फॅसिस्ट शक्तीविरोधातील लढा सुरूच ठेवणार – मल्लिकार्जुन खर्गे

    05-Jun-2024
Total Views |
malliakrjun kharge fascist
 

नवी दिल्ली :      देशातील जनतेने भाजप सरकारच्या एकाधिकारशाहीविरोधात कौल दिला असून फॅसिस्ट शक्तीविरोधातील लढा सुरूच राहील, असे प्रतिपादन काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी इंडी आघाडीच्या बैठकीनंतर बुधवारी रात्री केले आहे. लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसप्रणित इंडी आघाडीस अपेक्षेपेक्षा जास्त यश प्राप्त झाल्याने त्यांचा हुरूप वाढला आहे.

दरम्यान, निकालानंतरच्या रणनितीसाठी काँग्रेस अध्यक्ष खर्गे यांच्या नेतृत्वाखाली इंडी आघाडीची बैठक पार पडली. यावेळी काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी, राहुल गांधी, नॅशनल कॉन्फरन्सचे ओमर अब्दुल्ला, सपाचे अखिलेश यादव, राजदचे तेजस्वी यादव, डाव्या पक्षांचे सीताराम येचुरी आणि डी. राजा, झामुमोच्या कल्पना सोरेन, तृणमूलचे अभिषेक बॅनर्जी, द्रमुकचे एम. स्टालिन, उबाठाचे संजय राऊत, शरद पवार, सुप्रिया सुळे आदी नेते उपस्थित होते.


बैठकीनंतर खर्गे यांनी प्रसारमाध्यमांना संबोधित केले. यावेळी ते म्हणाले, आमच्या आघाडीला प्रचंड पाठिंबा मिळाला आहे. भाजप सरकारच्या धोरणांविरोधात जनतेने जनादेश दिला आहे. लोकांनी केवळ संविधान वाचवण्यासाठीच मतदान केले नाही तर महागाई, बेरोजगारी आणि लोकशाही वाचवण्यासाठीही मतदान केले आहे. इंडिया आघाडी मोदींच्या नेतृत्वाखालील फॅसिस्ट शक्तींविरुद्ध लढत राहील. भाजप सरकार जनतेच्या अपेक्षा पूर्ण करत नाही, असे जेव्हा आम्हाला वाटेल तेव्हा योग्य वेळ पाहून योग्य ती पावले उचलू. आम्ही जी काही आश्वासने दिली आहेत, ती पूर्ण करण्याचा प्रयत्न करू, असे खर्गे यांनी म्हटले आहे.