सॉरी उद्धव काका ! आमचंचं चुकलं !

    दिनांक  07-Jun-2020 19:28:04
|
Uddhav Thackeray _1 

एका लहान मुलीसमोर 'व्हिलन' आपण बनू नये म्हणून काळजी घेणाऱ्या मुख्यमंत्री उद्धव काका ठाकरेंना आज संपूर्ण महाराष्ट्र सॉरी म्हणतोय... असाल तुम्ही 'बेस्ट सीएम', सर्वांचे लाडके मुख्यमंत्री यात वाद नाहीच पण उद्धव काका आमची काय चूक ? आम्ही वेठीस का धरले जातोय ? तुमचं राज्य आहे ना मग जनता अशी वाऱ्यावर का सोडलीय ?


सोनू सूदसारख्या भल्या माणसांनी मदत करू पाहिली तर तुमचे नेते त्यांना भाजपचे लेबल लावून खच्चीकरण करू पाहतात. तुमच्याविरोधात कुणी शब्द काढला तर राजकारण करू नका, असे ठाकरी भाषेत खडसावून तुम्ही मोकळे होता. तुम्ही फेसबूक लाईव्ह केलं, अगदी छान गप्पा मारल्यात, कित्येकांनी तुम्हाला आधारही मानलं मग उद्धवकाका तुमच्यावर विसंबून राहणाऱ्यांना असे दिवस का दाखवताय? 


विरोधी पक्षातले लोक दौरे करून त्रुटी दाखवू पाहतात त्यांना ट्रोल केले जाते. राज्यात हाताबाहेर गेलेल्या परिस्थितीवर बोलायचा हक्क आम्हाला नाही का ? आम्हाला काही खुपलं, लागलं तर सरकार म्हणून दाद कुणाकडे मागायची. मुंबईतल्या रुग्णांलयाची अवस्था आणि त्यात उपचार देणाऱ्यांची व्यवस्था संभ्रमित का आहे ? पालिकेची सत्ता इतकी वर्षे हातात असताना ती सुरळीत व्हावी यासाठी आपण काही करणारच नाही का ? असो जगातही अशीच परिस्थिती आहे, तुम्हाला दोष देऊन काय होणार म्हणा पण आज जर न जाणो कुणी आजारी पडला तर त्याची अवस्था काय आहे, रुग्णालये त्याला दाखल करून घेतली का ? कोरोना चाचणी करणाऱ्या खासगी लॅबवर नियंत्रण का आणण्यात आले. 


राज्यात सुरू असलेल्या जनआरोग्य योजनेचे काय झाले ? रुग्णांना तातडीने आणि सुरळीत उपचार मिळण्यास अडचणी कुठे येत आहेत ?, तुम्ही झालेल्या चुका मान्यही करता पण त्या सुधारण्याची तयारी प्रशासन आणि राजकीय पातळीवर का दाखवली जात नाही ? कोरोनाबाधित पोलीसांचा आकडा तीन हजारांवर पोहोचला आहे. तीस जणांनी आपला जीव गमावला आहे, कित्येकजण आजघडीला मृत्यूशी झुंज देत आहेत. सुरुवातीला जे पोलीस तंतोतंत लॉकडाऊनचे नियम पाळले जावेत यासाठी प्रयत्न करत होते त्यापैकी आज कित्येकजण आपल्यात नाहीत.


लॉकडाऊन लागू झाला तेव्हाची रुग्णसंख्या काही हजारांवर होती. आत लाखोंच्या घरात कोरोना रुग्णांची आकडेवारी जात असताना लॉकडाऊन शिथिल आणि फिरण्यासाठी मोकळीक देऊन कोरोना योद्ध्यांची थट्टा आपण चालवली आहे का ? असा विचार आपण का करत नाही? लोकांना जर कोरोनाचे गांभीर्य समजले असते तर दक्षिण मुंबईत उच्चभ्रू वस्तीत मरीन ड्राईव्हला रविवारी सकाळी फेरफटका मारण्यासाठी इतकी गर्दी झालीच नसती काका ! 


