गुजरातच्या नेतृत्वासाठी भाजपची ‘परफेक्ट चॉईस’; कुशल संघटक आणि प्रशासक भुपेंद्र पटेल

नव्या चेहऱ्याचा लाभ भाजपला होणार आहे

    दिनांक  13-Sep-2021 20:17:08
|
patel_1  H x W:

नव्या चेहऱ्याचा लाभ भाजपला होणार आहे
 
 
 
 
नवी दिल्ली, विशेष प्रतिनिधी : गुजरातचे सतरावे मुख्यमंत्री म्हणून भुपेंद्र पटेल यांनी सोमवारी शपथ घेतली. प्रथमच आमदार झालेल्या भुपेंद्र पटेल यांना मुख्यमंत्री करून भाजपने पुन्हा एकदा सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला आहे. मात्र, कुशल प्रशासक आणि संघटक असलेल्या पटेल यांना निवडीमुळे गुजरातच्या विकासाला मोठा लाभ होणार आहे.
 
 
गुजरातमध्ये झालेल्या नेतृत्वबदलामध्ये पहिल्यांदाच आमदार झालेल्या भुपेंद्र पटेल यांच्याकडे मुख्यमंत्रीपदाची सूत्रे सोपविण्यात आली आहे. भुपेंद्र पटेल हे गुजरातमधील अहमदाबाद जिल्ह्यातल्या घाटलोदिया मतदारसंघाचे आमदार आहेत, माजी मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल यांचा पारंपरिक मतदारसंघ पाटीदार मतदारांचे वर्चस्व असलेला आहे. त्यांनी २०१७ साली प्रथमच लढविलेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवाराचा १ लाख १७ हजार मतांनी पराभव केला होता. त्या निवडणुकीत भाजपचा हा सर्वांत मोठा विजय होता.
 
 
भुपेंद्र पटेल हे माजी मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जातात. ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या माध्यमातून त्यांनी आपल्या सामाजिक जीवनास प्रारंभ केला आहे. अजातशत्रू अशी ओळख असलेल्या पटेल यांचे संघटनकौशल्य वादतीत आहे. पाटीदार समाजामध्येही त्यांचे मोठे वजन असून गुजरातमध्ये झालेल्या पाटीदार आरक्षण आंदोलनात त्यांनी समन्वय साधण्यात महत्वाचे भूमिका बजाविली होती. सर्वांत महत्वाचे म्हणजे गुजरातमधील कडवा पाटीदारांची महत्वाची संस्था असलेल्या ‘विश्व उमिया फाउंडेशन’चे ते विश्वस्त आहेत. त्याचप्रमाणे २०० कोटी रुपये खर्चून नुकत्याच उभारण्यात आलेल्या ‘सरदारधाम’ प्रकल्पामध्येही ते विश्वस्त म्हणून कार्यरत आहेत. त्यामुळे पाटीदार समाजामध्ये त्यांना मोठा आदर असून त्यांच्या निवडीमुळे भाजपला असलेला पाटीदार समाजाचा पाठिंबा अधिक मजबूत होणे शक्य आहे. त्यामुळे भविष्यात पुन्हा विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पाटीदार आंदोलनाने उचल खाल्ल्यास त्याची हाताळणी करणे भुपेंद्र पटेल यांना सोपे जाणार आहे.
 
 
अहमदाबाद अर्बन डेव्हलपमेंट अथोरिटीचे अध्यक्षपदी भुपेंद्र पटेल यांनी सांभाळले आहे. आपल्या अध्यक्षपदाच्या कार्यकाळात त्यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांसोबत सुयोग्य समन्वय साधून अहमदाबादच्या विकासासाठी अनेक महत्वाचे निर्णय यशस्वीपणे राबविले होते. त्यांच्या प्रशासकीय कौशल्याचे कौतुक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही केले. ते म्हणाले, “गेल्या अनेक वर्षांपासून मी भुपेंद्र पटेल यांनी ओळखतो आणि त्यांचे काम पाहत आहे. भाजपचे संघटनात्मक कार्य असो अथवा नागरी प्रशासन, सार्वजनिक सेवा; या क्षेत्रांमध्ये त्यांनी अतिशय सकारात्मक काम केले आहे”. त्याचप्रमाणे पटेल यांनी अहमदाबाद महानगर पालिकेच्या शिक्षण मंडळासह स्थायी समितीचेही अध्यक्षपद सांभाळले आहे. त्यामुळे पटेल यांना एकाचवेळी संघटन आणि प्रशासनाचा अनुभव आहे. त्याचप्रमाणे पुढील वर्षी होणाऱ्या राज्याच्या विधानसभा निवडणुकीमध्ये मतदारांसमोरही एक नवा चेहरा भाजपने दिला आहे. याचा निश्चितच लाभ होण्याची शक्यता आहे.
 
 
• ५९ वर्षीय भुपेंद्र पटेल हे इंजिनीअर असून व्यवसायाने बांधकाम व्यावसायिक आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून भाजपच्या संघटन आणि राजकीय कार्यात सहभागी आहेत.
• मेमनगर नगरपालिका सदस्य
• मेमनगर नगरपालिका नगराध्यक्ष
• अहमदाबाद महापालिका शिक्षण मंडळ अध्यक्ष
• अहमदाबाद महापालिका स्थायी समिती अध्यक्ष
• अहमदाबाद अर्बन डेव्हलपमेंट अथोरिटी अध्यक्ष
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.