मुंबईतील सिमेंट काँक्रीटच्या रस्त्यांची 'सामर्थ्य चाचणी' होणार!

पश्चिम उपनगरात दोन ठिकाणी "कोअर टेस्ट" पूर्ण

    02-Jul-2024
Total Views |
Core Test Mumbai Municipal Corporation


मुंबई : मुंबई महानगरात सिमेंट काँक्रिटच्या रस्त्यांची कामे वेगाने सुरू आहेत. मुंबईतील नागरिकांना खड्डेमुक्त रस्त्यावरून प्रवास करता यावा, यासाठी पालिकेने सिमेंट काँक्रिटच्या रस्त्यांची कामे हाती घेतली आहेत. या कामामध्ये गुणवत्ता आणण्यासाठी प्रत्येक रस्त्याच्या कामाची 'कोअर टेस्ट' (सामर्थ्य चाचणी) केली जाणार असल्याची माहिती पालिका प्रशासनाने दिली. मुंबई उपनगरात दोन ठिकाणी दि. १ जुलैला या चाचणीला सुरूवात झाली आहे. मुंबई महापालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांच्या निर्देशानुसार ही चाचणी केली जात आहे.

दरम्यान पश्चिम उपनगरात अंधेरी पूर्व मध्ये मांजरेकरवाडी मार्ग आणि विलेपार्ले येथे दीक्षित मार्ग या दोन ठिकाणी ) रस्ते विभागाकडून सामर्थ्य चाचणी करण्यात आली. या चाचणीसाठी अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) अभिजित बांगर चाचणीच्या ठिकाणी प्रत्यक्ष उपस्थित होते. यावेळी संयंत्राचा वापर करून सिमेंट काँक्रिटच्या रस्त्याचा वर्तुळाकार पद्धतीने भाग कापण्यात आला. हा भाग नमुना म्हणून बाहेर काढण्यात आला. त्यानंतर हे नमुने पुढील सामर्थ्य तपासणीसाठी भारतीय तंत्रज्ञान संस्था (आयआयटी), मुंबई येथील प्रयोगशाळेत पाठवण्यात आला.

मुंबई महानगरात पालिकेने पहिल्या टप्प्याअंतर्गत एकूण ३२४ किलोमीटरच्या रस्त्यांची सिमेंट काँक्रिटीकरण कामे हाती घेतली आहेत. त्यापैकी २९.३७ किलोमीटर लांबीच्या रस्त्यांची कामे पूर्ण झाले आहे. दरम्यान दुसऱ्या टप्प्याअंतर्गत नियोजित सिमेंट काँक्रिट रस्त्यांच्या कामाची निविदा प्रक्रिया सध्या प्रगतिपथावर आहे. या प्रकल्पासाठी 'आयआयटी बॉम्बे' मधील स्थापत्य अभियांत्रिकी विभागातील तज्ज्ञ पालिकेच्या अभियंत्यांना मार्गदर्शन करत आहेत.

सामर्थ्य चाचणी म्हणजे काय ?

सामर्थ्य चाचणी (कोअर टेस्टिंग मशीन) संयंत्राचा वापर करून सिमेंट काँक्रिटच्या रस्त्याचा भाग वर्तुळाकार पद्धतीने कापण्यात येतो. हा भाग नमुना म्हणून बाहेर काढण्यात येतो. त्यानंतर हा नमुना पुढील तपासणीसाठी भारतीय तंत्रज्ञान संस्था (आयआयटी) मुंबई येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात येतो. ज्यानंतर त्या काँक्रिटच्या भागाची सामर्थ्य चाचणी करून त्यात वापरण्यात आलेल्या साधनसामुग्रीचे गुणोत्तर, टिकाऊपणा, एकजिनसीपणा, भारवहन याअनुषंगाने विविध परिमाणांच्या निकषांवर सामर्थ्य चाचणी केली जाते. यामुळे फक्त गुणवत्तापुर्ण सिमेंट काँक्रिटचे रस्तेच अस्तित्त्वात येणार नाहीत, तर रस्त्यांचा दर्जा सर्वोत्कृष्ट राहील, हे रस्ते विभागाकडून सुनिश्चित करण्यात येत आहे. ज्यामुळे कमी दर्जाचे काम केलेले चालणार नाही हा संदेशही कंत्राटदारांमध्ये जाईल. तसेच अशा गुणवत्ता चाचण्यांमुळे कामांवर नियंत्रण ठेवण्यास मदत होईल, असा विश्वास अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) अभिजीत बांगर यांनी व्यक्त केला.

आयआयटी बॉम्बे आणि शासकीय प्रयोगशाळेत नमुने तपासणी

संपुर्ण मुंबईतून 'कोअर टेस्ट'मध्ये संकलित केलेले सिमेंट काँक्रिटचे नमुने हे पुढील सामर्थ्य चाचणीसाठी आयआयटी मुंबईच्या प्रयोगशाळेत पाठवण्यात येणार आहे. या नमुन्यांची तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येणार असून आयआयटी मार्फत त्याचे परिक्षण व्हावे,यासाठी पालिकेमार्फत पत्रव्यवहार करण्यात आलाय.