पंतप्रधानांनी केली 'आयओए'च्या अध्यक्षा पीटी उषा यांच्याशी चर्चा!
07-Aug-2024
Total Views | 21
नवी दिल्ली : स्टार कुस्तीपटू विनेश फोगाटला अपात्र ठरविल्यानंतर देशभरातून प्रतिक्रिया येत आहे. भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या अध्यक्षा पीटी उषा यांच्यासोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चर्चा केली आहे. पंतप्रधानांनी पीटी उषा यांच्याशी संपर्क साधत अपात्र प्रकरणात भारताकडे कोणते पर्याय उपलब्ध आहेत याबद्दल प्राथमिक माहिती घेतली आहे. तसेच, शक्य होईल तितक्या पर्यायांचा शोध घेण्यास पंतप्रधानांनी सांगितले आहे.
दरम्यान, विनेश फोगाट यांच्या अपात्रता प्रकरणात कुठल्याच पर्यायांचा विचार होणार नसेल तर तीव्र शब्दांत निषेध नोंदवावा, असेही पंतप्रधानांनी पीटी उषा यांना सांगितले आहे. विशेषतः पंतप्रधानांनी वैयक्तिकरित्या प्रत्यक्ष माहिती मिळवण्यासाठी आणि संभाव्य उपायांवर चर्चा करण्यासाठी भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या अध्यक्षा पीटी उषा यांच्याशी संपर्क साधत यासंदर्भात सविस्तर माहिती घेतली आहे.
पंतप्रधानांनी व्यक्त केल्या भावना
विनेश, तू विजेत्यांमधली विजेती आहेस. तू भारताचा गौरव आहेस आणि प्रत्येक भारतीयासाठी प्रेरणा आहेस. आजच्या घटनेमुळे जी निराशेची भावना मी अनुभवत आहे ती शब्दात व्यक्त करणे कठीण आहे. पण याचबरोबर मी तुझी खंबीर वृत्ती जाणतो. आव्हानांना सामोरे जाणे, हे तुझ्या स्वभावातच आहे. खंबीरपणे उभी राहा, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.