आज कंपनी-व्यवस्थापनाचा कल आणि भर कर्मचार्यांना अधिकाधिक प्रगत व कौशल्यपूर्ण करण्यावर असतो. यासाठी व्यवस्थापनातर्फे विविध उपक्रम राबविले जातात. काही व्यवस्थापनांतर्फे वार्षिक स्वरूपात कर्मचार्यांच्या कामगिरीच्या मोजमाप प्रक्रियेमध्ये संबंधित कर्मचार्याने त्या आर्थिक वर्षात आपले काम योग्य प्रकारे करतानाच कोणते नवे कौशल्य आत्मसात केले, त्याची नोंद ठेवली जाते व दखलही घेतली जाते.
एखादा विशिष्ट शैक्षणिक अभ्यासक्रम नव्याने उत्तीर्ण होणार्या विद्यार्थ्यांना त्या त्या विषयातील शैक्षणिक पात्रता मिळते. तसेच यातून त्यांना पुढील शिक्षणाची संधीही मिळते. एकूणच करिअरच्या आलेखावर आणि प्रगतीच्या संदर्भात अधिकाधिक शैक्षणिक पात्रता फार महत्त्वाची ठरते. मात्र, याच शैक्षणिक पात्रतेच्या आधारे जेव्हा असे पात्रताधारक उमेदवार रोजगाराचाशोध घेतात, त्यावेळी त्यांना आपल्या शैक्षणिक पात्रतेला आवश्यक कौशल्यांची तितकीच गरज भासते. एवढेच नव्हे, तर संबंधित क्षेत्रातील विशेष व विकसित कौशल्याचीही बरेचदा कमतरता जाणवते व त्यावरुनच कौशल्य आणि कौशल्य विकासाचे महत्त्व आपल्याला प्रकर्षाने लक्षात यावे.
उद्योग-व्यवसायाच्या बदलत्या पद्धती व गरजांनुरुप उमेदवार-कर्मचार्यांमधील कौशल्यांमध्ये देखील बदल घडून आलेले दिसतात. यामध्ये प्रचलित कौशल्यांमध्ये वाढ वा विकास आणि नवीन कौशल्यांची पूर्तता करुन ते आत्मसात कसे करावे, हे आव्हान कर्मचार्यांपुढे असतेच. याच स्वरुपाच्या अपेक्षा कंपनी व्यवस्थापनाच्या असतात.
या पार्श्वभूमीवर ‘नव-कौशल्य’ म्हणजे काय, याचा विचार करणे महत्त्वाचे ठरते. थोडक्यात, नव-कौशल्य म्हणजे कर्मचार्यांनी आपल्या कामकाजाला आवश्यक व पूरक कौशल्यांचा अभ्यास करुन, आपल्या कामकाजाला अधिक उत्पादक व प्रभावी करणे होय. यासाठी आवश्यक असे प्रयत्न वा पुढाकार कंपनी-व्यवस्थापनाकडून केला जातो. मात्र, त्याला कर्मचार्यांचा साद-प्रतिसाद मिळणे देखील तितकेच आवश्यक ठरते.
एक प्रस्थापित व्यवस्थापन वास्तव म्हणजे ‘कर्मचारी’ नव्हे, तर ‘कौशल्यपूर्ण कर्मचारी’ ही कुठल्याही कंपनीसाठी नेहमीच एक जमेची बाजू. यासाठी व्यवस्थापन कायम प्रयत्नशील असते. याचे प्रत्यंतर उमेदवारांच्या मुलाखत-निवड प्रक्रियेपासून येते. जे उमेदवार कंपनीची प्रक्रिया-व्यवसायासाठी आवश्यक पात्रता व कौशल्य ज्या उमेदवारांकडे असतात, अशांना निवड करताना प्राधान्य दिले जातेच. प्रसंगी अशा उमेदवारांना त्यांच्या कौशल्य-पात्रतेनुसार वाढीव वेतन दिले, हे यासंदर्भात लक्षणीय ठरते.
