ठाणे : डंपिंग ग्राऊंडच्या अभावामुळे गेले काही दिवस ठाणे शहराची कचराकोंडी झाली आहे. त्यामुळे ठाणे महापालिकेला नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. मात्र, आता लवकरच ठाण्याच्या कचरानिर्मूलनाचा प्रश्न मार्गी लागण्याची चिन्हं दिसत आहेत. भिवंडी, पडघानजीक शासनाच्या मालकीची असलेली 85 एकर जमीन डम्पिंगसाठी देण्याच्या प्रस्तावाला शासनाची मान्यता मिळाली आहे. त्यानुसार, लवकरच या जमिनीचे सर्व्हेक्षण, मोजणी करून प्रदूषण नियंत्रण मंडळासह विविध परवानग्या मिळताच ठाण्याची डम्पिंगची समस्या कायमस्वरूपी निकाली निघणार आहे.
नवी मुंबईच्या धर्तीवर ठाणे महापालिकेचे स्वतःच्या डंपिंग ग्राऊंडचे स्वप्न पूर्ण होणार आहे. याठिकाणी घनकचरानिर्मूलन व प्रक्रिया केंद्र उभारण्याचा मार्ग मोकळा झाला आहे, अशी माहिती घनकचरा विभागाकडून देण्यात आली. ठाणे शहरात नागरिकीकरण वाढत असल्याने घनकचर्याचे व्यवस्थापन कोलमडून पडत आहे. ठाणे शहरात वाढत्या कचर्याची समस्या गंभीर बनली आहे. वारंवार जनजागृती करूनही कचर्याची विल्हेवाट लावताना महापालिका प्रशासन मेटाकुटीला आले आहे.
एकट्या ठाणे महापालिका क्षेत्रात दररोज 1 हजार मेट्रिक टन कचर्याची निर्मिती होत असल्याने व डंपिंग ग्राऊंडची वानवा असल्याने गेले काही दिवस कचर्याचा प्रश्न दिवसेंदिवस भीषण बनत चालला आहे. दिवा डंपिंग बंद करून ठाणे शहरातील सीपी तलाव येथे कचरा डम्प करून नंतर प्रक्रिया करण्यासाठी हा कचरा डायघर येथे नेला जातो. मात्र, हा प्रकल्पही पूर्ण क्षमतेने सुरू झालेला नसून या ठिकाणीही 500 ते 600 टन कचर्यावरच प्रक्रिया केली जाते. त्यामुळे सीपी तलाव येथे कचरागाड्या खोळंबून शहराची कचराकोंडी होत आहे. हा कचराप्रश्न कायमस्वरूपी निकाली काढण्यासाठी भिवंडी, पडघ्या जवळील 85 एकर जागेला राज्य शासनाची मंजुरी मिळाली आहे. त्यानुसार या जागेवर कचराभूमी व प्रक्रिया केंद्र उभारण्यासाठी ठाणे महापालिका सज्ज झाली आहे.
80 कोटींचा खर्च अपेक्षित
ठाण्यातील कचर्याच्या विल्हेवाटीसाठी दिवा, भंडार्ली आणि डायघरच्या जागेचा पर्याय मिळाला. पण, गेल्या साडेपाच वर्षांपासून दिवा डम्पिंग शात्रोक्त पद्धतीने बंद करण्याचे पालिकेचे प्रयत्न सुरू आहेत. हे डम्पिंग बंद करण्यासाठी तब्बल 80 कोटींचा खर्च अपेक्षित असून या कामासाठी निविदा प्रक्रिया सुरू आहे.
ठाण्यातील कचर्याची सद्यःस्थिती
ठाणे शहरात रोज 1 हजार मेट्रिक टन कचर्याची निर्मिती होते. यापैकी 200 मेट्रिक टन कचरा राडारोड्याचा, 425 मॅट्रिक टन ओला कचरा आणि 375 मेट्रिक टन सुका कचरा आहे. हा कचरा सीपी तलाव येथे डम्प करून, नंतर डायघर प्रक्रिया केंद्रात पाठवला जातो. ही क्षमता 500 - 600 मे. टन आहे. याशिवाय, हिरानंदानी इस्टेट येथे 35 मे.टन, कोलशेतमध्ये 25 मे.टन, कळवा 25 मे.टन, मुंब्रा-कौसा आणि ऋतू पार्क येथे प्रत्येकी 10 मे.टन कचर्याची विल्हेवाट लावली जाते. तर, भंडार्ली येथे रिसायकल न होणारा 100 ते 150 रिजेक्ट कचरा टाकला जातो. गायमुख येथे 100 टन क्षमतेचा प्रक्रिया प्रकल्प 15 सप्टेंबरपर्यंत कार्यान्वित होईल, अशी माहिती घनकचरा विभागाचे उपायुक्त तुषार पवार यांनी दिली.