महाराष्ट्रातील एक महत्वाचे ठिकाण म्हणजे ‘मुरुड’. एक प्रसिद्ध पर्यटनस्थळ म्हणून लोकांना ज्ञात असणार्या मुरूडची एक महत्वाचे ऐतिहासिक स्थळ म्हणून लोकांना फारशी ओळख नाही. दरवर्षी मुरुडला हजारो पर्यटक भेट देतात पण फक्त जंजिरा पाहून ते परतात. मुरुडच्या काना-कोपर्यात, दगड-मातीत दडलेला मुरूडचा इतिहास आजवर अंधारातच राहिलेला नाही. मुरूडच्या याच इतिहासाला प्रकाशझोतात आणणारी, मुलुखगिरी प्रकाशन, कोल्हापूर यांनी प्रकाशित केलेली ‘पद्मदुर्ग’ आणि ‘मरुत्क्षेत्र ते मुरुड’ ही दोन पुस्तके. आपला कट्टा आयोजित या दोन पुस्तकांचा प्रकाशन सोहळा रविवार १९ जानेवारी रोजी ‘छत्रपती शाहु सभागृह, छत्रपती श्री शिवाजी मंदिर, दादर’ येथे होणार आहे. याचनिमित्ताने या दोन्ही पुस्तकांच्या लेखकांशी साधलेला हा संवाद..
’पद्मदुर्ग’ हे पुस्तक लिहिण्याची प्रेरणा कशी मिळाली?
इतकी वर्षे ‘पद्मदुर्ग’ हा किल्ला सर्वांसाठीच बंद होता. तो गेल्या १०-२० वर्षांपूर्वी खुला झाला आहे. कित्येक लोकांचे असे म्हणणे आहे की, ‘पद्मदुर्ग’ किल्ल्यात जे मंदिर आहे, त्या मंदिरात देवीच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी होत. कोळीबांधव मासेमारीसाठी त्या ठिकाणी जायचे. तेव्हा तिथल्या खडकाचा वापर करायचे. पण, ऐतिहासिकदृष्ट्या मात्र ‘पद्मदुर्ग’ हा किल्ला कोणीही पाहिला नव्हता. पर्यटकांना तर तिथे मुळीच जाता येत नव्हते. आता काही काळापूर्वी तो खुला झाल्यामुळे तिथे जाता येते; पण त्या किल्ल्याची खरी माहिती कुठेही उपलब्ध नव्हती. आजही आपण गुगलवर ‘पद्मदुर्ग’विषयी माहिती शोधायला गेल्यावर ‘छत्रपती संभाजी महाराजांनी हा किल्ला बांधला,’ असेही काही ठिकाणी संदर्भ सापडतात. पण, छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील पत्रव्यवहारात ‘पद्मदुर्ग’ किल्ल्याचा उल्लेख आहे. सिद्दीला रोखण्यासाठी ‘राजपुरीच्या उरावर दुसरी राजपुरी वसवली,’ असा उल्लेख महाराजांनी केला होता. त्यामुळे, मी स्वतःही मुरुडचाच असल्यामुळे लोकांपर्यंत न पोहोचलेला ‘पद्मदुर्ग’चा इतिहास संदर्भासहित वाचकांपर्यंत पोहोचावा, या प्रेरणेतून हे पुस्तक लिहिले आहे.
‘पद्मदुर्ग’च्या किंवा मुरुडच्या इतिहासावर आजवर फारशी पुस्तके लिहिली गेली नाहीत; यामागची कारणे काय आहेत, असे तुम्हाला वाटते?
