नवी दिल्ली : ‘डीप फेक’ तंत्रज्ञानाच्या दुरुपयोगाविषयी केंद्र सरकार सर्व समाजमाध्यमांशी चर्चा करणार आहे, असे प्रतिपादन केंद्रीय रेल्वे, दूरसंचार, इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी केले आहे.
सरकारने सर्व प्रमुख समाज माध्यमांना नोटिस जारी केल्या असून त्यांना ‘डीप फेक’ ओळखण्यास सांगितले आहे. तसेच, असा मजकूर काढून टाकण्यास सांगितले आहे. केंद्र सरकारच्या नोटीशीस समाज माध्यमांनी प्रतिसाद देत कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे. केंद्र सरकारने समाज माध्यमांना या विषयावर तातडीने कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत, त्याचप्रमाणे 'सेफ हार्बर' कलमाचाही अंमलबजावणी करण्यास सांगण्यात आले असल्याचेही केंद्रीय मंत्री वैष्णव यांनी सांगितले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारीच भाजपतर्फे आयोजित दीपावली कार्यक्रमात ‘डीप फेक’ ही समाजापुढील मोठी समस्या असल्याचे सांगितले आहेत. ‘डीप फेक’ तंत्रज्ञानाच्या दुरुपयोगामुळे समाजात मोठ्या प्रमाणावर असंतोष पसरू शकतो, त्यामुळे त्याविषयी गंभीर पाऊले उचलण्याची गरजही पंतप्रधानांनी व्यक्त केली होती. त्यानंतर लगेचच केंद्र सरकारतर्फे त्यावर कार्यवाहीस प्रारंभ करण्यात आला आहे.