विषयांवरच्या परिसंवादांचे आयोजन करण्यात आले होते.
 
महाराष्ट्र हे कृत्रिम बुध्दीमत्तेचे उद्योग क्षेत्रासाठी असलेले महत्व ओळखणारे पहिले राज्य आहे. याच कृत्रिम बुध्दीमत्तेच्या प्रसारासाठी लागणारे वातावरण तयार करण्यातही महाराष्ट्र अग्रेसर राज्य आहे. यासाठी कुशल मनुष्यबळाची आवश्यकता आहे. राज्य प्रशासन हे या तंत्रज्ञानाच्या वापराबाबत आग्रही आहे तसेच त्यासाठी लागणारे कुशल मनुष्यबळ पुरवण्यासाठीही राज्य प्रशासन प्रयत्न करत आहे असे कौस्तुभ यांनी सांगीतले. नुकत्याच झालेल्या दावोस परिषदेतही महाराष्ट्रातील कृत्रिम बुध्दीमत्ता उद्योगांत मोठ्या प्रमाणावर गुंतवणुक मिळवण्यात यश मिळाले आहे. प्रशासन म्हणून या सर्व उद्योगांना पूरक वातावरण तयार करण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत असे कौस्तुभ यांनी आपली भूमिका मांडताना सांगीतले.
 
या परिसंवादात कृत्रिम बुध्दीमत्ता उद्योगासाठी देशात पूरक वातावरण अद्याप निर्माण झालेले नाही याची खंत या क्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्त केली. या क्षेत्राबद्दल आजही उद्योगक्षेत्रासह सामान्य जनतेमध्येही थोडे गैरसमज आहेत याकडे तज्ज्ञांनी लक्ष वेधले. डेटा सेंटर्स, तसेच कृत्रिम बुध्दीमत्ता या विषयावर देशात धोरणात्मक पातळीवर होणारी सकारात्मक चर्चा याबद्दल निश्चित समाधान व्यक्त केले गेले. या परिसंवादात कौस्तुभ यांच्यासह नेसा नेटवर्कचे अध्यक्ष शरद संघवी, महिंद्रा समुहातील कृत्रिम बुध्दीमत्ता विभागचे मुख्य कार्यकारी अधिकारी भुवन लोढा, इंडिया एआयचे सल्लागार आर्कित वैश, एआय अँड बियाँडचे सहसंस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी जसप्रित बिंद्रा हे सहभागी झाले होते.