मराठी शुद्धलेखनतज्ज्ञ अरुण फडके यांचे निधन

    दिनांक  14-May-2020 14:32:18
|
Arun Fadake _1  


 
 
ठाणे : मराठी शुद्धलेखनतज्ज्ञ अरुण फडके यांचे कर्करोगामुळे गुरुवारी (१४ मे) निधन झाले. गेल्या काही दिवसांपासून ते नाशिक येथे वास्तव्याला होते. मुळचे ठाणेकर असलेल्या फडके यांनी 'शुद्धलेखन ठेवा खिशात' या छोट्या पुस्तिकेद्वारे समग्र मराठी लेखन-कोशापर्यंत विविध प्रकारची पुस्तके लिहिली. 'शुद्धलेखन ठेवा खिशात' हे त्यांच्या पुस्तकावर आधारित असलेले अॅपही अनेकांना खूप उपयुक्त ठरले. पुस्तकलेखनाबरोबरच शुद्धलेखन कार्यशाळांच्या माध्यमातूनही ते मराठी भाषेच्या शुद्धतेविषयी लोकांना जागरूक करण्याचे कार्य करत होते. गेली काही वर्षे कर्करोगाशी लढा देत असतानाही त्यांचे कार्य अविरत सुरूच होते. वडिलोपार्जित मुद्रण व्यवसायात असलेले फडके सुरुवातीला व्यवसायाची गरज म्हणून मुद्रितशोधन करू लागले. 
 
 
 
 
भाषेची आवड त्यांना पूर्वीपासून होतीच. त्यातूनच त्यांनी पुढे मराठी शुद्धलेखन या विषयाला वाहून घेतले. त्यांनी लिहिलेली पुस्तके म्हणजे मराठी भाषेसाठी एक अमूल्य ठेवा आहे. मराठी भाषेच्या भवितव्याविषयी चिंता व्यक्त करणारे लोक बरेच असले, तरी ती शुद्ध (नियमानुसार) लिहिणारे किंवा तशा प्रकारे वापरणारे, वापरण्याची इच्छा असणारे लोक फारच कमी. त्यांची संख्या दिवसेंदिवस कमीच होत जाते आहे. अशा परिस्थितीत अशा जाणकार, पथदर्शक आणि भाषेच्या सुयोग्य वापरासाठी झटणाऱ्या व्यक्तीचे जाणे खूप मोठी पोकळी निर्माण करणारे आहे, अशी भावना मराठी साहित्य विश्वातून व्यक्त केली जात आहे.आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.