भाजपला पाठिंबा दिल्याने राष्ट्रवादीची कोंडी

    10-Mar-2023
Total Views |
ajit pawar


मुंबई : आजवर शिंदे गटाच्या आमदारांना उद्देशून करण्यात येत असलेला ‘५० खोके, बिलकूल ओके‘ या आरोपाचा पलटवार राष्ट्रवादी काँग्रेसवरच उलटला आहे. नागालॅण्ड राज्यात राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपला पाठिंबा दिल्याने त्याचा बचाव करताना राष्ट्रवादीच्या नेत्यांची दमछाक होताना दिसत आहे.

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार म्हणाले, “आम्ही हा पाठिंबा मुख्यमंत्र्यांना दिला आहे, भाजपला नाही,” त्यांच्या या वक्तव्याची खिल्ली उडवण्यात येत असतानाच गुरुवारी या प्रकरणाचे पडसाद विधानसभेतही उमटले. मंत्री गुलाबराव पाटील यांनी नागालॅण्डमध्ये ‘५० खोके, एकदम ओके’ झाल्याचा आरोप केला. विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आक्षेप घेतला.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका कशी दुटप्पी असल्याचे ते सांगितले. शिवाय “काचेच्या घरात राहणार्‍यांनी दुसर्‍यांच्या घरावर दगड फेकू नये,” असे सूचक वक्तव्य केले. गुलाबराव पाटील म्हणाले, देशामध्ये आणि राज्यामध्ये बदलाचे वारे वाहायला लागले असे दावे काही नेते माध्यमांतून करत आहेत. या संदर्भात राष्ट्रवादीचे नेत्यांनी घेतलेल्या बचावात्मक भूमिकेचाही समाचार घेण्यात येत आहे.
 
गुलाबराव पाटील पुढे म्हणाले की, “मला तरी असे वाटतेय की नागालँडमध्ये सुद्धा पन्नास खोके, बिलकुल ओके झालेय का. अशा पद्धतीची शंका या ठिकाणी निर्माण झालेली आहे. एकीकडे जातीयवादी सरकार म्हणून आरोप करायचे आणि तिकडे जाऊन मांडीला मांडी लावून बसायचे. आणि बदलाचे वारे कसे वाहायला लागले आहे. आमचे म्हणणे आहे की, पन्नास खोके नागालँड ओके, असे झालेय का? हा माझा सवाल आहे”, गुलाबराव पाटील यांच्या या वक्तव्यावर राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी आक्षेप घेत म्हणाले की, प्रत्येक गोष्टीत राजकारणच आणले पाहिजे असे नाही. आज केंद्र सरकार त्यांच्या ताब्यात आहे.

राज्य सरकार त्यांच्या ताब्यात आहे. सगळ्या संस्था त्यांच्या ताब्यात आहेत. चौकशी करा ना, ही कुठली पद्धत काढली. कारण नसताना बदनामी करू नका., तिथली परिस्थिती वेगळी आहे, असे सांगत पवार पुढे म्हणाले की, इशान्येच्या राज्यांची राजकीय परिस्थिती वेगळी आहे. तिथे सगळे मिळून सर्वपक्षीय सरकार स्थापन करतात, अशी तिथली परंपरा आहे. भारतातला तो भाग, भारतातच राहण्यासाठी भारतीय म्हणून निर्णय घेतलेला आहे. त्याची चर्चा इथे करून गैरसमज निर्माण करायचा काहीच कारण नाही, अशी बचावात्मक भूमिका पवार यांनी मांडली.
 
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, तुम्ही दररोज येऊन खोके-खोके करता. आपण जेव्हा दुसर्‍याकडे बोट दाखवतो, तेव्हा तीन बोटे आपल्याकडे असतात. तुम्ही आतापर्यंत बदलाचे वारे वाहणार म्हणत होता. गुलाबराव पाटील यांनी हेच बदलाचे वारे का, असे विचारले. तुम्ही सरकारला नाही, मुख्यमंत्र्यांना पाठिंबा दिला म्हणता. हे कुठले तत्वज्ञान, असा सवाल करत शिंदे म्हणाले की, सोयीचे तेवढे घ्यायचे. आपले ठेवायचे झाकून, दुसर्‍याचे बघायचे वाकून, हे कसे चालते. पवार जे-जे बोलले आहेत, त्याच्या नेमके उलटे झालेले आहे, असा टोलाही शिंदे यांनी राष्ट्रवादीला लगावला..राष्ट्रवादीने नागालॅण्ड मध्ये मागितला नसताना पाठिंबा दिला. २०१४ ला ही तुम्ही तसे केले. काचेच्या घरात राहणार्‍यांनी दुसर्‍यांच्या घरावर दगड फेकत नसतात, असा चिमटाही शिंदे यांनी अजित पवारांना या वेळी काढला.

आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.