दुसरीकडे उमेदवार-कर्मचार्यांच्या दृष्टीने नव-कौशल्य ही बाब फार महत्त्वाची ठरते. नव्या कौशल्यांमुळे उमेदवार म्हणून संबंधितांचा विश्वास वाढतोच, शिवाय नोकरीसाठी वा नोकरीतील बदलांसाठी उमेदवार म्हणून विचार करताना त्यांना त्यांच्या वाढत्या कौशल्यांचा फायदादेखील होतो. अशा उमेदवारांना नेहमीच प्राधान्य दिले जाते. हीच बाब भविष्यकाळाच्या संदर्भातही दिसून येते. जे कर्मचारी नोकरीवर रूजू झाल्यानंतर नवे कौशल्य शिकतात, त्यांचा अवलंब करतात, त्यांना नव्या जबाबदारीसह पदोन्नतीसारखे फायदे निश्चितपणे होतात.
कौशल्य विकासाच्या संदर्भात दुसरा महत्त्वाचा टप्पा म्हणजे मूलभूत वा आधीच्या कौशल्यांमध्ये आवश्यकतेनुरूप व योजनापूर्वक वाढ करणे. कौशल्यांमध्ये भर घातल्याने बदलत्या व स्पर्धेच्या काळात व्यक्तिगत स्तरावर कर्मचारी परिणामकारक व अधिक प्रभावीपणे काम करू शकतात. सध्याच्या व्यावसायिकच नव्हे, तर व्यक्तिगत स्तरावरही वाढती स्पर्धा व मोठ्या औद्योगिकरणाच्या पार्श्वभूमीवर वाढीव कौशल्याला पर्याय नाही.
आज कंपनी-व्यवस्थापनाचा कल आणि भर कर्मचार्यांना अधिकाधिक प्रगत व कौशल्यपूर्ण करण्यावर असतो. यासाठी व्यवस्थापनातर्फे विविध उपक्रम राबविले जातात. काही व्यवस्थापनांतर्फे वार्षिक स्वरूपात कर्मचार्यांच्या कामगिरीच्या मोजमाप प्रक्रियेमध्ये संबंधित कर्मचार्याने त्या आर्थिक वर्षात आपले काम योग्य प्रकारे करतानाच कोणते नवे कौशल्य आत्मसात केले, त्याची नोंद ठेवली जाते व दखलही घेतली जाते. यातून कर्मचार्यांपासून कंपनी स्तरावर कर्मचार्यांचा कौशल्य आलेख संदर्भासाठी उपलब्ध होतो, याचा परिणामकारक उपयोग निश्चितपणे होतो. कौशल्यपूर्ण वा कौशल्यप्राप्त कर्मचार्यांना नवे पद, पदोन्नती यासारखे फायदे अवश्य होतात.

कोरोनानंतरच्या काळात कौशल्य विकासाकडे अधिक गांभीर्याने पाहिले जात आहे. त्या सुमारे दोन वर्षांच्या कोरोना कालावधीने कंपनी आणि कर्मचार्यांच्या काम आणि कामकाज यांचा चेहरामोहरा पूर्णपणे बदललास आहे. अचानक व अकल्पितपणे राष्ट्रीय स्तरावरील टाळेबंदीसह आलेल्या त्या आव्हानपर संकटाने अनेकांपुढे व्यवसाय कामकाजापासून रोजगारापर्यंतचे संकट बहुविध स्वरूपात उभे ठाकले. पर्यायी व्यवसाय, कामकाजाचा शोध त्यातून सुरू झाला. तातडीने सर्वांनाच पर्यायी काम रोजीरोटीचा प्रश्न या स्वरूपात स्वीकारावे लागले. त्यासाठी सर्वात मोठी गरज भासली, ती कंपनीला नवा व्यवसाय शोधून तो पडताळण्याची व कर्मचार्यांनी परंपरागत व चाकोरीबद्ध काम करण्याबद्दलच आग्रही न राहता लवचिक क्षमतेसह नवे व प्रसंगी सर्वस्वी नवीन कौशल्य शिकून, आत्मसात करून त्यांची तातडीने व या आव्हानाकडे संधी म्हणून पाहिले व त्याचा मोठा फायदा सर्वांना झाला. कोरोनानंतरच्या काळात पण अनेक ठिकाणी याचाच प्रत्यय येत आहे. एक नवी लवचिक व परस्परांना कौशल्य विकासाची पार्श्वभूमी निश्चितपणे आहे.
