अभिनेता संग्राम समेळला फोनवरून त्रास देणारी तरुणी अखेर सापडली!

    दिनांक  29-Jan-2020 16:58:26
sangram samel_1 &nbs
मुंबई : काही दिवसांपूर्वी अभिनेता संग्राम समेळने स्वीटी सातारकर नामक तरुणी त्याला सतत मेसेजेस पाठवून हैराण करत असल्याची तक्रार सोशल मीडियात पोस्ट टाकून केली होती. त्यामुळे ही स्वीटी सातारकर कोण असा प्रश्न निर्माण झाला होता. या स्वीटी सातारकरचा पत्ता अखेर आता सापडला आहे. ‘स्वीटी सातारकर’ कोणीही व्यक्ती नसून, संग्रामच्या आगामी चित्रपटाचे नाव आहे. या चित्रपटाचा धमाल टीजर सोशल मीडियाद्वारे सादर करण्यात आला आहे.

मुनाफ नाईक, संतोष साबळे यांनी निर्मिती केलेल्या या चित्रपटाचे दिग्दर्शन शब्बीर नाईक यांनी केले आहे. सुमित गिरी यांनी चित्रपटाचे लेखन, संतोष मुळेकर यांनी संगीत दिग्दर्शन, फैसल महाडिक यांनी संकलन, मंगेश कांगणे आणि सुहास सावंत यांनी गीतलेखन केले आहे. चित्रपटात अमृता देशमुख, संग्राम समेळ, विजय निकम, गौरी जाधव, वंदना वाकनीस, पुष्कर लोणारकर, विनम्र भाबल, प्रशांत विचारे अशी दमदार स्टारकास्ट आहे.


अत्यंत अतरंगी अशा ‘स्वीटी सातारकर’ या तरुणीची गोष्ट या चित्रपटात मांडण्यात आली आहे. एका तरुणाच्या मागे लागलेल्या या स्वीटी सातारकरला तो तरुण मिळतो का, अशी गोष्ट या चित्रपटात आहे. चित्रपटाच्या टीजरवरून हा चित्रपट पुरेपूर मनोरंजक आणि फ्रेश दिसतो आहे. त्यामुळे या चित्रपटाकडे आता चित्रपटप्रेमींचं लक्ष लागले आहे.