"...तर तोंडाला काळी पट्टी बांधण्याची वेळ आली नसती!" मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर घणाघात

    24-Aug-2024
Total Views |
 
Shinde
 
यवतमाळ : विचार करून तोंड उघडलं असतं तर तोंडाला काळी पट्टी बांधण्याची वेळ तुमच्यावर आली नसती, असा घणाघात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी विरोधकांवर केला आहे. शनिवार, २४ ऑगस्ट रोजी यवतमाळमध्ये आयोजित लाडकी बहिण योजनेच्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी त्यांनी विरोधकांच्या निषेध आंदोलनावर निशाणा साधला.
 
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, "विरोधक आज तोंडाला पट्टया बांधून बसलेत. लोकशाहीमध्ये आंदोलनाला बंदी नाही. पण आंदोलनाच्या नावाखाली समाजाला वेठीस धरता येणार नाही. उच्च न्यायालयाच्या निर्णयाचा हाच अर्थ आहे. न्यायालयाच्या निर्णयाचं पालन सरकार करेल."
 
हे वाचलंत का? -  "तुमच्या तोंडाला पट्ट्याच बऱ्या कारण..."; उपमुख्यमंत्री फडणवीसांचा विरोधकांवर हल्लाबोल
 
विरोधकांना मनमानी करू दिली तर लोकशाही आहे आणि जबाबदारीने वागायला सांगितलं तर लोकशाही नाही, असं ते म्हणतात. सकाळी कोर्टाने त्यांच्या बाजूने निकाल दिला तर कोर्ट चांगलं आहे म्हणतात आणि संध्याकाळी त्यांना हा बेकायदेशीर संप असल्याचं सांगितल्यावर कोर्टावर आरोप करतात," असे ते म्हणाले.
 
ते पुढे म्हणाले की, "तुम्ही निवडणूक आयोगाला, सुप्रीम कोर्टाला आणि लोकशाहीला बदनाम करत आहात. तुमच्या मनाप्रमाणे निर्णय झाला तर ती व्यवस्था चांगली आणि विरोधात झाला तर ती वाईट. असं लोकशाहीत असतं का? त्यामुळे तुम्ही विचार करून तोंड उघडलं असतं तर तोंडाला काळी पट्टी बांधण्याची वेळ तुमच्यावर आली नसती. आधी तुम्ही किती पाप केलेत ते बघा आणि नंतर आमच्यावर आरोप करा. चौकात बसून राजकारण करणाऱ्यांना हुशार जनता कधीतरी औकात दाखवल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे ज्यांची तोंडं भ्रष्टाचारात काळी झाली आहेत त्यांच्या हातात काळे झेंडे शोभतात," अशी टीकाही त्यांनी केली.