आकडेवारी व तपशीलासह सांगायचे म्हणजे ‘टॅलेंट एलएमएस’ या संस्थेने केलेल्या अभ्यासानुसार कोरोनादरम्यान 42 टक्के कंपन्यांनी बदलत्या व्यावसायिक स्थिती व गरजा लक्षात घेता, कर्मचार्यांना तातडीने व प्रयत्नपूर्वक नवे कौशल्य उपलब्ध करून दिले, तर सुमारे 64 टक्के कर्मचार्यांनी नवे कौशल्य शिकवण्याच्या या प्रयोग वा उपक्रमाला सकारात्मक प्रतिसाद दिला. यामागे अर्थातच कोरोनामुळे अचानक उद्भवलेल्या आव्हानपर परिस्थितीवर मात करण्याची जिद्द होती. त्यामुळेच नव-कौशल्याचा हा नवा उपक्रम कोरोना काळात व विविध आव्हानपर स्थितीत सफल झाला.
नंतरच्या काळात कौशल्य विकासाचे विविध उपयोग व फायदे यांचा दरम्यानच्या काळात कंपनी कर्मचार्यांसह संपूर्ण काळात अर्थ-उद्योगाला टिकाव धरण्यासाठी मोठा फायदा झालाच. शिवाय आता कर्मचारी आणि कौशल्य यांचा नव्याने व नव्या संदर्भासह विचार करण्याची प्रक्रिया प्रामुख्याने सुरू झाली.
सरकारी स्तरावर, राष्ट्रीय स्तरावर 2014 मध्ये केंद्रीय कौशल्य विकास मंत्रालय स्थापन करण्यात आले. त्यानंतर या उपक्रमाला केंद्र आणि राज्य स्तरावर चालना देण्यात आली. या प्रयत्नांचा मुख्य उद्देश देशांतर्गत व्यवसाय, उद्योग क्षेत्राच्या कौशल्यविषयक गरजा व उपलब्ध कौशल्य यामधील तफावत जाणून त्यानुरूप कौशल्य विकास उपक्रमांना देश पातळीवर औद्योगिक क्षेत्रनिहाय चालना देणे, हा होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘स्किल इंडिया’ उपक्रमाचा हा मोठा व महत्त्वाचा टप्पा असल्याने त्यासाठी सातत्याने प्रयत्न होत गेले.
सरकारला तांत्रिक, प्रशासकीय व आर्थिक पाठबळाच्या जोडीने विविध कंपन्या आपल्या कौशल्यविषयक गरजा व प्राधान्यानुरूप यासंदर्भात पुढाकारासह प्रयत्न करीत आहेत. या प्रयत्नांमुळे कंपन्यांना कुशल कामगार मिळवण्याकरिता मोठा लाभ होईल. याशिवाय संबंधित उमेदवारीला कौशल्यप्राप्ती वा कौशल्य विकासाद्वारे नोकरी रोजगाराच्या वाढीव संधी उपलब्ध होऊ शकतात. अशा प्रकारे कौशल्य विकासाचे नवे उपक्रम कर्मचारी कर्मचारी या उभयतांसाठी फायद्याचे ठरणार आहेत.
-दत्तात्रय आंबुलकर