वनवासी पाड्याच्या सर्वांगीण विकासासाठी ‘जीवन आधार संस्था’ कार्यरत आहे. या संस्थेने दोन वनवासी पाडे दत्तक घेतले आहेत. तसेच, डोंबिवली शहरातील एक शाळा दत्तक घेतली आहे. यानिमित्ताने संस्थेच्या कार्यावर टाकलेला प्रकाश.
भारतीय आयुर्विमा महामंडळा’च्या डोंबिवली शाखेत ‘एलआयसी असोसिएट’ या पदावर कार्यरत असलेले उमेश चव्हाण यांनी ‘जीवनआधार’ची स्थापना केली. चव्हाण यांच्यासोबत त्यांचे १०० एजंट सहकारीदेखील या संस्थेशी जोडलेले आहेत. जीवनविमा संबंधीची नेहमीची कामे सांभाळून ते ‘जीवनआधार’चे काम पाहतात. ‘जीवनआधारा’च्या स्थापनेमागे ही एक रंजक कथा आहे. चव्हाण याची कन्या ऐश्वर्या हिला गरिबांविषयी नेहमीच कणव वाटत असे. ती आपले खाऊचे पैसे भिक्षेकरांना देत असे. एका काश्मीरभेटीत तिने वडिलांना गरीब काश्मिरी मुलांना मदत करायला लावली. ऐश्वर्याला दहावीला ९२ टक्के गुण मिळाल्यानंतर, “तुला काय बक्षीस देऊ?” अशी विचारणा चव्हाण यांनी केली. त्यावर ऐश्वर्या यांनी “मला काही नको, त्याऐवजी आपण गरिबांसाठी एक संस्था स्थापन करून तिच्यामार्फत समाजसेवा करूया,” असे सांगितले. चव्हाण यांना ही संकल्पना आवडली. त्यांनी ती आपल्या एजंटसमोर बोलून दाखवली. त्यांच्या या संकल्पनेला सगळ्या एजंटनी बळ दिले आणि दि. १९ फेब्रुवारी २००९ रोजी ‘जीवनआधार’ आकारला आली. संस्थेचे उद्घाटन एलआयसी डोंबिवली शाखेचे शाखा प्रबंधक विजयकुमार कोरडे यांच्या हस्ते करण्यात आले. एलआयसीमधील ‘जिंदगी के साथ भी, जिंदगी के बाद भी’ यावरून ‘जिंदगी’ या शब्दाचे मराठीत रूपांतर करत ’जीवन’ हा शब्द घेऊन ‘जीवनआधार’चे नामकरण झाले. ‘आपण समाजाचे देणे लागतो,’ या भावनेतून संस्थेची स्थापना केली. पण, नेमकी कोणाला कशी मदत करायची, हे काही निश्चित ठरलेले नव्हते. काही दिवस असेच सरत गेले. मग ठाणे जिल्ह्यात वनवासी समाज मोठ्या प्रमाणावर आहे. तेव्हा या समाजासाठी काम करूया, असे ठरले. त्यावर सगळ्यांचे एकमत झाले. त्यानंतर सर्व टीमच कामाला लागली. वनवासी भागांचे सर्वेक्षण करण्यात आले. त्यांच्या गरजा, संस्थेची मदत करण्याची क्षमता, त्याठिकाणी पोहोचायला लागणारा वेळ याचा एक आढावा घेण्यात आला. अंबरनाथ तालुक्यातील एक सामाजिक कार्यकर्ते सदानंद सुरोशे यांच्या रूपाने संस्थेला वनवासींमध्ये मिसळायला एक दुवा मिळाला. त्यांच्या मदतीने संस्थेने धामणवाडी, तारपाडा हे दोन पाडे दत्तक घेतले. या दोन्ही पाड्यांची लोकसंख्या ४००च्या घरात आहे. हे पाडे दत्तक घेतल्यानंतर संस्थेच्या कामाला एक निश्चित दिशा मिळाली. संस्थेने ही त्यांच्या कामावर लक्ष केंद्रित करण्यास सुरुवात केली.