मुरुड म्हणजे काय, हा प्रश्न विचारल्यावर अनेकांच्या डोळ्यांसमोर फक्त ‘मुरुड म्हणजे जंजिरा’ एवढेच चित्र येते आणि जंजिरा म्हणजे सिद्दी. त्यामुळे मुरुड म्हणजे ‘जंजिर्याचा सिद्दी’ एवढीच काय ती ओळख! मुरुडवर यादवांचे आणि शिलाहारांचेसुद्धा राज्य होऊन गेले. एवढेच काय, तर मुरुडमध्ये हंबीरराव नावाचासुद्धा राजा होऊन गेला, जो स्वतःला ‘कोकणचक्रवर्ती’ म्हणवून घ्यायचा. त्याचा शिलालेखसुद्धा सापडलेला आहे. सहाव्या शतकात मुरुडमध्ये लेणी होती. तेव्हा इथे व्यापारसुद्धा चालायचा. एवढा मोठा इतिहास मुरुडला असताना मुरुडची ओळख फक्त ‘जंजिर्याचा सिद्दी’ एवढी मर्यादित अजिबात राहता कामा नये. अनेकांनी ‘पद्मदुर्गा’वर लेखांच्या माध्यमातून प्रकाश टाकला आहे. पण, ती त्रोटक माहिती आहे. सिद्दीला रोखण्यासाठी बांधलेल्या ‘पद्मदुर्ग’चा इतिहास हा दोन-तीन पानांत संपणारा नव्हे. ‘पद्मदुर्ग’ पर्यटकांसाठी खुलाच नसल्यामुळे लोकांना जिथे पोहोचणेच शक्य नव्हते. त्यामुळे साहजिकच त्या ठिकाणचा इतिहास फारसा लिहिलाही गेला नाही आणि म्हणूनच तो फारसा लोकांपर्यंत पोहोचलेला दिसत नाही. अनेकांनी पुस्तक लिहिण्याचा प्रयत्न केला; पण त्यांना किती यश आले, याविषयी आपल्याला सांगता येणार नाही.
हे पुस्तक लिहून पूर्ण करण्यासाठी किती काळ लागला आणि त्यासाठी लागणारे ऐतिहासिक पुरावे, संदर्भ व अन्य माहिती यांचे संकलन तुम्ही कशाप्रकारे केले?
याविषयीची माहिती लोकांपर्यंत पोहोचावी, यासाठी सात-आठ वर्षांपासून प्रयत्न सुरूच होते. रिल्स, व्हिडिओज किंवा समाजमाध्यमांवर लेख लिहून मी याविषयी माहिती देत होतो. पण, ‘पद्मदुर्ग’वर एक सविस्तर पुस्तक लिहावे, या कल्पनेने दोन-तीन वर्षांपूर्वी डोक्यात घर केले. मग त्यासंदर्भातील पुरावे शोधायला सुरुवात केली. ते पुरावे शोधण्यासाठी ‘भारतीय इतिहास संशोधन मंडळ’, सार्वजनिक वाचनालये, जुनी ऐतिहासिक पत्रे आणि काही इतिहास अभ्यासकांची खूप मदत झाली.
ऐतिहासिक पुस्तकांचे लेखन हे तुलनेने अवघडच. त्यामुळे हे पुस्तक लिहिताना तुम्हाला कोणत्या अडचणी किंवा आव्हानांना सामोरे जावे लागले?
लेखक म्हणून हे माझे पहिलेच पुस्तक. हे पुस्तक लिहिताना काही नैसर्गिक अडचणी आल्या. हा किल्ला ‘भारतीय पुरातत्व विभागा’च्या देखरेखीखाली आहे. त्यामुळे तिथे ठराविक काळापेक्षा अधिक वेळ थांबता येत नाही. शिवाय, पावसाळ्यात समुद्र खवळलेला असताना हा किल्ला चार ते पाच महिने बंद असतो. त्यामुळे पुस्तक लिहिण्यासाठी किल्ल्याला भेटी देताना काही मर्यादा यायच्या. एका वर्षात पुस्तक लिहून पूर्ण करावे, असे ठरवले असतानाही या मर्यादांमुळे ते शक्य होत नव्हते.
आताच्या काळात ‘पद्मदुर्ग’ पुस्तकाचे महत्त्व काय आणि हे पुस्तक वाचकांनी का वाचावे?
‘पद्मदुर्ग’ किल्ल्याचे बांधकाम फार प्रतिकूल परिस्थितीत केलेले आहे. त्यामुळे हा किल्ला कसा बांधला गेला, सोबतच कोळी, आगरी, माळी आणि भंडारी यांसारख्या समाजांचे स्वराज्यातील योगदान यांसारख्या अपरिचित गोष्टी या पुस्तकात वाचायला मिळतील. आज जर आपण लोकांना मावळ्यांची नावे विचारली, तर काही ठराविक नावे सोडली, तर त्यापलीकडे नावे त्यांना सांगता येत नाहीत. त्यामुळे लोकांना आपल्या इतिहासाविषयी अधिकाधिक माहिती असणे आवश्यक आहे. फक्त ‘पद्मदुर्ग’पुरते हे पुस्तक मर्यादित असेल, तर आम्ही हे पुस्तक का वाचावे, असा प्रश्नही वाचकांना पडू शकतो. पण, या पुस्तकात ‘पद्मदुर्ग’सोबतच इतरही अनेक गोष्टींची माहिती आणि इतिहास सांगितलेला आहे. या पुस्तकात मुरुडचा ऐतिहासिक नकाशासुद्धा दिलेला आहे. तो मूळ नकाशा मोडी भाषेत असल्यामुळे लोकांना तो समजावा, यासाठी आम्ही तो मराठीतसुद्धा दिलेला आहे. अनेकदा आपण किल्ल्यावर गेलो की आपल्याला वाटते, इथे फक्त दगडधोंडेच पडलेले आहेत, दुसरे काहीही पाहण्यासारखे नाही! पण, त्यावेळी तिथे तोफासुद्धा असतात; फक्त त्या तोफा लोकांना ओळखता येत नाहीत. तोफांविषयीची माहितीसुद्धा आम्ही या पुस्तकात दिली आहे. हे पुस्तक वाचल्यानंतर तुम्ही कुठल्याही किल्ल्यावर गेलात की तिथल्या तोफा तुमच्याशी बोलू लागतील, याची मी वाचकांना ग्वाही देतो. फक्त ‘पद्मदुर्ग’च नाही, कुठलाही किल्ला समजून घेण्यासाठी हे पुस्तक महत्त्वाचे ठरू शकते.
