इस्लामी धर्मप्रसारक झाकीर नाईक मोकाट!

    25-Feb-2025
Total Views | 97
 
zakir naik 
 
झाकीर नाईकला भारताच्या ताब्यात देण्यात यावे, यासाठी भारत सरकार प्रयत्न करीत असले, तरी त्यास अद्याप यश आलेले नाही. झाकीर नाईकविरुद्ध ठोस पुरावे देण्याची मलेशिया सरकारची मागणी आहे. ‘राष्ट्रीय तपास यंत्रणे’ने झाकीर नाईकविरुद्ध भक्कम पुरावे गोळा केले असून, त्याला भारतात आणण्यासाठीचे प्रयत्न सुरू आहेतच.
 
इस्लामी धर्मप्रसारक झाकीर नाईक याने भारतात अटक होऊ नये, म्हणून काही वर्षांपूर्वी मलेशियात पलायन केले. मलेशियाच्या सरकारने त्याला आश्रयदेखील दिला. पण, तेथेही हिंदू समाजाविरुद्ध अशीच वादग्रस्त वक्तव्ये त्याच्याकडून केली जात होती. २०१९ मध्ये मलेशियातील सार्वजनिक कार्यक्रमात झाकीर नाईकने हिंदू धर्मावर टीका केल्याने, मलेशिया सरकारने त्याच्या सार्वजनिक भाषणांवर बंदी घातली. पण, आता ती बंदी असून नसल्यासारखी स्थिती असून, हा झाकीर नाईक उघडपणे भडक प्रवचने देत सुटला आहे. मलेशियाचे गृहमंत्री सैफुद्दीन इस्माईल यांनी तर झाकीर नाईक याच्यावर सार्वजनिक ठिकाणी भाषणे करण्यावर बंदी नसल्याचे स्पष्ट करून एकप्रकारे आपल्या सरकारचा झाकीर नाईक याला पाठिंबा असल्याचे दाखवून दिले आहे. २०१९ मध्ये झाकीर नाईक याच्यावर तात्पुरती बंदी घातली होती, असेही मलेशियाच्या गृहमंत्र्यांनी स्पष्ट केले.
 
पण, आता मलेशियामधील काही गटांनी झाकीर नाईक याच्या सार्वजनिक भाषणांवर बंदी घालावी, अशी मागणी केली आहे. गेल्या महिन्यात आयोजित एका सुन्नी परिषदेमध्ये मुस्लीम समाजाने अन्य धर्मीयांमध्ये इस्लाम धर्माचा प्रचार करण्याच्या प्रयत्नांना गती द्यायला पाहिजे, असे आवाहन झाकीर नाईकने केले होते. मलेशियातील मुस्लीम त्यांना कायद्याद्वारे जो अधिकार मिळाला आहे, त्याचा पुरेपूर वापर करीत नसल्याचेही झाकीर नाईक या कार्यक्रमात म्हणाला. ‘मलेशियन अ‍ॅडव्हान्समेंट पार्टी’ आणि ‘हिंदू राईट्स अ‍ॅक्शन फोर्स’ यांनी झाकीर नाईक याच्यावरील बंदी का उठविण्यात आली, असा प्रश्न सरकारला विचारला आहे. समाजिक सलोखा, राष्ट्रीय सुरक्षा यांचा विचार करता आणि देशातील शाही संस्थांबद्दल आदरभाव राहावा, त्यांचे हित जोपासले जावे, हे लक्षात घेऊन झाकीर नाईकवर बंदी अमलात आणली जावी, असे या गटांचे म्हणणे आहे.
 
मलेशियातील ४५ टक्के जनता ही अन्य धर्मीय आहे. झाकीर नाईक याच्या जहाल भाषणाने तेथील जनतेमधील वांशिक संबंध आधीच ताणले गेले आहेत. “मलेशियाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून सरकारकडून ज्या हजारो मुस्लीम विद्वानांना देशात निमंत्रित केले जात आहे, त्यास आम्ही कधीच विरोध केलेला नाही; पण झाकीर नाईकबद्दल तसे म्हणता येणार नाही,” असे झाकीर नाईक यास विरोध करणार्‍या गटांचे म्हणणे आहे. त्याची भाषणे समाजात फूट पाडणारी आहेत, हे लक्षात घेऊन मलाक्का, जोहो, केदाह, सारावाक, पेनांग आणि पेरलीस या राज्यांनी झाकीर नाईक याच्यावर बंदी घातली आहे. झाकीर नाईकने आपल्या भाषणांमधून मलेशियात स्थायिक झालेल्या चिनी जनतेला चीनमध्ये परत जाण्यास फर्मावले. तसेच, मलेशियातील भारतीयांच्या निष्ठेबद्दल शंकाही उपस्थित केली. अशी वक्तव्ये करून झाकीर नाईक राष्ट्रीय ऐक्यास धोका पोहोचवित आहे, असे त्याच्यावर बंदी घालण्याची मागणी करणार्‍या गटांचे म्हणणे आहे.
 