‘जीवनआधार’तर्फे दरवर्षी दिवाळीला या पाड्यांवर फराळाचे वाटप केले जाते. या वनवासींना फराळ आणि दिवाळी या दोन्ही गोष्टी माहिती नसतात. या पाड्यावर वीज आहे. मात्र, त्यासाठी लागणारी जोडणी घेण्याचीदेखील या वनवासींची ऐपत नाही. रात्रीच्या वेळी याठिकाणी गुडूप अंधार असतो. त्यामुळे ‘जीवनआधार’ने या वनवासी पाड्यात पथदिवे बसविले. त्यामुळे या परिसरातून रात्रीच्या वेळी वावरणे सोपे झाले. या वनवासींमध्ये त्वचारोग जास्त दिसून येतात. म्हणून संस्थेतर्फे ‘त्वचारोग निदान शिबीर’ आयोजित करण्यात आले होते. तसेच, अलीकडील काळात एक ‘नेत्र चिकित्सा शिबिर’ आयोजित केले होते. या शिबिरातून २०० आदिवासींची नेत्रतपासणी करण्यात आली. त्यात ५० जणांना चष्मे वाटप करण्यात आले. पाड्यातील लोकांना चांगला रोजगार मिळावा, म्हणून संस्थेतर्फे ‘रोजगार मार्गदर्शन शिबीर’ घेण्यात आले. त्यात त्यांना जमतील अशा रोजगाराचे प्रशिक्षण देण्यात आले. काही वनवासी तरुणांनी त्याचा लाभ घेतला व ते आता अपारंपरिक व्यवसाय करू लागले आहेत. हे वनवासी काही प्रमाणात पशूपालन करतात. म्हणून संस्थेतर्फे पाळीव पशूंची निगा राखण्याबाबत एक शिबीर घेण्यात आले. या पाड्यावर शाळा नाही. तेथील मुलांना अगदी प्राथमिक शिक्षणासाठी चार किमी दूर दहिवलीच्या शाळेत जावे लागते. त्या शाळेत पिण्याच्या पाण्याची व प्रसाधनगृहांची सोय नव्हती. ती सोय ‘जीवनआधार’ने करून दिली. त्याचा लाभ शाळेतील सर्वच विद्यार्थ्यांना होतो. विशेष उल्लेखनीय गोष्ट म्हणजे, ‘जीवनआधार’चे कार्यकर्ते नियमितपणे एक संध्याकाळ या पाड्यावर घालवतात. त्यात या पाड्यातील मुलांना शिक्षणाची गोडी वाटावी म्हणून प्रश्नमंजुषा व क्रीडास्पर्धा घेण्यात येतात. विजेत्यांना त्याचक्षणी पारितोषिक दिले जाते. हा प्रयोग चांगलाचा यशस्वी ठरला आहे. संस्थेच्या कामाचे परिणाम आता दिसू लागले आहेत. विशेषत: वनवासी तरुणांमध्ये संस्थेबद्दल आत्मीयतेची जाणीव व तिच्या आधारे आपले जीवन सुधारण्याची जाणीव रुजली आहे.
ऐश्वर्या आता ‘एमएस डॉक्टर’ झाली असून, महाराष्ट्र सरकारच्या उल्हासनगर येथील सेंट्रल रुग्णालयात मेडिकल ऑफिसर या पदावर कार्यरत आहे. चव्हाण यांच्या पत्नी उमा या कल्याण येथील बिर्ला महाविद्यालयातून उपमुख्याध्यापिका या पदावरून सेवानिवृत्त झाल्या आहेत. त्यांचाही संस्थेच्या यशात मोठा सहभाग आहे. याशिवाय इतर सहकारी राहूल कराडकर, राजशेखर, प्रकाश हिंगणे, विनय तिरोडकर, मीना पाटील, वाय. एम. शर्मा, कविटकर, लांडगे, विद्या काळे, संदेश सुर्वे, दीपक ठक्कर, सरोज पवार, विनया शेलार, ज्योती चापेकर, राजश्री ठाकूर, मेघा सावंत, स्नेहा गाडगीळ, अनामिका खानोलकर, सुनेत्रा पाटकर, मानसी निंबकर, सोनाली दांडगे, सुविद्या संदेश सुर्वे, नितीन पिठाडिया, अतुल सावंत, संतोष कनोजिया, विजय महालकर, कृष्णा धरणे यांचा ही संस्थेच्या कार्यात मोलाचा वाटा आहे.