’मरुत्क्षेत्र ते मुरुड’
मुरुडसारख्या ऐतिहासिक स्थळावर पुस्तक लिहावे, असे तुम्हाला का वाटले?
आमच्या मुरुडला ऐतिहासिक वारसा लाभला आहे. पण, लहानपणापासून आम्ही फक्त मुरुड म्हणजे जंजिरा आणि सिद्दीच्याच गोष्टी ऐकल्या. माझे पदव्युत्तर शिक्षण विज्ञान शाखेत झाले. रसायनशास्त्रात माझे ‘एम. ए.’ पूर्ण झाले होते. पण, त्यानंतर मी पुन्हा पदव्युत्तर पदवी घेण्यासाठी पुरातत्वशाखेत प्रवेश घेतला. पुरातत्वमध्ये ‘एम. ए.’ करत असताना मी डॉ. शमिका सरवणकर म्हणून माझ्या ज्या मार्गदर्शिका होत्या, त्यांच्यासोबत मिळून ‘मुरुडमधील देव-देवस्थाने’ या विषयावर प्रकल्प तयार केला होता. त्या प्रकल्पाचा अभ्यास करत असताना ‘मुरुडमधील सामाजिक जीवन’ आणि ‘मुरुडचा इतिहास’ अशा मुरुडविषयी अधिक गोष्टी जाणून घेण्याचा प्रयत्न केला. ते करत असताना शिलालेखांविषयी मला माहिती मिळाली. त्या शिलालेखांमध्ये मुरुडचा उल्लेख ‘मरुत्क्षेत्र’ असा केलेला आहे. मिराशी नावाचे जे इतिहासकार आहेत, त्यांनी त्यांच्या पुस्तकातसुद्धा याविषयीचे संदर्भ दिले आहेत. त्यातूनच मग ‘मरुत्क्षेत्र’ म्हणजेच मुरुडविषयी अधिक माहिती मिळवण्याच्या जिज्ञासेतून आणि मुरुडचा इतिहास लोकांपर्यंत पोहोचावा, या प्रेरणेतून हे पुस्तक लिहिले.
मुरुडच्या इतिहासावर आजवर फारशी पुस्तके लिहिली गेली नाहीत. यामागची कारणे काय आहेत, असे तुम्हाला वाटते?
याचे मुख्य कारण मला वाटते ते असे की, खुद्द मुरुडमध्येच मुरुडच्या इतिहासाविषयी फारशी जागरूकता नाही! इथल्या मुलांना इतिहास माहीत असतो, तो म्हणजे शाळा-महाविद्यालयात पुस्तकांमधून शिकवला जातो तेवढाच! मुरुडमध्ये उच्चशिक्षणासाठी किंवा नोकरीसाठी फारशा संधी उपलब्ध नाहीत. त्यामुळे येथील मुले उच्च शिक्षणासाठी किंवा नोकरीसाठी इतर ठिकाणी जातात. त्यातही इथली जी मुले उच्च शिक्षण घेतात किंवा नोकरी करतात, ती विज्ञान किंवा अभियांत्रिकी यांसारख्या शाखांमध्ये शिकतात. इतिहासात त्यांना फारशी रुची नसते. त्यामुळे मुरुडचा इतिहास हा स्थानिकांनाच ज्ञात नसल्यामुळे तो फारसा पुस्तकरुपातही आलेला नाही.
