मुंबई : सोमवार, २६ ऑगस्ट रोजी मालवणच्या राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला. दरम्यान, याप्रकरणी दोन जणांवर गुन्हा दाखल केल्याची माहिती पुढे आली आहे. आठ महिन्यांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या पुतळ्याचे उद्घाटन झाले होते.
या पुतळ्याचे काम मेसर्स आर्टीस्ट्री कंपनीला देण्यात आले होते. या कंपनीचे मालक जयदीप आपटे आणि स्ट्रक्चरल कन्सल्टंट केतन पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे लवकरच त्यांना अटक होण्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे.
नौदल दिनाचे औचित्य साधून गेल्या वर्षी मालवणच्या राजकोट किल्ल्यावर नौदल आणि राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने हा ४३ फुटी भव्य पुतळा उभारण्यात आला होता. पुतळा उभारणीसह किल्ल्याच्या सौंदर्यीकरणासाठी पाच कोटी रुपयांचा विशेष निधी मंजूर करण्यात आला होता. दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी या दुर्घटनेनंतर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पुन्हा दिमाखात उभा करण्याची ग्वाही दिली आहे.