स्वातंत्र्यवीर सावरकर म्हणजे धगधगते अग्निकुंड : मंगल प्रभात लोढा

शिवराय ते सावरकर कार्यक्रमाचे उद्घाटन

    22-May-2023
Total Views |
MLA Mangal Prabhat Lodha in Pune

पुणे
: स्वातंत्र्यवीर सावरकर म्हणजे धगधगते अग्निकुंड आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जीवन चरित्राचा अभ्यास करुन त्याचा प्रचार प्रसार करण्याची आवश्यकता आहे. ही दोन्ही व्यक्तीमत्व देशाचे आदर्श आहेत. आपल्या येणार्‍या पिढ्यांवर हिंदुत्वाचे संस्कार होणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन राज्याचे पर्यटन मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी केले.

कर्वेनगर येथे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ, विवेक व्यासपीठ व राजे शिवराय प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित शिवराय ते सावरकर कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. भाजपा पुणे प्रभारी धीरजजी घाटे, शहर सरचिटणीस दीपकजी नागपुरे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सहकार्यवाह महेशजी पोहनेरकर, प्रसादजी खंडागळे तसेच या कार्यक्रमाचे निर्माते मंदार परळीकर व या कार्यक्रमाचे आयोजक राजे शिवराय प्रतिष्ठानचे संस्थापक महेश पवळे उपस्थित होते.

स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या संपुर्ण कुटुंबाने केलेला त्याग अजोड आणि अद्वितीय आहे. देशाच्या स्वातंत्र्ययज्ञात त्यांनी वाहिलेल्या समिधा आजही प्रेरणा देत आहेत. सावरकरांच्या मार्गावरुन चालणे कठीण आहे. भारतमातेच्या उज्ज्वल भविष्याचा मार्ग सावरकरांच्या विचारात असल्याचे घाटे यावेळी म्हणाले.

याप्रसंगी छत्रपती शिवाजी महाराज व स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा पराक्रमी व प्रखर हिंदूत्वाचा अभिमानी वारसा सांगणार्‍या या कार्यक्रमात विविध कला सादरीकरण करण्यात आल्या. पुणेकरांच्या प्रचंड सहभागासह छत्रपती शिवराय व स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या चरित्राचा यावेळी निवेदन, गाणी व नृत्याच्या कलाविष्कारातुन मागोवा घेण्यात आला. कोणीही जर लव्ह जिहाद किंवा तत्सम त्रासामधून जात असेल तर तात्काळ राजे शिवाजी प्रतिष्ठानकडे संपर्कसाधावा असे आवाहन महेश पवळे यांनी केले.

आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.