झाकीर नाईकला भारताच्या ताब्यात देण्यात यावे, यासाठी भारत सरकार प्रयत्न करीत असले, तरी त्यास अद्याप यश आलेले नाही. झाकीर नाईकविरुद्ध ठोस पुरावे देण्याची त्या सरकारची मागणी आहे. ‘राष्ट्रीय तपास यंत्रणे’ने झाकीर नाईकविरुद्ध भक्कम पुरावे गोळा केले असून, त्याला भारतात आणण्यासाठीचे प्रयत्न सुरू आहेतच. मुंबईत जन्मलेला झाकीर नाईक हा जगातील अत्यंत वादग्रस्त आणि धोकादायक धर्मप्रसारक. पण, मलेशियन सरकार काही तरी कारणे पुढे करून अजून त्यास भारत सरकारच्या ताब्यात देण्यास तयार नाही, असे दिसून येते. एकूणचज मलेशियन सरकारवर दबाव आणून झाकीर नाईकला भारताने ताब्यात घेण्याची आवश्यकता आहे.
 
बारामुल्लात जल्लोष!
 
दुबईमध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात दि. २३ फेब्रुवारी रोजी झालेला सामना भारताने जिंकल्याचा आनंद जम्मू-काश्मीर खोर्‍यात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. भारताचा तिरंगा ध्वज फडकावून आणि फटाके फोडून तेथील जनतेने हा विजय साजरा केला. चॅम्पियन चषकासाठीचा हा अंतिम सामना नसला, तरी पाकिस्तानला हरविल्याचा आनंद उर्वरित भारताप्रमाणे जम्मू-काश्मीरमध्येही साजरा करण्यात आला. जम्मू-काश्मीरला विशेष अधिकार देणारे ‘कलम ३७०’ रद्द करण्यात आल्यानंतर प्रथमच बारामुल्ला आणि जम्मू-काश्मीरच्या अन्य भागांत भारताचा विजय साजरा होत होता. “मित्रमंडळी आणि अन्य क्रिकेट चाहत्यांसमवेत साजरा करण्यात आलेला हा अविस्मरणीय क्षण होता,” अशी प्रतिक्रिया एका स्थानिक तरुणाने व्यक्त केली. “आमच्यासाठी क्रिकेट हा केवळ खेळ नाही, तर तो आपणा सर्वांना एकत्र आणणारा खेळ आहे,” असेही त्या युवकाने म्हटले आहे.
 
बारामुल्ला आणि परिसरात ज्या उत्साहात भारताचा विजय साजरा करण्यात आला, तो पाहता काश्मीरमध्ये एका नवीन अध्यायास प्रारंभ झाला, असे म्हणता येईल. काश्मीरमधील वातावरण बदलत चालले आहे, हे यावरून दिसून आले आहे. पाकिस्तानवर भारताने मिळविलेल्या विजयाचा आनंद जम्मूमध्ये तेवढ्याच उत्साहात साजरा करण्यात आला.तिरंगा ध्वज हातात घेऊन तरुण रस्त्यांवर उतरले होते. फटाके फोडले जात होते. जम्मूच्या काची छावणी चौकात तर दिवाळीसारखे वातावरण होते. फटाक्यांच्या आतषबाजीने सारा आसमंत उजळून निघाला होता. सर्वजण ‘भारतमाता की जय’चा जयघोष करीत होते. ‘कलम ३७०’ निकालात काढल्यानंतर जम्मू-काश्मीरमधील वातावरण बदलत चालले असल्याचेच हे द्योतक मानायला हवे!
नमाजाची सुटी आसाम विधानसभेकडून रद्द!
 
