मुंबई (विशेष प्रतिनिधी) : (Zakir Naik Waqf Board) भारतातून फरार झालेला इस्लामिक कट्टरतावादी झाकीर नाईक याने विषारी गरळ ओकत भारतातील अल्पसंख्याकांना भडकावण्याचा प्रयत्न केला आहे. रविवार, दि. ८ सप्टेंबर रोजी स्वतःचा एक व्हिडिओ पोस्ट करत त्याने वक्फ दुरुस्ती विधेयकाला विरोध दर्शवत ते मंजूर होऊ नये यासाठी आवाज उठवण्याचा सल्ला दिल्याचे निदर्शनास आले आहे. विधेयक रोखण्यासाठी भारतातील ५० लाख अल्पसंख्याकांना एकत्र येण्याचे आवाहन केले आहे.
भारतातील अल्पसंख्याक समाजाला संबोधत झाकीर नाईक म्हणाला, "वक्फ दुरुस्ती विधेयक हे 'वक्फच्या पवित्र दर्जाचे उल्लंघन' आहे. हे विधेयक मंजूर होऊ दिले तर अल्लाहचा कोप आणि भावी पिढ्यांचा शाप आपल्याला सहन करावा लागेल. त्यामुळे भारतातील किमान ५० लाख मुस्लिमांनी वक्फ दुरुस्ती विधेयकासंदर्भातील आपला नकार संयुक्त संसदीय समितीकडे पाठवणे आवश्यक आहे." 'वक्फचे पावित्र्य जपण्यासाठी आणि भावी पिढ्यांसाठी त्याचे संरक्षण सुनिश्चित करण्यासाठी आपण एकत्र उभे राहू, असेही पुढे त्याने म्हटले आहे.