डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जींनी सांगितलेल्या मार्गावर देश चालला असता तर देशातले आर्थिक व वैचारिक चित्र वेगळे दिसले असते : आ. अतुल भातखळकर

    दिनांक  12-Feb-2020 18:37:14

atul_1  H x W:
डॉ. गिरीश दाबके लिखित “डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी- एका वादळात हरवलेले महावादळ” या पुस्तकाचे प्रकाशन संपन्न

मुंबई : सुप्रसिध्द लेखक डॉ. गिरीश दाबके लिखीत डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांचे चरित्र म्हणजे केवळ त्यांचा चरित्रपट नसून समकालीन राष्ट्रीय व आर्थिक घडामोडींचा वैचारिक पट वाचकांसमोर ठेवणारे पुस्तक होय, अशा गौरवपर शब्दात आ. अतुल भातखळकर यांनी डॉ. गिरीश दाबके यांचे अभिनंदन केले.

सुप्रसिध्द लेखक डॉ. गिरीश दाबके यांनी डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या जीवनावर आधारित पहिले मराठी भाषेतील “डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी- एका वादळात हरवलेले महावादळ” या पुस्तकाचे काल बोरीवली येथील अटल स्मृती उद्यान येथे आ. अतुल भातखळकर यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. या कार्यक्रमाला ज्येष्ठ लेखक व विचारवंत सच्चिदानंद शेवडे हे सुद्धा उपस्थित होते. पुणे येथील नाविन्य प्रकाशनाने हे पुस्तक प्रकाशित केले असून डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या जीवनावर आधारित चरित्रावर प्रकाश टाकणारे हे मराठी भाषेतील पहिलेच पुस्तक होय.

हिंदू निर्वासितांच्या प्रश्नावर डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी केंद्रिय मंत्रिमंडळातून राजीनामा दिला होता. सद्याच्या स्थितीमध्ये संपूर्ण देशभर चालू असलेल्या नागरिकत्व संशोधन कायद्याच्या गदारोळाच्या संदर्भात याचे महत्व अधिकच वाढते असे या प्रसंगी बोलताना भातखळकर म्हणाले. देशाच्या स्वातंत्र्याच्या आधीपासूनच डॉ. मुखर्जी यांनी राष्ट्रवादी विचारातून जनतेच्या प्रश्नांची मांडणी केली व आज देशभरातला प्रमुख पक्ष असलेल्या भाजपाची पायाभरणी करणारा पक्ष डॉ. मुखर्जी यांनी उभा केला. या देशाच्या संस्कृतीच्या आधारावर विचार करणारा पक्ष त्यांनी जन्माला घातला व अल्पावधीतच देशाच्या राजकीय पटलावर जम्मू-काश्मीर च्या प्रश्नांच्या माध्यमातून देशाची एकात्मता पुढे आणली. देशातल्या संमिश्र अर्थव्यवस्थेचा पाया सुद्धा डॉ. मुखर्जी यांनी आपल्या उद्योग मंत्रीपदाच्या कार्यकाळात घातला, याकडे सुद्धा आ. भातखळकर यांनी लक्ष वेधले. डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी यांच्या आकस्मित व रहस्यमय मृत्यू मुळे देश मोठ्या विचारांना मुकला. डॉ.मुखर्जींनी सांगितलेल्या मार्गावर देश चालला असता तर देशातले आर्थिक व वैचारिक चित्र याच्या पेक्षा वेगळे दिसले असते असेही प्रतिपादन आ. भातखळकर यांनी केले. अत्यंत माहितीपूर्ण व सरळ-सोप्या भाषेत हे चरित्र लिहिल्याबद्दल डॉ. गिरीश दाबके यांचे अभिनंदन करून आगामी काळात त्यांनी भारताची फाळणी या विषयावर संशोधनपूर्ण विस्तृत लिखाण करावे अशी अपेक्षाही या प्रसंगी आ. भातखळकर यांनी व्यक्त केली. यावेळी सच्चिदानंद शेवडे यांनी सुद्धा आपले मत मांडून डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या विचारांवर प्रकाश टाकला.

या कार्यक्रमाला नाविन्य प्रकाशनचे नितीन खैरे, ज्येष्ठ साहित्यिक प्रमोद बापट, सुधीर शिंदे, संजय जैस्वाल आदी प्रमुख उपस्थित होते.