मुंबई : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ प्रचारक सरदार चिरंजीव सिंह (९३) यांचे सोमवार, दि. २० नोव्हेंबर रोजी सकाळी ८.३० च्या सुमारास निधन झाले. गेल्या काही महिन्यांपासून त्यांची तब्येत चिंताजनक होती. लुधियाना येथील कार्यालात त्यांची प्राणज्योत मालवली. पंजाबमधील दहशतवादाच्या काळात त्यांनी हिंदू-शीख समाजातील वाढता तणाव दूर करण्याचे अविस्मरणीय कार्य केले होते. 'राष्ट्रीय शीख संगत'चे ते आधी सरचिटणीस व नंतर अध्यक्ष झाले.
साधारण १९४४ दरम्यान इयत्ता सातवीत शिकत असताना त्यांचा पहिल्यांदा संघाच्या शाखेशी संबंध आला. त्यावेळी त्यांच्या शाखेत ते एकमेव शीख स्वयंसेवक होते. १९४६ रोजी प्राथमिक वर्ग झाल्यानंतर १९५२ पर्यंत त्यांनी आपले तृतीय वर्ष पूर्ण केले. १९४८ मध्ये संघावर बंदी आली त्यादरम्यान दोन महिने त्यांनी तुरुंगवास भोगला होता. १९८४ मध्ये त्यांना विश्व हिंदू परिषद, पंजाबचे संघटन मंत्री करण्यात आले.
प्रेरणादायी जीवनाच्या ऐहिक प्रवासाचा अंत
"राष्ट्राला समर्पित असलेल्या प्रेरणादायी जीवनाच्या ऐहिक प्रवासाचा अंत झाला. संघाचे आजीवन निष्ठावान प्रचारक असलेल्या सरदार चिरंजीव सिंह यांनी पंजाबमध्ये अनेक दशके काम केले. त्यानंतर राष्ट्रीय शीख संगतच्या कार्याद्वारे त्यांनी पंजाबमधील कठीण परिस्थितीमुळे उद्भवलेले परस्पर मतभेद आणि अविश्वास दूर करण्यात तसेच भागीदारी आणि राष्ट्रवादाच्या प्रकाशात संपूर्ण देशात एकता आणि सामाजिक सलोखा मजबूत करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. अपार कष्ट, पंजाबच्या गुरु-परंपरेचा सखोल अभ्यास आणि उत्कृष्ट संघटन कौशल्य यामुळे त्यांनी असंख्य लोकांना राष्ट्रवादाच्या प्रवाहात सामावून घेतले. त्यांच्या प्रेमळ आणि गोड व्यक्तिमत्वाने त्यांनी सर्वांचे मन जिंकले होते. आजारपणामुळे काही काळ सक्रिय नसतानाही त्यांच्या उत्साहात कधी कमीपणा जाणवला नाही. त्यांच्या दिवंगत आत्म्यास शांती मिळो हीच प्रार्थना."
- डॉ. मोहनजी भागवत, सरसंघचालक, रा.स्व.संघ