‘बियांका’सोबतची एक संध्याकाळ

    दिनांक  19-Apr-2020 20:12:02
|
leopard _1  H x
 
 
 

बिबट्या जी आरती आणि अजानला उपस्थित राहते

 
 
 
निकीत सुर्वे - गजबजलेल्या मुंबईच्या कुशीत वसलेल्या ’आरे’च्या जंगलातील ती एक हिवाळी संध्याकाळ होती. आम्हा मुंबईकरांवर एक दिवस जरी उन्हाचा जाच कमी झाला, तरी तो दिवस आम्हाला थंडगार वाटतो. प्रामाणिकपणे सांगतो, मी हिवाळ्याच्या दिवसांमध्ये शाळेत कधी स्वेटर घालून गेल्याचं आठवत नाही. परंतु, ’आरे’त राहणार्‍या लोकांच्या बाबतीत असं कधीच घडत नाही. ’आरे’त शिरल्यावरच तुम्हाला तापमान कमी झाल्याचं जाणवतं आणि थंडी बोचायला सुरुवात होते. इथलेे रहिवासी तर मार्चच्या पहिल्या आठवड्यापर्यंत स्वेटर, मफलर, कानटोप्या असा हिवाळी कपड्यांचा लवाजमा घालून असतात.
 
 
 
 
अशा या आरेच्या जंगलात शिशिरातल्या एका थंडगार सायंकाळी (१६ डिसेंबर, २०१९) मी सतीशच्या घराबाहेर काम करत बसलो होतो. घराबाहेरच्या चारपायीवर आरामात बसून माझं ’कॅमेरा ट्रॅप’मधील डेटा तपासण्याचं काम सुरू होतं. तेवढ्यात विचित्र अशा काही आवाजांनी आमचं लक्ष वेधलं. माझ्या आणि सतीशच्या मनात त्या आवाजाविषयी शंकेची पाल चुकचुकली. पण, लगेच लक्षात आलं की, हा आवाज माझ्या वजनदार बॅगखाली दबलेल्या मोबाईलचा आहे. व्हायब्रेट मोडवर असलेला फोन वाजू लागल्याने त्यामधून तो चित्रविचित्र आवाज येत होता.
 
 
मी फोन उचलल्याबरोबर दुसर्‍या बाजूने आवाज आला की, माझ्या मुलाची परीक्षा चांगली का गेली नाही? या प्रश्नाने मी थोडा गोंधळात पडलो. पण, लगेच लक्षात आलं की, हे ’क्रॉस-कनेक्शन’ झालं आहे. मी फोन कट करुन पुन्हा लावला. नेटवर्क शोधण्यासाठी चारपायीवरुन उठून घराच्या व्हरांड्यापर्यंत गेलो. फोनवरील संभाषणात लक्ष गुंतलेलं असताना एक कुत्रा माझ्यासमोर अचानक येऊन थांबला. काही समजण्यापूर्वीच त्याने माझ्या अंगावर जीवाच्या आकांताने जोरजोरात भुंकायला सुरुवात केली. त्याच्या या अशा वागण्यामुळे मी थोडासा गडबडलो. पण, काहीच क्षणात लक्षात आलं की, तो माझ्यावर नाही तर माझ्यामागे असणार्‍या किंवा घराच्या अवतीभवती असलेल्या कोणत्यातरी गोष्टीवर भुंकतोय. बिबट्या असण्याच्या शक्यतेने मी सतीशला घराभोवतीचा परिसर तपासायला सांगितला. सतीश लागलीच टॉर्च घेऊन अंधाराच्या दिशेने गेला. टॉर्चचे बटण दाबल्याबरोबर त्यामधून निघालेला प्रकाश अंधाराला कापून मादी बिबट्यावर पडला. बांबूच्या कुंपणामागे ती उभी होती. एखादा वणवा पेटावा तसं तिचं शरीर त्या प्रकाशात चमकलं. घराभोवती फेरी मारून ती काजवी प्रकाशात जंगलामध्ये गायब झाली.
 
