"केजरीवाल तुम्ही तुरुंगातच राहा"; दिल्लीत 'आप'चा सुफडा साफ झाल्यानंतर विरोधकांची प्रतिक्रिया

    05-Jun-2024
Total Views |
 kejriwal
 
नवी दिल्ली : दिल्ली लोकसभा निवडणुकीत भाजपने पुन्हा एकदा सातही जागांवर विजय मिळवला आहे. दिल्लीत भाजपनं सलग तिसऱ्यांदा सर्वच्या सर्व जागा जिंकण्याची किमया साधली आहे. दिल्ली लोकसभा निवडणूकी भाजपचा विजयरथ रोखण्यासाठी एकमेकांचे पारंपारिक विरोधक असलेल्या केजरीवालांच्या आम आदमी पक्षाने आणि काँग्रेसने आघाडी केली होती. पण, या आघाडीचा भाजपनं स्वबळावर सुफडा साफ केला आहे.
 
दिल्लीच्या सात जागांवर आम आदमी पक्षाने चार तर काँग्रेसनं तीन जांगावर निवडणूक लढवली होती. मात्र, भाजपनं दिल्लीत इंडी आघाडीतील दोन्ही पक्षांचा दारूण पराभव घडवून आणला. दिल्लीत भाजपने सहा जागांवर आपले उमेदवार बदलले होते. फक्त ईशान्य दिल्लीत विद्यमान खासदार मनोज तिवारी यांना पुन्हा एकदा संधी देण्यात आली होती. त्यांच्या विरोधात काँग्रेसनं देशद्रोहाचे आरोप असलेल्या कन्हेया कुमारला उमेदवारी दिली होती.
 
  
पण, या निवडणूकीत कन्हेयाचा दारूण पराभव झाला. तर नवी दिल्ली लोकसभा मतदारसंघातून भारताच्या माजी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांच्या कन्या बांसुरी स्वराज यांनी नवी दिल्ली लोकसभा मतदारसंघातून विजय मिळवला. दिल्लीत आम आदमी पक्षाचे सरकार आहे. दिल्लीच्या विधानसभेत आपचं एकहाती वर्चस्व आहे.
  
भ्रष्टाचाराच्या आरोपात तुरुंगाची हवा खात असलेल्या केजरीवालांनी यावेळी 'तुरुंगाचे उत्तर मतदानातून' अशी घोषणा दिली होती. पण, केजरीवालांना मतदारांची कोणतीही सहानभुती मिळाली नाही, हे निकालातून स्पष्ट झाले. दिल्लीच्या जनतेनं केजरीवाल यांना तुरूंगात ठेवण्याचा निर्णय दिला आहे, अशी टीका विरोधकांनी केली आहे.
 
नवी दिल्ली - बांसुरी स्वराज
पूर्व दिल्ली - हर्ष मल्होत्रा
दक्षिण दिल्ली - रामवीर सिंह बिधूडी
पश्चिम दिल्ली - कमलजीत सहरावत
चांदणी चौक - प्रवीण खंडेलवाल
ईशान्य दिल्ली - मनोज तिवारी यांच्यावर
उत्तर-पश्चिम दिल्ली - योगेंद्र चंडोलिया