रत्नागिरी : राज्यात पर्यटन स्थळांची प्रसिद्धी व प्रचारण होण्याच्या आणि अपरिचित पर्यटन स्थळांची माहिती पर्यटकांना देण्यासाठी 'पर्यटन संचालनालय, मुंबई' यांच्याकडून पर्यटन महोत्सव घेण्याचा निर्णय घेण्यात आला. त्या अंतर्गत रत्नागिरी जिल्ह्यात २६ आणि २७ मार्च रोजी थिबा पॅलेस येथे 'कातळशिल्प पर्यटन महोत्सव' आयोजित करण्यात आला आहे.
अश्मयुगीन कातळशिल्प रुपी वारसा ठेवा म्हणजे रत्नागिरीची वेगळी ओळख आहे. तसेच रत्नागिरीला मोठा सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वारसा लाभला असून हा वारसा आणि कोकणचे सौंदर्य या महोत्सवातून अनुभवण्याची संधी पर्यटकांना मिळणार आहे. हा कार्यक्रम पर्यटन संचालनालय प्रादेशिक कार्यालय कोकण विभाग नवी मुंबई आणि निसर्गयात्री संस्था, रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे रत्नागिरी जिल्हा प्रशासनाचेही यास सहकार्य लाभले आहे. रत्नागिरीतील पर्यटन विकासाला चालना देणे, कोकणातील दुर्लक्षित तसेच फारशी लोकप्रिय नसलेली ठिकाणे महाराष्ट्राच्या नकाशावर आणणे हा या महोत्सव भरवण्यामागचा उद्देश आहे.
"कोकण भटकंती करण्याची संधी 'कातळशिल्प पर्यटन महोत्सवा'च्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात येणार असून संपूर्ण कोकण प्रदेश समजून घेता यावा या उद्देशाने पर्यटकांनी या उत्सवात सामील व्हावे.", असे आवाहन कॅबिनेट मंत्री उदय सामंत, रत्नागिरीचे जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील आणि पर्यटन संचालनालय प्रादेशिक कार्यालय कोकण विभाग मुंबईचे उपसंचालक हनुमंत हेडे यांनी केले आहे.
अशी आहे कार्यक्रमाची रूपरेषा...
*कातळशिल्प सचित्र माहिती प्रदर्शन
*कोकण भौगोलिक आणि जैवविविधता छायाचित्र प्रदर्शन
*पारंपारिक कला वस्तू प्रदर्शन
*कार्यशाळा
*कातळशिल्प माहिती - सादरीकरण
*शोधकर्ते यांचे बरोबर मुलाखत आणि गप्पा गोष्टी
*आडवळणावरचे कोकण - सादरीकरण
*सांस्कृतिक कार्यक्रम
*खाद्य जत्रा
*सायकल रॅली