 

leopard _1  H x 
 
 
 
 
 
इतक्या सहजपणे बिबट्या दिसल्याने मला माझ्या डोळ्यांवर विश्वासच बसत नव्हता. कारण, बिबट्याला पाहण्याच्या उद्देशाने आम्ही रानवाटा तुडवट ज्यावेळी जंगलात जातो, तेव्हा इतर प्राण्यांच्या’अलार्म कॉल्स’चा अंदाज घेऊन तासन्तास पाठवठ्यांवर बसतो. तरीदेखील बहुतांश वेळा बिबट्याची सावलीदेखील दिसण्याचे सुख आम्हाला मिळत नाही. त्यामुळे ही घटना माझ्यासाठी खास होती. आम्ही टॉर्चच्या आधारे तिचा मागोवा घेण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. पण, अंधारात एखादी सावली विरघळावी तशी ती अरण्यातील तमात विरघळून गेली होती. मी पटकन विद्याशी फोनवर सुरू असलेलं बोलणं संपवलं आणि बिबट्याला बघण्याच्या नादात तिला खूप वेळ होल्डवर ठेवल्याबद्दल माफी मागितली. आम्ही पुन्हा येऊन चारपायीवर विसावलो. रात्र चढू लागल्याबरोबर थंडीचा जोरदेखील वाढत होता. या सर्व घटनेमुळे माझ्या अंगात संचारलेला उत्साहदेखील मावळत होता. तोपर्यंत सतीशसुद्धा सोशल मीडियावर लोकांशी बोलण्यात व्यग्र झाला होता.
 
 
 
सतीशच्या घरी संध्याकाळच्या आरतीला सुरुवात झाली. आरतीमधल्या घंटीचा आवाज ऐकू येत असतानाच बिबट्याच्या गुरगुरण्याचा आवाज आमच्या कानावर पडला. आम्ही सावध झालो. पुन्हा आमचा बिबट्या शोधाचा प्रवास सुरू झाला. काळोखात ती मादी बिबट्या कुठेच नजरेस पडली नाही. मात्र, आम्ही तिचा आवाज स्पष्टपणे ऐकू शकत होतो. तिला हेरण्याचे खूप प्रयत्न केल्यावर आमचे अवसान गळले. पण, आवाजावरुन ती १०० मीटरच्या परिघात असल्याची खात्री आम्हाला होती. मी पुन्हा कामाला लागलो आणि अगदी सात ते आठ मिनिटांनीच मादी बिबट्याचे गुरगुरणे पुन्हा ऐकू येण्यास सुरुवात झाली. खरं सांगायचं, तर तोपर्यंत आमच्या अवतीभोवती असलेल्या तिच्या अस्तित्वामध्ये आम्ही सरावण्याचा प्रयत्न करत होतो. त्याचवेळी मला आजूबाजूला सुुरू असलेले सर्व सूक्ष्म आवाज हळूहळू अवगत होत गेले. आरतीचे मावळणारे सूर, घरात सुरू असलेल्या स्वयंपाकातील भांड्यांचा आवाज आणि मादी बिबट्याचा गुरगुरण्याचा संगम होऊन ऐकाचवेळी हे सगळे आवाज माझ्या कानावर पडत होते. सूर्यास्तानंतर एखादी युद्धभूमी शांत व्हावी, तसे हे सर्व आवाज शांत होत गेले आणि त्या शांततेला भेदून पुन्हा एकदा बिबट्याचा आवाज सुरू झाला. त्याचवेळी अजानचे सूर आणि शेजारीच खेळत असलेल्या मुलांचा आवाजदेखील कानावर पडला.
 
