नवी दिल्ली : (Jyotiraditya Scindia) उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मंगळवार दि. ११ फेब्रुवारी रोजी दिल्ली येथील महाराष्ट्र सदनात शरद पवार यांच्या हस्ते महादजी शिंदे राष्ट्र गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला होता. या पुरस्कार देण्यावरुन संजय राऊत यांनी शरद पवारांवर टीका केली होती. याच सोहळ्याला उपस्थित असलेले केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी आता राऊत यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिले आहे.
काय म्हणाले ज्योतिरादित्य शिंदे?
ज्योतिरादित्य शिंदे यांनी एक्सवर एक पोस्ट करत संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे. त्यांनी म्हटले आहे की, "मराठा समाज सर्व पाहत आहे. बाळासाहेब ठाकरे यांचे आदर्श पायदळी तुडवून केवळ हिंदुत्वाचाच नव्हे तर मराठ्यांच्या स्वाभिमानाचाही अपमान करणाऱ्या लोकांना मराठा सन्मान काय समजणार? ज्यांनी स्वतःच्या समाजात आपला जनाधार आणि सन्मान गमावला आहे ते इतरांचा सन्मान केल्यामुळे त्रस्त आहेत", अशा शब्दात त्यांनी राऊतांवर बोचरी टीका केली आहे.