ठाणे : पाचपाखाडी येथील ठाणे महापालिकेसमोरील सरोवर दर्शन इमारतीमधील (पार्कींग) वाहन तळात उभ्या असलेल्या वाहनांना आग लागली. या आगीत ११ दुचाकी जळून खाक झाल्या तर, तीन कारचेही आगीत नुकसान झाले आहे. दरम्यान, आगीचे कारण अद्याप अस्पष्ट असल्याची माहिती ठाणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली.
सरोवर दर्शनमध्ये एक मजली वाहन तळ आहे. या वाहन तळाच्या पहिल्या मजल्यावर १३ दुचाकी आणि तीन कार पार्क केल्या होत्या. मध्यरात्री १ वाजताच्या सुमारास वाहनांना अचानक आग लागली. या आगीत एका पाठोपाठ एक ११ दुचाकी जळून खाक झाल्या. घटनेची माहिती ठाणे मनपाच्या आपत्ती व्यवस्थापन कक्ष आणि अग्निशमन दलाला दिल्यानंतर पथकाने आगीवर नियंत्रण मिळविले.