मुंबई (विशेष प्रतिनिधी) : "हिंदू समाजाला सुरक्षित राहायचं असेल तर भाषा, जात आणि प्रांतावर आधारित मतभेद आणि वाद मिटवून संघटित व्हा.", असे आवाहन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी केले. राजस्थानच्या बारण येथे शनिवार, दि. ५ ऑक्टोबर रोजी धनमंडी मैदानावर नगरातील स्वयंसेवकांचे एकत्रिकरण संपन्न झाले. त्यावेळी ते बोलत होते.
भारत हे हिंदू राष्ट्र असल्याचे सांगत सरसंघचालक म्हणाले, आम्ही भारतमातेचे पुत्र आहोत. म्हणून आम्ही भारत मातेसाठी जगू आणि भारत मातेसाठीच मरू. हिंदू भारतात अनादीकाळापासून राहत आहेत. हिंदू हा शब्द भारतात राहणाऱ्या सर्व पंथांसाठी वापरण्यात आला. हिंदू प्रत्येकाला आपलं मानतात आणि सर्वांना सामावून घेतात. समाज असा असावा जिथे संघटन, सद्भावना आणि आत्मीयता असेल. समाजात आचरणाची शिस्त, राज्याप्रती कर्तव्य आणि ध्येयासाठी समर्पित राहण्याची गुणवत्ता आवश्यक आहे. समाज केवळ मी आणि माझ्या कुटुंबाने बनत नाही, तर समाजाच्या सर्वांगीण चिंतेतून आपल्या जीवनात भगवंताची प्राप्ती करायची असते.
उपस्थित स्वयंसेवकांना संबोधत सरसंघचालक पुढे म्हणाले, वस्तीवस्तीपर्यंत स्वयंसेवकाचा संपर्क असावा. समाजाला बळकटी देऊन वस्त्यांमधील उणिवा दूर करण्याचा प्रयत्न प्रत्येकाने केला पाहिजे. सामाजिक समरसता, सामाजिक न्याय, सामाजिक आरोग्य, शिक्षण आणि स्वावलंबनासाठी समाजात आग्रही असले पाहिजे. समाजाच्या छोट्या घटकांमध्ये समरसता, सद्भावना, पर्यावरण, कुटुंब प्रबोधन, स्वदेशी आणि नागरी भावना या गोष्टी सहज सुलभ होऊ शकतात. जीवनात छोट्या-छोट्या गोष्टी अंमलात आणून समाज आणि राष्ट्राच्या प्रगतीत मोठे योगदान देता येते.
यावेळी मंचावर सरसंघचालकांसह राजस्थान क्षेत्र संघचालक डॉ. रमेश अग्रवाल, चित्तोड प्रांत संघचालक जगदीश सिंह राणा, बारण विभाग संघचालक रमेश चंद मेहता आणि बारण जिल्हा संघचालक वैद्य राधेश्याम गर्ग उपस्थित होते. नगर एकत्रिकरणात एकूण ३८२७ स्वयंसेवक सहभागी झाले होते.