मुख्यमंत्र्यांची ‘बाहुबली-२’ दाखवण्यास सुरुवात ?

    दिनांक  24-May-2017   


 

पुढचा ‘सीन’ कोणता, मंत्रालयात रंगली चर्चा

 

निमेश वहाळकर, मुंबई, दि. २४

दि. २० ते २२ मे दरम्यान भरवण्यात आलेले राज्य विधीमंडळाचे विशेष अधिवेशन जसे जीएसटीमुळे गाजले तसेच विविध नेत्यांच्या एकमेकांवरील राजकीय आरोप-प्रत्यारोपांनी. विरोधी पक्षातील राष्ट्रवादीचे जयंत पाटील, अजित पवार, सुनील तटकरे तसेच कॉंग्रेसचे नारायण राणे यांनी जीएसटीवरील भाषणात सत्ताधारी भाजपमधील मंत्र्यांना व नेत्यांना उद्देशून शाब्दिक चिमटे काढण्याची संधी साधून घेतली. यात जयंत पाटील सर्वांत आघाडीवर होते. पाटील यांच्या २२ तारखेच्या साडेतीन तासांच्या मॅरेथॉन भाषणात जीएसटीवरील चर्चा कमी आणि राजकीय टीका-टिप्पण्याच जास्त होत्या. तसेच मुख्यमंत्र्यांनाही डिवचण्याचा प्रयत्न पाटील यांनी करून पाहिला.

जयंत पाटील यांच्या या भाषणादरम्यान त्यांनी आपला मोर्चा भाजपचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्याकडे वळवला. यावेळी या दोघांच्या बोलण्यातून ‘कट्टप्पाने बाहुबली को क्यू मारा?’ हा लोकप्रिय प्रश्न उपस्थित झाला. याचे अनेकांनी मग निरनिराळे राजकीय अन्वयार्थ काढण्यास सुरुवात केली आणि विधानसभेतील हा प्रसंग सोशल मिडियासह सर्वत्र व्हायरल झाला. जीएसटी मंजूर झाल्यानंतर सभागृहाच्या अभिनंदनासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उभे राहिले. त्यांच्या भाषणादरम्यान त्यांच्याकडे एक चिठ्ठी आली, की ‘कट्टाप्पाने बाहुबली को क्यू मारा’. यावर फार काही न बोलता विरोधकांना उद्देशून ‘तुम्ही म्हणत असाल तर, बाहुबलीचा पार्ट-२ दाखवण्यास मी तयार आहे.’ एवढेच सूचक वक्तव्य केले आणि मुख्यमंत्री स्मितहास्य करत पुन्हा जीएसटीवर बोलू लागले.

अपेक्षेप्रमाणे हे विशेष अधिवेशन संपल्यावर लगेच दुसऱ्याच दिवशी संध्याकाळपर्यंत एखादा बॉम्बगोळा येऊन पडावा तशी बातमी सर्वत्र ‘व्हायरल’ झाली ती म्हणजे, पुण्याजवळच्या सु(?)प्रसिद्ध ‘लवासा लेक सिटी’चा विशेष प्राधिकरण दर्जा मुख्यमंत्र्यांनी काढून घेतल्याची. कॉंग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या काळात विशेषतः राष्ट्रवादी व त्यातही पवार कुटुंबियांचे आर्थिक हितसंबंध गुंतले असल्याचे आरोप लवासा प्रकल्पावर झाले होते. याशिवाय अनेक आरोपांनी मलीन झालेल्या लवासा प्रकल्पाला सरकारी मेहेरबानीतून ‘विशेष प्राधिकरणा’चा दर्जाही देण्यात आला. हा दर्जा काढून घेत मुख्यमंत्री फडणवीस यांनी लवासा प्रकल्पाला सणसणीत चपराक लगावत लावसाला पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण अर्थात पीएमआरडीएच्या नियंत्रण कक्षेत आणले. आता यापुढे प्रत्येक छोट्या-मोठ्या कामासाठी लवासाला पीएमआरडीएची परवानगी घ्यावी लागणार आहे.

हा निर्णय जाहीर होतो न होतो तोच संध्याकाळी खुद्द राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार हेच मुख्यमंत्र्यांच्या भेटीला सह्याद्री अतिथीगृहावर दाखल झाल्याची बातमी हा दणका किती जबरदस्त होता हे सांगून गेली. हा दणका म्हणजेच मुख्यमंत्र्यांनी जयंत पाटील यांना सांगितल्याप्रमाणे बाहुबलीचा पार्ट-२ असल्याचीच कुजबुज मंत्रालय परिसरात सुरू आहे. राष्ट्रवादीतील अनेक बड्या नेत्यांवर विविध प्रकरणात चौकशीची टांगती तलवार कायम असताना आता मुख्यमंत्र्यांच्या या बाहुबली-२ सिनेमातील पुढचा ‘सीन’ काय असणार याचीच चर्चा गेले दोन दिवस मंत्रालय परिसरात सुरू आहे..