मुंबई : थोबाड फुटल्यानंतर घबाड आठवलं का? असा सवाल भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी संजय राऊतांना केला आहे. विधानपरिषद निवडणूकीत अपक्ष आमदारांचा भाव शेअर बाजाराप्रमाणे चढत होता अशी टीका संजय राऊतांनी केली होती. यावर आता चित्रा वाघ यांनी त्यांच्यावर निशाणा साधला.
चित्रा वाघ म्हणाल्या की, "पराभव मान्य करायला सुद्धा मोठं मन लागतं. हातात आमदार नसताना 'हात दाखवून अवलक्षण' का केलं? थोबाड फुटल्यानंतर घबाड आठवलं का? तुमच्या विकृत आघाडीकडं आमदार नव्हते, त्यामुळं घोडेबाजार करण्याचा तुमचाच प्रयत्न झाला, हे आधी मान्य करा. नाक कापलं तरी भोकं आहेत, हे तुमचं ब्रीद वाक्य सगळ्यांना माहीत आहे," असा टोला त्यांनी लगावला.
त्या पुढे म्हणाल्या की, "मुख्य म्हणजे शेकाप च्या जयंत पाटलांना शरद पवार गटानं उमेदवारी दिली होती, त्यांच्याकडे असलेली मतंदेखील पडली नाहीत आणि काँग्रेसनं तर तोंडावरच पाडलं. शहाणे व्हा," असे म्हणत त्यांनी संजय राऊतांना खडेबोल सुनावले.