काका तुम्हाला ठाऊक आहे न मुंबई महापालिकेतील आपल्या प्रदीर्घ सत्तेला किती वर्षे पूर्ण झालीत ? तेव्हापासून मुंबईतील बकाल झोपडपट्ट्या हटवणे आणि नियोजित शहराची पूर्नउभारणी करणे शक्य झाले नसते का ? नसेलही पण प्रयत्न तरी करायला नको होते का ? आज मुंबईतील झोपडपट्ट्यांमध्ये फोफावणारा कोरोना हा तिथली अस्वच्छता आणि सोशल डिस्टंसिंगच्या अभावामुळे झाला हे तुम्ही मान्य कराला का ? आत्ता शिवसेनेच्या शाखांचेच उदाहरण घेऊ मुंबईतील सर्वाधिक शाखा आणि छोटी कार्यालये तिथली परिस्थिती आपण लक्षात घेतली तरीही तुम्हाला उर्वरित मुंबईतील भयाण परिस्थितीची जाणीव येईल.केंद्रातर्फे प्रत्येक घरात शौचालय योजना जाहीर झाली होती. पालिका स्तरावरही याची जोरदार जाहिरातबाजी झाली. मात्र, राईट टू पी या संस्थेच्या अहवालात मुंबई महापालिकेची ही योजना किती फोल ठरली हे दाखवून दिले. कोरोना राईट टू पी या सर्वेक्षणात नऊ लाख नागरिकांमागे केवळ ३५० शौचालय उपलब्ध असल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली. आजही मुंबईतील कित्येक चाळीत राहणाऱ्या महिला-पुरुषांना सकाळी उठल्यावर शौचालयाबाहेर रांगा लावाव्या लागतात हे भयाण वास्तव आहे. ठरवलं तर सर्वकाही होऊ शकतं परंतू इच्छाशक्तीचा अभाव असलेल्या या वस्त्या, वाड्या आपण कधीच वाऱ्यावर सोडून दिल्या. पाण्याचाही प्रश्न तोच... मुंबईत सात हजार किमी अंतराच्या जलजोडण्या उपलब्ध असल्याचा दावा तुम्ही करता परंतू, आज धारावी, मुंबई उपनगरांसारख्या झोपडपट्ट्यांमध्ये नागरिकांना पाण्यासाठीही रांगा लावाव्या लागतात. आरोग्य यंत्रणांचीही अवस्था तशीच आहे. मुंबईतील दाटीवाटीच्या झोपडपट्ट्यांमध्ये रुग्णवाहिकाच पोहोचू न शकल्याने नागरिकांना जीव गमावल्याचा घटना गेल्या काही दिवसांत तुमच्याही कानावर आल्या असतील. काहीजणांनी रिक्षातच प्राण सोडला तर काहींनी रुग्णालयाच्या दारातच... आम्ही तुमच्याकडे कधी भली मोठी मागणी केली नाही, आमच्यासाठी माणसला मोकळा श्वास घेण्यासाठी लागणाऱ्या मुलभूत सोयीच मागितल्या. पण काका तुम्ही त्याही देऊ शकला नाहीत हे राजकारणी म्हणून तुमचं दुर्दैव आणि मुंबईचे नागरिक म्हणून आमचेही. तिकडे दक्षिण मुंबईत काही वेगळी परिस्थिती नाही. कित्येक इमारतींतील नागरिकांमध्ये कोरोनाचा फैलाव अगदी सहज झाला तोही कम्युनिटी स्प्रेडमुळेच. आम्ही कधी परदेश दौरे केले नाहीत वा बाप जन्मात कुणी विदेश पाहिला नाही. पण बाहेरून आलेल्यांनी मात्र, आमच्या इथल्या माणसाला या संकटाच्या दरीत लोटले. चाकरमानी, मुंबईकर, सणासुदीला, तुमच्या मिरवणूका, रॅलींमध्ये बेभान होऊन नाचणारा प्रत्येकजण तो मीच आहे. मुंबईवर संकट ओढावलं म्हणून तिला कुठे सोडून जायचं नाही म्हणणारा मीच आहे. पण तुम्ही मात्र, सर्वात आधी परराज्यांतील मजूरांची सोय केलीत. मान्य ती काळाची गरजही होती. पण आमच्या गावी जाण्याच्या व्यवस्थेचे काय ? परराज्यांतील मजूरांना मोफत रेल्वे, आम्हाला गावी सोडण्यासाठी मात्र, दुप्पट-तिप्पट तिकीट... का कारण आम्ही महाराष्ट्रातले म्हणून का ? गावाला गेल्यावरही तिथे सोय होईल का नाही, वाटेत कुणी अडवतील का याची भीती कायम आहे... काका आज माझ्या घरातले सर्वजण कोरोनाशी झुंज देतायत, माझ्या सारख्या कित्येकजणांची अवस्था अशीच आहे. यातले बरेचसे जण तुमच्या मागे फिरणारे, तुम्हाला तुमच्या पक्षाला आपला मानणारे आहेत. पण संकटात काय झालं काय ? तुमचा नगरसेवकही आमची विचारपूस करायला आला नाही ना आमदार आला ना खासदार... असो तुम्ही म्हटलं तसं राजकारण करायची वेळ नाही... ते करायला संपूर्ण आयुष्य आहे. पण ज्यांनी आपलं आयुष्यच गमावलं त्यांचा कुणीतरी म्हणून मी जाब विचारायचा कुणाला? म्हणून आधीच म्हटलं सॉरी उद्धव काका ! - एक मुंबईकर
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.