 

leopard _1  H x 
 
 
 
मी नेहमीच अशा घटनाचा संदर्भ आपल्या दैनंदिन आयुष्यातील गोष्टींशी लावत असतो. ही घटना मला ’भेलपुरी’सारखी वाटली. गोड, आंबट, तिखट, खारट अशा सगळ्या चवींची सरमिसळ भेलपुरीमध्ये असते. या घटनेमध्येही तशाच सर्व घटकांचे मिश्रण होते. हिंदू आणि मुस्लीम या दोन्ही भिन्न धर्मांच्या प्रार्थना एकाच वेळी सुरू होत्या. प्रसंगी निष्पाप मुलं आणि जगाला धोकादायक वाटणारा बिबट्यादेखील एकाच वेळी एकाच परिसरात होते. बिबट्याला पाहण्यासाठी अंगात संचारलेल्या उत्साहाला आम्ही वेठीला बांधू शकलो नाही. मी आणि सतीशने बाहेर फिरायला जाण्याचा निर्णय घेतला. घराबाहेर पडणार तेवढ्यात सतीशच्या घरी आलेल्या एका पाहुण्याने ’संभल के....शेर आसपास है’ अशी चेतावणी दिली. ’बाहेर पाऊस पडतोय... छत्री घेऊन जा’ हे वाक्य जितक्या सहजपणे बोलले जाते, तितक्या सहजतेने तो पाहुणा आम्हाला सांगून गेला. त्यानेसुद्धा बिबट्याचा आवाज ऐकला होता. बिबट्याचा माग काढत असताना मला मुलींच्या गप्पांचा, लहान मुलांच्या खेळण्याचा आणि सतीशच्या घरी सुरू असलेल्या शिकवणीचा आवाज येत होता. यावेळीसही आमच्या हाती निराशाच आली. मादी बिबट्याला न पाहताच आम्ही घराकडे परतलो. परंतु, आम्हाला माहीत होतं की, ती आसपासच कुठेतरी आहे.
 
 
 
 
 
चारपायीवर येऊन बसण्यापूर्वी शेवटचा प्रयत्न म्हणून सतीश टॉर्च घेऊन बिबट्याला पाहण्यासाठी उठला. प्रयत्नांती परमेश्वर म्हणतात ना, तसं काहीसं झालं. आमच्यापासून अवघ्या 50 मीटरच्या अंतरावर ती बसून होती. टॉर्चच्या त्या मिणमिणणार्‍या प्रकाशात मी लागलीच तिचे काही फोटो काढून घेतले. तिच्या अंगावरील गुलाबाच्या फुलांसारख्या खुणा (रोसेट पॅटर्न) तपासल्यानंतर ती ’बियांका’ नामक (एल80) मादी बिबट्या असल्याचे आमच्या लक्षात आले. 2019 च्या उन्हाळ्यातील ’कॅमेरा ट्रॅपिंग’मध्ये दोन पिल्लांसह तिचा फोटो आम्हाला मिळाला होता. त्यामुळे कदाचित त्यावेळी ती आपल्या पिल्लांना बोलवण्यासाठी गुरगुरत होती. या रात्री मी अवाक झालो होतो. मुंबईकर बिबटे इथल्या शहरी जीवनाशी किती सरावले आहेत, याची प्रचिती पुन्हा एकदा मला आली होती. आरेमधल्या’लुना’नामक मादी बिबट्याची मुलगी म्हणजे ’बियांका.’ ’लुना’देखील याच परिसरात लोकांच्या अस्तित्वातही सावलीसारखी वावरायची. लोकवस्तीत बड्या शिताफीने वावरण्याचीही कला तिने ’बियांका’ला शिकवली. आता ’बियांका’ही कला आपल्या पिल्लांना शिकवतेय. केवळ बिबटेच ही कला अवगत करत नाही आहेत, तर इथल्या माणसांनीसुद्धा जागृकतेने बिबट्यासोबतच्या सहजीवनाची कला आत्मसात केली आहे.
 
 
 
(लेखक वन्यजीव संशोधक असून मुंबईत अधिवास करणार्‍या बिबट्यांवर संशोधनाचे काम करत आहेत.)
अनुवाद- अक्षय मांडवकर
 
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.