या पाड्यातील कार्य स्थिरावल्यानंतर संस्थेने तिच्या कार्याचा परीघ वाढवला. आता संस्थेने डोंबिवलीतील निम्नवर्ग वस्तीतील नगरपालिकेची आचार्य भिसे शाळा दत्तक घेतली आहे. शाळेतील विद्यार्थ्यांच्या घरात अभ्यासाचे वातावरण नसते. त्यांना अभ्यासाची गोडी वाटावी म्हणून संस्था शाळेमध्ये अनेक स्पर्धा घेते. विद्यार्थ्यांशी संवाद साधते. संस्थेतर्फे दरवर्षी गरीब विद्यार्थ्यांना मोफत वह्या वाटप करत असते. संस्थेने आजवर अनेक विद्यार्थ्यांना दत्तक घेऊन त्यांच्या उच्च शिक्षणाची सोय करून दिली आहे. गेल्या दहा वर्षांपासून संस्था अंध व्यक्तीसाठी काम करत आहे. दरवर्षी संस्थेतर्फे जागतिक पांढरी काठी दिनानिमित्त अंध बांधवांना पांढर्या काठीचे वाटप केले जाते. तसेच, ‘व्हिजन एनसाईट फाऊंडेशन’च्या अंध बांधव सभासदांना पुस्तकाचे वाचन ऐकता यावे याकरिता संस्थेतर्फे संगणक आणि ऑडिओ सिस्टीमची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. ‘व्हिजन एनसाईट फाऊंडेशन’च्यावतीने ‘जीवनआधार’ संस्थेने ज्या मातांना गतिमंद मुले आहेत, अशा ७० मातांनी ‘मातृ मोहविश्व’ या कार्यक्रमात सहभाग घेतला होता. या अंतर्गत वेगवेगळ्या स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. गेली तीन वर्षे जानेवारी महिन्यात आशा किरण या संस्थेच्या मतिमंद मुलांच्या स्पोर्ट्स अॅक्टिव्हिटी सावरकर उद्यान, सावरकर रोड, डोंबिवली (पूर्व) येथे घेतल्या जातात. संस्थेतर्फे मुलांना पारितोषिके दिली जातात. गेल्या वर्षी संस्थेने फर्डेपाडा, शहापूर येथील जिल्हा परिषद शाळेत वॉटर फिल्टर देऊन पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली. यावर्षी त्याच शाळेत प्रत्येक वर्गाच्या भिंतीवर शैक्षणिक माहिती असलेले फलक लावून दिले. यामुळे मुलांना विविध शैक्षणिक माहिती लक्षात ठेवण्यास मदत होते. संस्थेच्या या कार्यात संचालिका मीना पाटील यांचा मदतीचा मोठा वाटा असतो. संस्थेचे चिटणीस राहुल कराडकर प्रत्येक कार्यक्रम मोठ्या उत्साहात आयोजित करण्यास सहभाग घेतात. संस्थेचे खजिनदार प्रकाश हिंगणे हिशोब ठेवण्याचे काम अगदी चोख बजावतात. या सर्व कार्यासाठी मोठ्या प्रमाणावर निधीची आवश्यकता आहे. समाजाने संस्थेला मनुष्यबळ आणि आर्थिक पाठबळ पुरवावे, असे आवाहान संस्थेचे अध्यक्ष उमेश चव्हाण यांनी केले आहे.
९३२१६५८५७१