वसुधैव कुटुम्बकम्...

    01-Apr-2023
Total Views | 366
Vasudhaiva Kutumbakam

‘जी २०’चा अध्यक्ष असलेल्या भारताचे बोधवाक्य हे ‘वसुधैव कुटुम्बकम्.’ त्यानिमित्ताने या संस्कृत श्लोकाचे सार उलगडून सांगणारा हा लेख...

अत्युत्तरस्यां दिशि देवातात्मा हिमालये नाम नगाधिराजः। पूर्वापरौ तोयानिधी वागाय स्थितः पृथिव्यां इव मानदंड:॥
महाकवी कालिदासांनी वर्णन केल्याप्रमाणे पृथ्वीवरील एकमेव मानदंड असलेली आपली भारतभूमी. आपली ही भूमी जिचे पूजन आपल्या संत-महात्म्यांनी मातृभूमी, धर्मभूमी, कर्मभूमी आणि पुण्यभूमी या स्वरूपात केले. आपली ही मातृभूमी जिचे स्तवन करताना अनेक कवींना शब्द अपुरे वाटलेत, कवी रवींद्रनाथ ठाकूर म्हणतात,
 
देवि अयि! भुवन मन मोहनी,अयि! नीलसिंधुजलधौतचरणतल।
अंबर चुंबित भाल हिमाचल, अयि! शुभ्र तुषार किरीटिनी॥

बंकिमचंद्र म्हणतात, ‘त्वं हि दुर्गा दशप्रहरणधारिणी’ असे सुंदर वर्णन आपल्या काव्यातून करत आपल्या देशाला, मातृभूमीला दुर्गा मानून देवता स्वरूप मानून अनेक कवींनी आपल्या शब्दांना काव्यबद्ध करत तिच्या महत्ततेचे गुणगान केलेले आहे. वेद, शास्त्र, कला, संगीत, वेद, उपनिषदे, योग, आयुर्वेद, इ. अनेकाविध समृद्धीने नटलेली अशी ही ज्ञानाचा अखंड झरा असलेली भारतभूमी.

या भूमीचे खास वैशिष्ट्य म्हणजे येथील संस्कृती, म्हणजेच समाजाची जीवनमूल्ये. ही भारतीय संस्कृतीच या राष्ट्राचा प्राण आहे. ‘सर्वे भवन्तु सुखिनः सर्वे सन्तु निरामयाः’ हा आपल्या ऋषिमुनींनी दिलेला संस्कारमंत्रच जणू. याच आपल्या संस्कारमंत्रामुळेच की काय, कोरोनासारख्या महामारीतही भारताने ’सारे विश्वची माझे घर’ याची जाण ठेवत अनेक देशांना लसमात्रा पुरविली. कारण, हीच आपली भारतीय संस्कृती आपल्याला सांगते -

अयं निजः परोवेति गणना लघुचेतसाम्।
उदारचरितानां तु वसुधैव कुटुम्बकम्॥

आपल्या संसद भवनाच्या केंद्रीय प्रवेशद्वारावर कोरलेला हा संस्कृत श्लोक ज्यात ‘वसुधैव कुटुम्बकम्’ हा विचार मांडला आहे. ‘वसुधैव कुटुम्बकम्’ हा विचार आपल्या सनातन धर्माचे मूळ आहे. सनातन धर्मात सर्वांना सामावून घेण्याची वृत्ती असते. भारतात परकीयांचे आक्रमण झाल्यावर सनातन धर्म टिकवून ठेवण्याचे कार्य अनेक ऋषिमुनी संतांनी केले. वेदकाळात ऋषी सर्वांना एकाच ईश्वराचा अंश मानायचे. मुळात ‘सनातन’ या शब्दाचा अर्थच शाश्वत, ज्याचा ’न आदी न अंत’ असे काळापासून जे अस्तित्वात आहे, असे हे भारतीय तत्त्वज्ञान आहे, चिरंतन...
 