हे पुस्तक लिहिण्यासाठी आवश्यक ती माहिती आणि पुरावे तुम्ही कसे संकलित केले? हे करताना तुम्हाला कोणत्या अडचणींचा सामना करावा लागला?
माहिती आणि पुरावे गोळा करताना ज्या ठिकाणांना, स्थळांना भेट द्यावी लागली, त्या ठिकाणी काही अडचणी आल्या. म्हणजे काही वेळा परवानगी मिळवताना अडचणी आल्या. काही देवस्थानांची माहिती मिळवताना ती माहिती का हवी आहे, कशासाठी हवी आहे, हे तिथल्या संबंधित लोकांना पटवून देणे काही वेळा कठीण गेले. स्थानिकांकडून लोककथा किंवा आख्यायिका जाणून घेताना त्यांना ते सांगण्यासाठी तयार करणेही अवघड होते. पण, पुरातत्व शाखेची विद्यार्थिनी असल्यामुळे संग्रहालये, ग्रंथालये किंवा इतर अभ्यासकांकडून माहिती मिळवणे मला फारसे कठीण गेले नाही. तिथे मला सहज माहिती मिळाली. पण, स्थानिक पातळीवर जे सर्वेक्षण करावे लागले, ते सर्वेक्षण थोडे अवघड गेले. ही माहिती आपण का मिळतोय, ती कशासाठी वापरणार आहोत, अशा लोकांच्या अनेक प्रश्नांना सामोरे जावे लागले.
तुमच्या पुस्तकाच्या ‘मरुत्क्षेत्र ते मुरुड’ या शीर्षकाने तर लक्ष वेधून घेतलेलेच आहे, पण वाचकांना या पुस्तकात नेमके काय वाचायला मिळणार आहे?
‘मरुत्क्षेत्र ते मुरुड’ हे जरी पुस्तकाचे शीर्षक असले, तरी या पुस्तकात मरुत्क्षेत्राच्या आधीचाही इतिहास सांगितलेला आहे. या पुस्तकात मुरुडचा दोन हजार वर्षांपूर्वीपासूनचा इतिहास वाचकांना वाचायला मिळणार आहे. मुरुडचा उल्लेख ज्या ज्या ऐतिहासिक संदर्भांमध्ये आला आहे, त्या सगळ्या गोष्टी या पुस्तकात नमूद केल्या आहेत. मुरुडवर राज्य केलेले राजे, येथील राजवटी, मुरुडशी संबंधित व अजूनही अज्ञात असलेले शिलालेख, इथल्या स्थानिकांच्या तोंडी असलेल्या आख्यायिका, त्यांचे ऐतिहासिक संदर्भ, मुरुडमधील प्राचीन देवस्थाने आणि मुरुडमध्ये सापडलेले पुरातत्वीय पुरावे अशा सगळ्या गोष्टी या पुस्तकात नमूद केलेल्या आहेत आणि मुख्य म्हणजे, मरुत्वेश्वराच्या म्हणजेच शिवशंकराच्या प्राचीन मंदिराविषयीसुद्धा माहिती या पुस्तकात वाचकांना वाचायला मिळणार आहे.
आताच्या काळात ‘मरुत्क्षेत्र ते मुरुड’ पुस्तकाचे महत्त्व काय आहे आणि हे पुस्तक वाचकांनी का वाचावे?
मला असे वाटते की, मुरुडकडे आजपर्यंत फक्त एक पर्यटनक्षेत्र म्हणूनच पाहिले गेले. त्याचा इतिहास जाणून घेण्याचा फारसा प्रयत्न आजवर झालेला नाही. मुरुड हे महाराष्ट्रातील एक महत्त्वाचे असे ठिकाण आहे. त्यामुळे त्याचा इतिहास लोकांना ज्ञात असणे गरजेचे आहे. मुरुडमध्ये होऊन गेलेल्या महत्त्वाच्या लोकांचीही माहिती असणे गरजेचे आहे. मुरुडमध्ये आल्यावर लोकांनी फक्त जंजिरा बघून निघून जाऊ नये, तर इथे असणार्या प्रत्येक ऐतिहासिक वास्तूला त्यांनी भेट द्यावी. मुरुडमध्ये काय आहे, हा प्रश्न विचारल्यावर कोणीही एका शब्दात उत्तर न देता, सविस्तर निबंध त्यांना लिहिता यायला हवा. इतिहासावर आधारितच भविष्याची वाटचाल होते. यामुळे मुरुडच्या इतिहासावर आधारित हे पुस्तक महत्त्वाचे आहे, असे मला वाटते.
दिपाली कानसे