नागपूर : भाजपसह महायुतीला विधानसभा निवडणुकीत मिळालेले अभूतपूर्व यश राज्य व केंद्राच्या कल्याणकारी योजनांच्या यशस्वी अमलबजावणीसह कार्यकर्त्यांच्या श्रमाचे फलित असल्याची प्रतिक्रिया केंद्रीय महामार्ग मंत्री नितीन गडकरी ( Nitin Gadkari ) यांनी दिली. गडकरी म्हणाले, ’भाजप-महायुतीला आजपर्यंतच्या इतिहासात मिळालेले हे सर्वात मोठे यश आहे. लोकसभा निवडणुकीत भाजपवर संविधान बदलाचे खोटे आरोप करण्यात आले. मोठ्या प्रमाणात अपप्रचार करण्यात आला. या सर्व आरोपांना शेतकरी, शेतमजूर व सर्वसामान्य जनतेने जातीपातीच्या राजकारणाकडे दुर्लक्ष करून मतदान केले. एवढेच नव्हे तर विजयाचे सर्व रेकॉर्ड मोडीत काढले. केंद्र सरकारची आयुष्मान योजना, उज्ज्वला योजना आणि महाराष्ट्र सरकारच्या लाडकी बहीण योजनेचे मोठे यश आहे, असेही गडकरी म्हणाले.