परतीच्या पावसाचा जोर वाढला! पुढील चार दिवस मुसळधार पावसाचा अंदाज
25-Sep-2024
Total Views |
मुंबई : संपूर्ण राज्यभरात सध्या परतीच्या पावसाने जोर धरला असून अनेक भागांमध्ये पाणी साचले आहे. सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात राज्यभरात पावसाचा जोरदार फटका बसला आहे. बुधवारी दुपारपासून पावसाने चांगलाच धुमाकूळ घातला आहे.
रविवारपासून सुरु झालेल्या पावसाने ठिकठिकाणी पाणी साचले असून नदी, नाले तुडूंब भरले आहेत. शिवाय अनेक भागांत शेतीतील पिकांचेही प्रचंड नुकसान झाले आहे. विदर्भ, मराठवाडा, कोकण आणि मध्य महाराष्ट्रात पुढील ४ दिवस मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. विदर्भातील अनेक जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
मंगळवारी मुंबईतील अनेक भागांत पाऊस कोसळला. त्यानंतर बुधवारीही पावसाचा जोर वाढला. पुढील काही तास ठाणे आणि मुंबईतील काही भागांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. तर जोराच्या पावसामुळे मुलूंड आणि भांडूपमध्ये पाणी साचले आहे. पुण्यातील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पाणी साचले असून नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली आहे. दरम्यान, गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी पुणे दौऱ्यावर येणार आहेत. पुढील ३ ते ४ दिवस पुण्यात जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.