गुन्हा मागे घेण्यासाठी आव्हाडांनी पीडितेविरुद्ध रचलेल्या षडयंत्राचा पर्दाफाश
18-Jul-2024
Total Views | 87
ठाणे : अभियंत्याला बंगल्यावर नेऊन बेदम मारणे, चित्रपटगृहात शो बंद पाडून प्रेक्षकाला बदडणे, महिलेचा विनयभंग करणे, असे नाना कारनामे करणारे राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) गटाचे राष्ट्रीय सरचिटणीस आमदार जितेंद्र आव्हाड यांना खोट्या गुन्ह्याचा कट रचणे चांगलेच भोवले आहे. ३५४ अंतर्गत स्वतःवर दाखल झालेला विनयभंगाचा गुन्हा मागे घेण्यासाठी याच आ. जितेंद्र आव्हाड यांनी, पिडित महिला ( रिदा रशीद) हिच्याविरुद्ध रचलेल्या षडयंत्राचा अखेर पर्दाफाश झाला.
या खोट्या गुन्ह्याप्रकरणी आ. जितेंद्र आव्हाड व त्यांच्या दोघा वकिलांसह कटात सहभागी २३ आरोपींविरोधात मुंब्रा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. यातील, आव्हाडांची कथित हस्तक मुंब्यातील इस्टेट एजंट शबाना सोंधी (४०) हिला पोलिसांनी अटक केली असुन आव्हाड व अन्य आरोपी मात्र मोकाट असल्याने त्यांच्यावर तातडीने अटकेची कारवाई करण्याची मागणी गुरुवारी ठाण्यात आयोजित पत्रकार परिषदेत पिडित महिला रिदा रशिद यांनी केला आहे.
ठाण्यानजीकच्या मुंब्रा वाय जंक्शन येथील उड्डाणपुलाचा लोकार्पण सोहळा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते नोव्हेंबर २०२२ मध्ये पार पडला. या सोहळ्या दरम्यान आव्हाडांनी दोन्ही हातांनी पकडुन बाजुला हटवल्यामुळे भाजप महिला मोर्चाच्या ठाणे उपाध्यक्षा रिदा रशिद यांनी आव्हाडां विरोधात मुंब्रा पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल केला होता. तेव्हा, सुडाने पेटलेल्या आव्हाड यांनी, छटपुजे दरम्यानच्या २६ ऑक्टो.२०२२ रोजीच्या जुन्या घटनेचा बाऊ करून आपल्या शिवा जगताप नामक हस्तकाकरवी रिदा रशिद यांच्या विरोधात मुंब्रा पोलीस ठाण्यात ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल केला होता.
सदर गुन्ह्याच्या तपासात कोणताही पुरावा उपलब्ध न झाल्याने हा ॲट्रॉसिटीचा कट अयशस्वी ठरला. पण हा डाव फोल ठरल्यामुळे आव्हाड व त्यांच्या समर्थकांकडून पुन्हा एकदा कलम ३७०, ३७० (अ), ५०४, ३४, सह अनैतिक व्यापार प्रतिबंधक अधिनियमन कलम ३, ४, ५, चे कलम ४, ६, १०, १२, १७ प्रमाणे पीटा, पॉस्कोचा गुन्हा रिदा राशीद यांच्याविरुद्ध मुंब्रा पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला होता. मात्र, तपास केल्यानंतर हाही गुन्हा निष्पन्न न झाल्याने सखोल पडताळणीअंती ठाणे सत्र न्यायालयाने 'बी' संमरी मंजूर करीत, या खोट्या गुन्ह्यातील फिर्यादी व साक्षिदारांवरच गुन्हे दाखल करण्याचे निर्देश दिले आहेत.
त्यानुसार, रौनक आजम शेख (४२), शबाना शेख (४३),शाहिस्ता कुरेशी (३३),सिमरन सोधी (४०), शिवा जगताप, जितेंद्र सतीश आव्हाड व त्यांचे इतर साथीदार यांच्याविरुद्ध भा. द. वी कलम १८६० नूसार १८२, २११, १९३, १९५, १९६, १९७, १९८, १९९, २००, ४१७, ४१९, ४६५, ४६७, ४६८, ४६९, ४७०, ४७१, ४७४, आणि १२० (बी) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच, न्यायालयाने पोलीस उपायुक्तांना कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. विशेष म्हणजे, उच्च न्यायालयाची दिशाभूल केल्याने आव्हाडांचे वकिल ॲड.विनोद उतेकर व अन्य एका वकिलाला या प्रकरणात आरोपी केले असल्याचे एफआयआर मध्ये नमुद आहे. हा सर्व घटनाक्रम रिदा रशीद यांनी पत्रकार परिषदेत उलगडला.तेव्हा, आपसात संगनमत करून खोटे गुन्हे दाखल करणाऱ्या आव्हाडांची पुरती पोलखोल झाली असुन त्यांच्यावर अटकेची टांगती तलवार लटकत आहे.
पोलिसांसह उच्च न्यायालयाचीही केली दिशाभूल
पीडिता रिदा रशिद यांना अडकविण्यासाठी आव्हाडांनी मुंब्रा पोलीस ठाण्यातील आपल्या मर्जीतील पोलीस अधिकाऱ्याशी संधान साधले होते. गरीब गरजु कुटुंबातील अल्पवयीन तरुणींचा वापर करून बाललैंगीक अत्याचाराचा बनावट व्हिडीओ बनवला. तसेच शासकिय दस्तऐवजाशी छेडछाड करून वैद्यकिय तपासणीसाठी व न्यायालयासमोर फिर्यादी ऐवजी भलत्याच बोगस महिलेला सादर करीत उच्च न्यायालयासह सर्व शासकिय यंत्रणांचीही दिशाभुल केल्याचे तांत्रिक तपासात उघड झाले आहे. धक्कादायक म्हणजे, पोक्सोचा हा खोटा गुन्हा दाखल करण्यासाठी या महिलांनी काळा बुरखा आणि नोज फेस परिधान करून सरकारी यंत्रणांच्या डोळ्यात धुळफेक केली. मात्र, या बोगसगिरीचा बुरखा अखेर फाटला आहे, तेव्हा या सर्व आरोपींना आर्थिक रसद पुरवणारे आ. जितेंद्र आव्हाड हेच मुख्य सुत्रधार असल्याचे चौकशीत समोर आल्याचा दावा रिदा रशिद यांनी केला आहे.