मग ‘वसुधैव कुटुम्बकम्’ हा संस्कृत शब्द अर्थात हे संपूर्ण विश्व हे माझे कुटुंबच आहे. हे एक सामाजिक तत्त्व आहे, ज्यात संपूर्ण मानवजाती एका जीवन ऊर्जेने बनलेली आहे. जग हे एक कुटुंब आहे, आपण याकडे भौतिक दृष्टिकोनातून पाहो अगर आध्यात्मिक दृष्टिकोनातून पाहो, या जगातील सर्व मानवांमध्ये कोणताही फरक नाही. ‘एकोऽहं बहुस्याम्’ आपण सर्व एक आहोत, ज्याप्रमाणे कुटुंबातील सर्व सदस्य एकमेकांवर अवलंबून असतात, त्याचप्रमाणे आपणदेखील एकमेकांवर अवलंबून आहोत, हाच संस्कार यातून प्रकट होतो. जशा सागरात उठणार्‍या लहरी, सागराचाच भाग असतात व सागरातच विलीन होतात, तसेच सर्व प्राणिमात्र एकाच जाणिवेचे भाग, एकातच विलीन होणारे आहेत, हाच संस्कार, हाच भाग भारतीय संस्कृतीच्या तत्त्वज्ञानातून होतो.

आज वैश्विकरणाचा अर्थविश्व एक बाजार या स्वरूपात करून मानवी मूल्याचा र्‍हास करत केवळ भौतिक संपन्नतेला स्थान दिले जात आहे. पैसा कमाविण्यासाठी अनेक अनैतिक मार्गाचा अवलंब केला जात आहे, जे या विश्वव्यापी संस्कृतीला बाधक आहे. आपल्या ऋषिमुनींनी जो वैश्विक विचार संक्रमित केला, त्याची जाणीव ठेवत ‘वसुधैव कुटुम्बकम्’ची भावना दृढ करण्याची गरज आहे.

‘सर्वभूतहिते रता:’ हा संस्कार लक्षात घेऊन प्राणिमात्रांच्या संरक्षणार्थ सज्ज होण्याची. पृथ्वीवरच्या सर्व जीवित प्राण्यांमध्ये केवळ माणसाला सदसद्विवेकबुद्धीचे वरदान मिळाले आहे. याचा सदुपयोग करून जर आपल्या माणसात व बाकी सर्व प्राणी व पशुपक्षी, वन्यजीवन वा वनस्पती, सगळ्यांचा आदर करून आपापसात गुण्यागोविंदाने नांदण्याची कला साध्य झाली, तर वैदिक काळातली ‘वसुधैव कुटुम्बकम्’ ही संकल्पना प्रत्यक्षात यायला वेळ लागणार नाही.

आपण फक्त नैतिकतेचा विसर पडतोय


आपण केवळ आपल्या अस्तित्वाची लढाई लढत नाही, तर अशी लढाईही सुरू आहे, जिथे माणसाची अस्मिता, माणुसकी धोक्यात येत आहे. आपण मानवता मूल्य हरवले. ‘स्व’चा विचार करतोय का? मी, माझे कुटुंब एवढेच माझे जग आहे का? हृदयातील संवेदनशीलता कमी झाली आहे का? आपणच आपल्या अस्तित्वाला बाधक होतोय का? यांसारख्या अनेक प्रश्नांची उत्तरे आपणच आपली शोधायला हवी. संत ज्ञानेश्वरांनी ’वसुधैव कुटुम्बकम्’ ही भावना ठेवतच विश्वकल्याणासाठी पसायदानातून मागितलेले मागणे हे भारतीय संस्कृतीचे अमर शब्दात केलेले हृद्गत आहे, ज्याला कोणत्याही मर्यादा नाहीत. याचा मतितार्थ आपण समजून घ्यायला हवा, इतकंच.

किंबहुना सर्वसुखी। पूर्ण होवोनी तिन्ही लोकी।
भजिजो आदि पुरुषी। अखंडित॥


-अपर्णा पाटील



अग्रलेख
जरुर वाचा
पुणे शहराची नवीन क्षेत्रात पदार्पण करून सामर्थ्य निर्माण करण्याची क्षमता – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

पुणे शहराची नवीन क्षेत्रात पदार्पण करून सामर्थ्य निर्माण करण्याची क्षमता – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत दि. १ ऑगस्ट रोजी 'पुणे मेट्रोपॉलिटन रिजन ग्रोथ हब' चा शुभारंभ यशदा येथे करण्यात आला. या कार्यक्रमात बोलत असताना फडणवीस म्हणाले, कोणत्याही एका शहराने एखाद्या क्षेत्रावर वर्चस्व गाजविण्यासारखी स्थिती आता राहिली नसून महाराष्ट्रातील अनेक शहरे गतीने विकास करत आहेत. मात्र,पुणे शहर प्रचंड प्रगतशील आणि नाविन्यतेचे केंद्र असून नवीन क्षेत्रात पदार्पण करून आपले सामर्थ्य निर्माण करण्याची या शहरात क्षमता आहे. भविष्यात पुणे निश्चितच भरारी घेईल आणि त्यासाठी ग्रोथ हबच्या माध्यम..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121