युक्रेनप्रश्नी परराष्ट्रमंत्री जयशंकर यांनी युरोपला सुनावले

    दिनांक  27-Apr-2022 13:00:52
|
 
 
External Affairs Minister S Jaishankar
 
 
 
 
 
नवी दिल्ली: “आशिया खंडामध्ये ज्या ज्या वेळी नियमाधारित व्यवस्थेस आव्हान देण्यात आले. त्या त्या वेळी युरोपीय देशांनी आम्हाला व्यापार वाढविण्याचा सल्ला दिला होता. त्याउलट आम्ही आता संवाद आणि मुत्सद्देगिरीचा मार्ग चोखाळण्यासाठी आग्रही आहोत,” अशा शब्दांत परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी युरोपीय देशांना युक्रेन प्रश्नावरून सुनावले.
 
 
 
 
परराष्ट्र मंत्रालयातर्फे दिल्ली येथे ‘रायसीन डायलॉग’ या भूराजकीय विषयांवरील चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमाच्या एका सत्रात परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी युक्रेनमध्ये सुरू असलेल्या संघर्षाविषयी भारताच्या भूमिकेचा पुनरुच्चार केला आणि पाश्चिमात्य देशांना अफगाणिस्तानसारख्या जगातील इतर महत्त्वाच्या समस्यांना विसरू नका, असा महत्त्वाचा सल्ला दिला. यावेळी जयशंकर यांनी युक्रेनमधील संघर्ष हा आजचा प्रमुख मुद्दा असला, तरीही आशिया खंडातील महत्त्वाच्या मुद्द्यांवर युरोपीय देशांच्या मौनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
 
 
 
 
परराष्ट्रमंत्री जयशंकर यांनी लक्झेंबर्गचे परराष्ट्रमंत्री जीन एसेलबॉर्न यांच्या प्रश्नास उत्तर दिले. यावेळी ते म्हणाले की, “जेव्हा आशिया खंडामध्ये नियमाधारित व्यवस्थेस आव्हान दिले गेले, तेव्हा आम्हाला युरोपकडून अधिक व्यापार करा, असा सल्ला मिळाला होता. आम्ही मात्र आता तुम्हाला तोच सल्ला न देता मुत्सद्देगिरी आणि संवादाच्या मार्गाचा अवलंब करण्याचा सल्ला देत आहोत. त्यामुळे सध्याच्या परिस्थितीमध्ये मुत्सद्देगिरी आणि संवादास प्रारंभ करण्यासाठी वेगवेगळे मार्ग शोधण्याची गरज आहे. मात्र, त्यासाठी प्रथम संघर्ष थांबण्याची गरज असून भारतही त्यासाठीच प्रयत्न करत आहे,” असे जयशंकर यांनी स्पष्ट केले.
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.