पार्थ की अजित ? पवारांचा निशाणा नेमका कोणावर

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

Total Views |

pawar_1  H x W:सुशांत सिंह प्रकरणावर राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांनी प्रतिक्रिया देताना आपला नातू पार्थ पवार याच्या बोलण्याला कवडीची किंमत नाहीये. तसेच त्यांची राजकीय कारकीर्द अपरिपक्व आहे, असे विधान केले. या विधानानंतर राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्या. तर हा इशारा नेमका कोणाला अजित की पार्थ पवार अशा चर्चाही सुरु झाल्या आहेत.पार्थ पवार यांची भूमिका कायमच पक्षाशी विसंगत अशीच आढळून येते. त्यातच पार्थ पवार यांनी मागील आठवड्यात सलग दोनवेळा पक्ष विरोधी भूमिका घेतल्याने हा राजकीय वर्तुळातील चर्चेचा विषय ठरला. अयोध्येतील राममंदिर भूमिपूजनाचा सोहळा जाहीर होताच शरद पवार यांनी मंदिर उभारणीमुळे कोरोना पळून जाईल, अशी काहींची समजूत आहे, असे मत व्यक्त केले. मात्र पार्थ यांनी ‘जय श्रीराम’चा नारा देत खुले पत्रच लिहिले. सुशांतसिंग राजपूत या प्रकरणाचा तपास राज्यातील महाविकास आघाडी सरकार व मुंबई पोलीस योग्य दिशेने करत असून कोणत्याही परिस्थिती हे प्रकरण सीबीआयकडे सोपवणार नाही असा पवित्राच राज्याचे गृहमंत्री व राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख यांनी घेतला. मात्र पार्थ पवार यांनी अनिल देशमुख यांची भेट घेत सीबीआय चौकशीची मागणी केली. पार्थ पवार यांच्या या भूमिकांमुळे मात्र शरद पवार व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कोंडीत सापडला.

पार्थ पवार यांना लोकसभा निवडणुकांच्या वेळी मावळमधून उमेदवारी जाहीर करण्यात आली होती. जेव्हा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी लोकसभा निवडणूक न लढण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर रोहित पवार यांनी एक फेसबुक पोस्ट लिहून शरद पवार यांना त्यांच्या निर्णयावर पुनर्विचार करण्याबाबत सोशलमिडीयावर लिहिले होते. यावर नाराजी व्यक्त करत पार्थ पवार यांनी 'रोहितने अशी फेसबुक पोस्ट लिहायला नको होती' अशी प्रतिक्रिया व्यक्त केली होती. पार्थ यांना या निवडणुकांत मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला होता. पार्थ पवार आणि रोहित पवार यांच्याकडे राष्ट्रवादी काँग्रेसची भविष्यकाळातील धुरा आहे. मात्र त्यांच्यामध्येही मतभेद दिसून आले आहेत. तर दुसरीकडे विधानसभा निवडणुकांनंतर अजित पवारांनी भाजपसोबत एकत्र येत सरकार स्थापन केले. मात्र, साडेतीन दिवसानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राजीनामा दिला आणि मुख्यमंत्री फडणवीस यांचे सरकार कोसळले. अजित पवार आणि पार्थ पवार यांच्या पक्षविरोधी भूमिकांना कायमच राष्ट्रवादीतून वैयक्तिक मतांचे लेबल चढविण्यात आले. प्रत्येक वेळी वैयक्तिक मत आहे, असे खुलासे करणे हे पक्षाला शोभनीय नाही. याउलट, शरद पवार यांचे दुसरे नातू रोहित पवार व मुलगी सुप्रिया सुळे हे कायम पक्षाला सुसंगत अशाच भूमिका घेताना दिसतात. लोकसभा निवडणुकांमधील रोहित यांच्या विजयानंतर शरद पवार यांच्यासमवेत रोहितची उपस्थिती अधिक दिसू लागली आहे. अर्थातच पार्थ पवारांच्या या भूमिकेमागे त्यांचे वडील व राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा वरदहस्त असण्याची कुजबुजही पक्षांतर्गत सुरु आहेत.शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी यांना एकत्र आणत राज्यात महाविकास आघाडी स्थापन करून भारतीय जनता पक्षाला सत्तेपासून दूर ठेवण्यात जरी शरद पवारांना यश आले असले तरीही पक्षांतर्गत धुसफूस व नेत्यांची नाराजीदेखील अशा विधानातून जगजाहीर आहे. त्यामुळे अजित पवार आणि पार्थ पवार एकीकडे तर शरद पवार, सुप्रिया सुळे व रोहित पवार दुसरीकडे असे दोन मतप्रवाह सध्या राष्ट्रवादीत दिसत आहेत. यातून जर ही वक्तव्ये होत असतील तर भविष्यात पुन्हा एकदा अजित पवार व पार्थ पवार यांना मानणारा राष्ट्रवादीतील एक गट भारतीय जनता पक्षासोबत जात राज्यात सत्ता स्थापन करेल ही शक्यता आणखी दाट होताना दिसते. अर्थातच हा प्रयोग आपण सर्वांनी एकदा अनुभवला आहे. पार्थ पवार यांची वक्तव्ये वैयक्तिक जरी असली तरी त्यामागे अजितदादा पवार यांचा पाठिंबा असण्याची शक्यताही नाकारता येत नाही. त्यामुळे शरद पवारांचा आजचा इशारा नेमका कोणाला होता अजित की पार्थ पवार ?
@@AUTHORINFO_V1@@