ब्रिटिश काळापासून सुमारे ९० वर्षांपासून आसाममधील मुस्लीम आमदारांना शुक्रवारी नमाज पढण्यासाठी दोन तासांची सुटी दिली जात असे. ही सवलत अगदी आतापर्यंत सुरू होती. ही सुटी रद्द करण्याचा निर्णय आसाम विधानसभेच्या समितीने ऑगस्ट २०२३ मध्येच घेतला होता. पण, त्या निर्णयाची अंमलबजावणी सध्या सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात करण्यात आली. ब्रिटिश राजवटीत १९३७ साली तत्कालीन मुस्लीम लीगचे सदस्य सय्यद मोहम्मद सादुल्ला यांनी ही प्रथा सुरू केली होती. वसाहतीच्या काळात सुरू करण्यात आलेली ही प्रथा रद्द करण्याच्या निर्णयाचे मुख्यमंत्री हिमंता बिस्व सरमा यांनी स्वागत केले असले, तरी मुस्लीम आमदारांनी मात्र या निर्णयावर टीका केली आहे.
 
३० मुस्लीम आमदारांचा या निर्णयास विरोध असताना शासनाने त्याकडे लक्ष दिले नाही, असा आरोप एका मुस्लीम आमदाराने केला. विधानसभा अध्यक्ष आणि विषय नियामक समितीचे प्रमुख असलेले विश्वजित दायमारी यांनी या निर्णयाचे समर्थन केले. भारताच्या धर्मनिरपेक्षतेचे प्रतिबिंब विधानसभेतही उमटायला हवे, असे अध्यक्षांनी स्पष्ट केले. आसाम विधानसभेने घेतलेल्या या निर्णयावर उलटसुलट प्रतिक्रिया व्यक्त होत असल्या, तरी केवळ मुस्लीम आमदारांना ब्रिटिश काळापासून दिली जात असलेली ही सवलत रद्द करून आसाम विधानसभेने एक चांगले पाऊल उचलले आहे.
 
कुंभस्नानासाठी बंगालमधून भाविक!
 
प. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या अनेकदा आपल्या जिभेला हाड नसल्यासारख्या बोलत सुटतात! कुंभमेळ्यात झालेल्या चेंगराचेंगरीचे निमित्त त्यांना मिळाले आणि त्यांनी लगेच हा कुंभमेळा नसून मृत्यूमेळा असल्याची टीका केली. दि. १३ जानेवारीपासून सुरू झालेल्या महाकुंभमेळ्याची सांगता उद्या महाशिवरात्रीच्या दिवशी त्रिवेणी संगमावर केल्या जाणार्‍या स्नानाने होत आहे. कोट्यवधी हिंदू धर्मीयांनी कुंभमेळ्यात स्नान करण्याची पर्वणी साधली आहे. पण, ममता बॅनर्जी किंवा अन्य काही विरोधी नेत्यांना या कुंभमेळ्याचे काहीच देणे-घेणे नाही, असे दिसून येत आहे. पण ममता बॅनर्जी यांनी केलेल्या वक्तव्याकडे दुर्लक्ष करून प. बंगालमधील अनेक भाविकांनी कुंभमेळ्यात स्नान करण्याची संधी साधली आहे. अलीकडेच प. बंगालमधील आसनसोल येथून सुमारे दोन हजार भाविक ४० बसेसमधून प्रयागराज येथील कुंभनगरीत आले होते. उत्तर प्रदेश सरकारने केलेली व्यवस्था पाहून ते सर्व आश्चर्यचकित झाले. प. बंगालमधून आलेल्या या भाविकांनीही ‘जय श्रीराम’, ‘हर हर गंगे’चा जयघोष करीत त्रिवेणी संगमावर स्नान केले. त्रिवेणी स्नान करण्याबरोबरच हे भाविक तेथील धार्मिक कार्यक्रमात सहभागी झाले होते. या भाविकांसाठी विशेष यज्ञ आोण हवन कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. कोट्यवधी भाविक स्नानासाठी येत असतील, तर आम्ही कशासाठी मागे राहायचे, असे प. बंगालमधील या भाविकांचे म्हणणे होते. ममता बॅनर्जी यांच्या बाष्कळ आरोपांना प. बंगालच्या भाविकांनी अशा कृतीतून उत्तर दिले!
 
दत्ता पंचवाघ
 
९८६९०२०७३२
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121