मुंबई : राज्यातील मेंढपाळांसाठी असलेली राजे यशवंतराव होळकर ‘महामेष’ योजना पुढे सुरू ठेवण्याचा आणि मेंढपाळ लाभार्थींना रक्कम थेट खात्यात जमा करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. राज्यातील धनगर समाजातील मागासलेपण दूर करण्याच्या उद्देशाने ही योजना 2017 वर्षापासून सुरू करण्यात आली. या योजनेत अधिकाधिक लाभार्थींना फायदा व्हावा, म्हणून काही बदलासह त्यास मान्यता देण्यात आली.
या वर्षासाठी महामंडळाकडे असलेला 29 कोटी, 55 लाख इतका निधी चालू वित्तीय वर्षात खर्च करण्यास आणि त्यानंतर ही योजना दरवर्षी अर्थसंकल्पातील तरतुदीनुसार पुढे चालू ठेवण्यात येईल. पशुधन खरेदीच्या बाबतीत 75 टक्के अनुदानाची रक्कम सात दिवसांत थेट लाभ हस्तांतरण प्रक्रियेतून (डीबीटी) लाभार्थीना देण्यात येईल. तसेच चारा बियाणे व बहुवार्षिक गवत प्रजातीचे ठोंबे व बियाणे यासाठीचे अनुदान वगळता उर्वरित सर्व लाभ ‘डीबीटी’च्या माध्यमातून लाभार्थींना देण्यात येतील.